सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केल्यावर सौ. संगीता लोटलीकर (वय ६४ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती
सौ. संगीता लोटलीकर यांचा साधनाप्रवास ….
फोंडा, गोवा येथील सौ. संगीता लोटलीकर यांच्या साधनाप्रवासातील ‘सनातन संस्थेशी झालेला परिचय आणि त्यांचा साधनेला झालेला प्रारंभ’ हा भाग आपण ३ जुलै या दिवशी पाहिला. आज पुढील भाग पाहूया.
याच्या आधीचा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/810619.html
४. प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवाविषयी आलेल्या अनुभूती
४ अ. इंदूर येथे होणार्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवासाठी जाण्याएवढे पैसे नसणे, अकस्मात् यजमानांना तिथे जाता येण्याएवढे पैसे मिळणे : काही दिवसांनी इंदूर येथे प.पू. भक्तराज महाराज यांचा ७५ वा वाढदिवस (अमृत महोत्सव) होणार होता. तेव्हा आमची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने दोघांच्या जाण्या-येण्याचा व्यय आम्ही करू शकणार नव्हतो; म्हणून मी यजमानांना म्हटले, ‘‘तुम्ही जा’’; पण त्यांच्या तिकिटाएवढेही पैसे आमच्याकडे नव्हते. इंदूर येथे जाण्यासाठी अजून १० – १२ दिवस अवकाश असतांना देवाच्या कृपेने यजमानांना ‘शेअर मार्केटींग’चा एक सहस्र पाचशे रुपयांचा एक धनादेश मिळाला. ‘देवानेच त्यांची इंदूरला जाण्याची व्यवस्था केली’, असे वाटून आम्हाला देवाचरणी पुष्कळ कृतज्ञता वाटली. मलाही इंदूर येथे जाण्याची पुष्कळ इच्छा होती; पण ते शक्य झाले नाही.
४ आ. देवाने प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवाचा कार्यक्रम स्वप्नात दाखवणे : ९.२.१९९५ या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांचा अमृत महोत्सव होता. त्या दिवशी मी नामजप करत होते; पण माझ्या मनात सर्व अमृत महोत्सवाचेच विचार चालू होते. मला जाता न आल्याचे वाईट वाटून रडूही येत होते. मध्येच काही वेळ नामस्मरणही होत होते. त्या रात्री झोपल्यावर मला स्वप्न पडले. स्वप्नात मला अमृत महोत्सवाचा सोहळा दिसला. स्वप्नात ‘मला एक मोठे मैदान दिसले. मैदानात समोर कमान लावलेली दिसली. मला फुले उधळलेली दिसली आणि प.पू. भक्तराज महाराज यांची तुला होतांना दिसली.’, अशा प्रकारचे दृश्य दिसले.
४ इ. यजमान घरी आल्यावर त्यांना स्वप्न सांगणे, त्यांनी स्वप्नातील दृश्याप्रमाणे सर्व झाल्याचे सांगणे : तेव्हा भ्रमणभाष नव्हते. त्यामुळे ‘यजमान कधी घरी येतात ?’, याची मी वाट पहात होते. यजमान ५ – ६ दिवसांनी घरी परतले. मी त्यांना मला दिसलेल्या स्वप्नातील दृश्यांविषयी सांगितले. त्यांनी मला विचारले, ‘‘तुला कसे कळले ?’’ तेव्हा मी त्यांना म्हणाले, ‘‘माझी इच्छा असून मला येता आले नाही; म्हणून देवाने मला दृष्टांत दिला.’’ ही माझी पहिलीच आणि मोठी अनुभूती होती.
४ ई. गुरुकृपेने आलेल्या वरील अनुभूतीमुळे साधनेत टिकून रहाणे : माझी प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवाला जाण्याची इच्छा असून त्यावर मार्ग काढण्याचा विचारच माझ्या मनात आला नाही. ‘याविषयी कुणाजवळ तरी बोलावे’, हेही माझ्या लक्षात आले नाही; पण ‘देवाने मला ही पहिली मोठी अनुभूती देऊन साधनेत टिकवून ठेवले’, असे आता वाटते. यासाठी गुरुचरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. त्यानंतर मात्र आम्ही सनातन संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहू लागलो.
५. नामजप करू लागल्यावर कर्मकांड सोडणे
५ अ. ‘नामधारकाला उपवास करायची आवश्यकता नसणे’, हे सूत्र कळणे : ‘डोंबिवली पश्चिम येथील सत्संग सोहळा झाल्यावर मी सनातन संस्थेच्या सर्व कार्यक्रमांना नियमित जाऊ लागले. एका सत्संगात संतांनी सांगितले, ‘‘आपण सतत नामजप करू लागल्यावर उपवास इत्यादी कर्मकांड करायची आवश्यकता नसते. नामजप हाच उपवास !’’
नाम घेता ग्रासोग्रासी तो नर जेवूनी उपवासी ।
नाम घेता वाट चाली यज्ञ पावलोपावली ।।
अर्थ : जो मनुष्य प्रत्येक घासागणिक भगवंताचे नाम घेतो, त्याने जेवूनही उपवास केल्याप्रमाणेच आहे. नामस्मरण करत वाट चालल्यास पावलोपावली यज्ञ केल्याप्रमाणे आहे.
हे समजल्यावर मी सर्व उपवास आणि पूजा इत्यादी करणे थांबवले.
– सौ. संगीता लोटलीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६४ वर्षे), फोंडा, गोवा. (२२.२.२०२४) ( क्रमश: )
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |