Rahul Gandhi Going To Pandharpur : हिंदूंना हिंसाचारी म्हणणारे राहुल गांधी पंढरपूर येथे जाऊन विठुरायाचे दर्शन घेणार !
मुंबई – आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे १३ किंवा १४ जुलै या दिवशी पंढरपूर येथे येऊन विठुरायाचे दर्शन घेणार आहेत. याविषयी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने दुजोरा दिला आहे. यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राहुल गांधी यांना वारीमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. यावरून त्यांच्यावर भाजपकडून टीका केली जात आहे.
हिंदूंचा कायम तिरस्कार करणार्या राहुल गांधी यांना वारीत येण्याचे निमंत्रण द्यायचा शरद पवार यांना अधिकार कुणी दिला ? – आचार्य तुषार भोसले यांची टीका
हिंदूंना हिंसक म्हणणार्या आणि हिंदूंचा कायम तिरस्कार करणार्या राहुल गांधीना आषाढी वारीत येण्याचे निमंत्रण द्यायचा मौलाना शरद पवारांना कुणी अधिकार दिला ? अशी टीका करत भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे नेते आचार्य तुषार भोसले यांनी महाविकास आघाडीसह राहुल गांधी अन् शरद पवारांवर टीका केली आहे. ‘शरद पवार यांच्या गावातून तुकोबांची पालखी शेकडो वर्षांपासून जाते; पण शरद पवार यांचे त्यांच्या ८४ वर्षांच्या आयुष्यात कधी वारीकडे पाय वळले नाहीत आणि ते कोणत्या तोंडाने राहुल गांधी यांना निमंत्रण देत आहेत ?’ असा प्रश्नही तुषार भोसले यांनी केला आहे.
इप्तार पार्ट्या झोडणार्यांना आजपर्यंत कधी वारी दिसली नाही ?
शरद पवार ७ जुलैला तुकोबांच्या पालखीत वारकर्यांसह चालणार, अशा चर्चा मधल्या काळात होत होती; मात्र याविषयी स्वत: शरद पवार यांनी स्पष्टीकरण देत ‘मी वारीत चालणार नसून वारी माझ्या गावावरून जाते, त्यामुळे केवळ पंढरपूरला जाणार्या पालखीच्या स्वागतासाठी मी थांबणार’, असे सांगितले. याच सूत्रावरून तुषार भोसले यांनी ‘कायम इप्तार पार्ट्या झोडणारे शरद पवार आणि राहुल गांधी यांना आजपर्यंत कधीच वारी अन् वारकरी दिसले नाहीत; मात्र आता महाराष्ट्राच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन तुम्ही वारीत यायला बघत आहात, हे न कळायला महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाही, हे लक्षात ठेवा’, अशा शब्दांत पवारांवर टीका केली आहे.
दिंडीतील सहभागानंतर तरी देव आणि धर्म यांविषयी सहभागी नेतेमंडळींची श्रद्धा वाढीस लागावी ! – रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, राष्ट्रीय प्रवक्ता, वारकरी संप्रदाय पाईक संघ
हल्ली अनेक राजकीय पक्षांची नेतेमंडळी जी अक्षरशः व्यक्तीगत जीवनात देव-धर्म मानत नाहीत, तेसुद्धा काही क्षण ‘वारी’ ‘इव्हेंट’साठी येतातच. हरकत नाही, ‘खट नट यावे शुद्ध होऊनिया जावे।’ ही संप्रदायाची भूमिकाच आहे. त्यामुळे ‘यारे यारे लहान थोर । याती भलते नारीनर ।।’ सर्वांचेच स्वागत आहे; मात्र दिंडीतील सहभागानंतर तरी देव आणि धर्म यांवर सहभागी नेतेमंडळींची श्रद्धा वाढीस लागून ‘जे खळांची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रती वाढो ।’ हे माऊलींचे पसायदान फलश्रुत व्हावे, एवढीच वारकर्यांना अपेक्षा आहे.
संपादकीय भूमिका‘वारकर्यांना हे मान्य आहे का ?’ असा प्रश्न येथे उपस्थित होतो ! ‘देवाच्या द्वारी सगळेच समान आहेत’, असा हिंदूंचा भाव असल्याने दर्शनाला कुणी विरोध करणार नाही; मात्र हिंदूंनी ८०० वर्षे एक परंपरा कायम ठेवली आहे, त्या सहिष्णु हिंदूंना केवळ मुसलमानांच्या मतांसाठी हिंसाचारी म्हणायचे, हा दुटप्पी आणि ढोंगीपणा थांबवण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने प्रयत्न केले पाहिजेत ! |