Eknath Shinde : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’साठी अडवणूक किंवा पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
दलाल खपवून घेतले जाणार नाहीत !
मुंबई, ३ जुलै (वार्ता.) – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, आवेदन (अर्ज) भरून घेणे यांसह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक आणि प्रकियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करत असल्याचे निदर्शनास आल्यास असे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असा कठोर आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३ जुलै या दिवशी प्रशासनाला दिला आहे. त्याचसमवेत ‘ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने होईल, याकडे जिल्हाधिकार्यांनी लक्ष ठेवावे. या योजनेचे संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विभागीय अधिकार्यांची नियुक्ती करण्यात यावी’, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
‘या योजनेच्या संदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करून देणे किंवा आवेदन भरून देण्याचे निमित्त करून निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. एखाद्या कार्यालयात असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित कार्यालय प्रमुखावर, तसेच दलालांवर कठोर कारवाई करण्यात येईल’, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
योजनेसाठी नावनोंदणी आणि आवेदन करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन आवेदन करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे.