Bengal Woman Suicide : बंगालमध्ये विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून महिलेला मारहाण झाल्याने तिने केली आत्महत्या !
तृणमूूल काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप
कोलकाता (बंगाल) – बंगालच्या दक्षिण दिनाजपूर येथे काही दिवसांपूर्वी विवाहित मुसलमान महिला आणि तिचा प्रियकर यांना तृणमूल काँग्रेसचा स्थानिक पदाधिकारी ताजमूल इस्लाम याने भर रस्त्यात अमानुष मारहाण केली होती. ही माहिती उघड झाल्यानंतर आता अशाच प्रकारची आणखी एक घटना बंगालमध्येच घडल्याचे समोर आले आहे. बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यातील फुलबारी गावात २९ जून या दिवशी एका महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा करत तिला मारहाण झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. समाजातील लोकांनी मारहाण केल्यानंतर आलेल्या मानसिक दडपणातून तिने आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली आहे.
१. महिलेच्या पतीने आरोप केला की, माझ्या पत्नीने विष पिऊन आत्महत्या केली. काही गावकर्यांनी तिला पंचायतीच्या समोरच मारहाण केली. मी त्यासंदर्भात पोलिसांत तक्रार केली आहे. मी त्यांना सांगितले आहे की, माझ्या पत्नीला गावातील महिलांनी पंचायतीसमोर बोलवून मारहाण केल्याचा धक्का सहन झाला नाही. त्या दबावात तिने आत्महत्या केली आहे.
२. सदर महिलेचे गावातीलच एका तरुणाशी विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करण्यात येत आहे. गेल्या १० दिवसांपासून ती बेपत्ता होती. तिच्या पतीनेच ती बेपत्ता असल्याची तक्रारही केली होती. २९ जून या दिवशी तिचा ठावठिकाणा समजला आणि त्या महिलेला पुन्हा गावात बोलावण्यात आले.
३. पतीने सांगितले की, माझी पत्नी गावात परतल्यानंतर तिला पंचायत प्रमुखांनी पाचारण केले. त्यांच्यासमवेत तृणमूल काँग्रेसच्या नेत्या मालती रॉय आणि त्यांचे पती शंकर रॉय हेही होते. जेव्हा आम्ही तिथे पोचलो, तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला आणि माझ्या पत्नीला मारहाण करायला चालू केले.
४. मालती रॉय आणि शंकर रॉय यांनी आरोप फेटाळले आहेत. शंकर रॉय म्हणाले की, आम्ही पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) करणार होतो; पण त्याऐवजी आम्ही पंचायतीकडे आलो. सदर महिला याआधीही एकदा एका तरुणासोबत पळून गेली होती. कदाचित् त्यामुळे त्यांच्या शेजार्यांनी या महिलेला बोलवून तिला मारहाण केली असेल. आम्ही तर तिथे उपस्थितही नव्हतो. मी तिथे पोचलो, तेव्हा तिथे बैठक चालू होती. त्यावेळी सदर महिला म्हणाली की, तिला प्रसाधनगृहात जायचे आहे. काही वेळाने आम्हाला समजले की, या महिलेने आम्ल पिऊन आत्महत्या केली.
संपादकीय भूमिकाबंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची आवश्यकता असल्याचे अशा घटनांतून प्रतिदिन लक्षात येत असतांना त्याविषयी काहीही न कऱणारे जनहित काय साधणार ? |