हिरवळीने सजलेला दिवे घाट ओलांडून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवड मुक्कामी !
पालखीचा सर्वांत सुंदर आणि अवघड टप्पा
पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या २ दिवस पुण्यनगरीमध्ये मुक्काम करून २ जुलै या दिवशी पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. हिरवळीने सजलेल्या दिवे घाटाचा प्रवास वारकर्यांसाठी पर्वणीच असते. दिवे घाटातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा सर्वांत सुंदर आणि अवघड टप्पा मानला जातो. हा घाट ओलांडून ‘ज्ञानोबा तुकाराम’ हा जयघोष आणि विठ्ठलाचा नामाचा गजर करत पालखी सोहळा सासवड मुक्कामी पोचला आहे. सासवडला १ दिवस मुक्काम करून पालखी ४ जुलै या दिवशी जेजुरी मुक्कामी असेल. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम यवतला ४ जुलै या दिवशी असेल.
माऊलींच्या स्वागतासाठी सासवडची सिद्धता
पालखी तळ नगरपालिकेकडून स्वच्छ करण्यात आला असून सासवड शहरही स्वच्छ केले आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूस कापडाच्या झालरी लावून विद्युत् रोेषणाई केली आहे. माऊलींच्या पालखीचा जेथे विसावा असेल, त्या परिसरामध्येही विद्युत् रोषणाई केली आहे. नगरपालिकेकडून रस्त्यांवर ३ नियंत्रण कक्ष, १ माऊलींचा स्वागत कक्ष, संत सोपानकाका आणि चांगावटेश्वर प्रस्थान कक्ष, हिरकणी कक्ष सिद्ध केले आहेत.
पादुकांचे दर्शन घेणे हा आनंदाचा क्षण असतो ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेणे, हा आनंदाचा क्षण असतो. त्याच आनंदाचा अनुभव घेण्यासाठी मी पुण्यात आलो आहे. महाराष्ट्रातील पालखी सोहळा आणि वारी खर्या अर्थाने संपूर्ण भारताला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ठेवा दिला आहे, अशी कृतज्ञता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी यांचा मुक्काम पुणे येथे होता. त्या वेळी दोन्ही पालख्यांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते.
सोनसाखळी चोरास अटक
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील गर्दीचा अपलाभ घेत भाविकांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणार्या भगवान गायकवाड या चोरास अटक करण्यात आली आहे. ही घटना भोसरी शहरातील आंबा बसस्थानक, अलंकापूरम आणि देहू फाटा या दरम्यान घडली आहे. या प्रकरणी तुषार काकडे यांची १० ग्रॅमची, तर समीर चंदूरवार यांची १३ ग्रॅमची अशा २ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत.
पुणे मुक्कामी मंगळसूत्र चोरीच्या ३ घटना
भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिर परिसरात एका महिलेचे ५० सहस्र रुपयांचे मंगळसूत्र, नाना पेठेतील श्री निवडुंग्या मंदिर परिसरामध्ये ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ५२ सहस्र रुपयांचे मंगळसूत्र, तर विश्रांतवाडीतील मनोरुग्णालय चौकामध्ये पालखीचे दर्शन घेतांना ७५ सहस्र रुपयांचे मंगळसूत्र चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या गर्दीचा अपलाभ घेत अनेक भाविकांचे भ्रमणभाष चोरल्याच्या तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या आहेत.