प्रत्येक सूत्राचा साधनेच्या दृष्टीने विचार करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
१. ‘आकर्षक सत्संगापेक्षा सात्त्विकता असलेले सत्संग समाजाला देणे आवश्यक आहे’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे : ‘वर्ष २००९ मध्ये बेंगळुरू येथील श्री शंकरा वाहिनीसाठी धर्मसत्संग सिद्ध करण्याची सेवा चालू होती. त्या वेळी धर्मसत्संगाचे काही भाग सिद्ध झाल्यावर ते साधकांनी पाहिले. त्यातील काही साधकांनी विचारले, ‘‘आपण अन्य वाहिन्यांप्रमाणे आकर्षक (सर्व समाजाला आवडतील असे) सत्संग का बनवत नाही ?’’ याविषयी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितले. त्यावर ते म्हणाले, ‘‘आपल्याला आकर्षक सत्संगापेक्षा सात्त्विकता असलेले सत्संग समाजाला द्यायचे आहेत. हे सत्संग पाहून ‘लोकांनी साधनेला आरंभ करावा’, असा आपला उद्देश आहे. आकर्षक सत्संग बनवून केवळ बघणार्यांची संख्या वाढेल. आपल्याला तसे नको आहे. साधनेत कृतीशील होणारे मिळायला हवेत; मग ते संख्येने अल्प असले तरी चालेल.’’
२. ‘मायावी दिसणे कसे असते ?’, हे सर्वांना समजण्यासाठी त्याचे चित्रीकरण करून ठेवण्यास सांगणारे परात्पर गुरु डॉ. आठवले ! : वर्ष २०१० मध्ये एका साधिकेची त्वचा गुलाबी झाली होती. तिचा नियमित वापरातील पोशाखही गुलाबी झाला होता. परात्पर गुरु डॉक्टरांनी त्याचे मला सूक्ष्म परीक्षण करण्यास सांगितले. त्या वेळी ‘ते मायावी आहे’, असे माझ्या लक्षात आले. त्या साधिकेला ‘हे मायावी आहे’, असे सांगितले नव्हते. ‘त्याचे चित्रीकरण मिळावे’, यासाठी त्यांनी त्या साधिकेला दुसर्या एका साधिकेची मुलाखत घेण्यास सांगितले. ती मुलाखत झाल्यावर परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘बरे झाले. चित्रीकरण मिळाले. पुढच्या पिढ्यांना मायावी दिसणे कसे असते ?, ते समजेल.’’ परात्पर गुरु डॉक्टरांची दूरदृष्टी या प्रसंगातून मला अनुभवता आली.’
– एक साधिका, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.१.२०२४)