Cancer Causing Pani Puri : कर्नाटकात पाणीपुरीत आढळली कर्करोग निर्माण करणारी रसायने !
बेंगळुरू – कर्नाटकात विकल्या जाणार्या पाणीपुरीत कर्करोगसारख्या घातक आजाराला कारणीभूत ठरणारी रसायने सापडली आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने चाचणीसाठी २६० ठिकाणांहून पाणीपुरीचे नमुने गोळा केले होते. त्यांपैकी ४१ नमुन्यांमध्ये कृत्रिम रंग आणि कर्करोग निर्माण करणारे घटक आढळून आले. १८ नमुने इतके खराब होते की, ते वापरण्या योग्य मानले जाऊ शकत नाहीत, असे या अहवालात म्हटले आहे.
रस्त्याच्या कडेला विकल्या जाणार्या पाणीपुरीच्या दर्जाविषयी कर्नाटकातील विविध भागांतून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण विभागाने ही चाचणी चालू केली. आयुक्त श्रीनिवास के. यांनी सांगितले की, आम्ही रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रेत्यांनासून ते मोठ्या रेस्टॉरंटपर्यंत नमुने गोळा केले होते. यांतील अनेक नमुने शिळे आणि वापरण्यास अयोग्य आढळले. कर्नाटकमध्ये पाणीपुरीच्या नमुन्यात चमकदार निळा आणि पिवळा खाद्य रंग आढळला, तसेच ‘टार्ट्राझिन’सारखे रसायन आढळून आले आहे.
राज्यात अन्नसुरक्षेला प्राधान्य ! – आरोग्यमंत्री
कर्नाटक सरकारने ‘रोडामीन बी’ नावाच्या खाद्य रंगावर बंदी घातली होती. राज्यात अन्नसुरक्षेला आमचे प्राधान्य आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले. लोकांनी ते कोणत्या प्रकारचे अन्न खात आहेत ? आणि त्यांत काय मिसळले जात आहे ?, यांविषयी सजग असावे. स्वच्छता राखण्याचे दायित्व रेस्टॉरंट मालकांचे आहे. त्यांनी ते न राखल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी चेतावणीही आरोग्यमंत्र्यांनी दिली.