नारदांच्या गादीवर (कीर्तनाच्या गादीवर) उभे राहिल्यावर केवळ श्रोता, वक्ता आणि श्री पांडुरंग यांविषयी भावना ठेवून कीर्तन करावे !
‘कीर्तन याचा अर्थ कीर्ती गाणे. मग ती भगवंताची असेल, सद्गुणांची असेल, थोर विभूतींची असेल किंवा ज्येष्ठतर अशा जीवनमूल्यांची असेल.
हे पवित्र कार्य देवर्षि नारदांनी अत्यंत साक्षेपाने, निष्काम बुद्धीने आणि सातत्याने केले; म्हणून त्यांना ‘आद्यकीर्तनकार’ अशी संज्ञा आहे आणि कीर्तनपीठाला ‘नारदांची गादी’ असेही म्हणतात. उत्तम वाणी, उत्तम गाणी, प्रसन्न व्यक्तीमत्त्व असेल, तर कीर्तनाचा उत्तम प्रभाव पडतोच.
कीर्तन हा व्यवसाय म्हणून स्वीकारल्यावर त्याच्या देण्याघेण्यासंबंधीचा व्यवहार जरूर पाळावा; पण एकदा नारदांच्या गादीवर (कीर्तनाच्या गादीवर) उभे राहिल्यावर केवळ श्रोता, वक्ता आणि श्री पांडुरंग यांविषयी भावना ठेवून कीर्तन करावे. लोक हसतात, दाद देतात; म्हणून विनोदाची पायरी खालच्या पातळीवर नेऊ नये किंवा अंगविक्षेप करू नयेत. हा साधा दंडक आहे; पण कित्येक कीर्तनकार भगवान श्रीकृष्णालाही लाज वाटेल, असे कात्यायनी व्रताचे वर्णन करतात, तसेच अनसूयेच्या कसोटीच्या क्षणाचे हिडीस वर्णन करतात. जो पूर्णावतार आणि योगेश्वर आहे, त्याच्या लीला संबंधीचे आख्यान कधी कधी ऐकवत नाही.
कीर्तकाराची गादी म्हणजे अक्षरशः भिकार्याची गादी, असेही स्वरूप कित्येक ठिकाणी पहायला मिळते.
१. ‘साडी द्या. मी लांबवरून येते. मला रिक्षा करावी लागते. तेव्हा लोकांनी आरती टाकतांना (?) विचार करावा’, अशी याचना केली जाते.
२. एक मास एका मंदिरात एका कीर्तनकाराचे कीर्तन होते. तेथील बाई म्हणाल्या, ‘‘आता तुम्ही पुरेसे तांदूळ दिले आहेत, पुढच्या आठवड्यात तुरीची किंवा हरभर्याची डाळ आणा.’’
३. ‘‘मी कीर्तनासाठी परदेशात जाणार आहे, तरी आपण सढळ हाताने साहाय्य करा.’’ हे म्हणणार्या कीर्तनकाराला समाज म्हणाला, ‘‘तिथे जाऊन प्रबोधनाचे दिवे लावणार असाल, तर स्वतःच्या हिमतीवर जा. आमच्या कष्टाच्या पैशावर तुमचा परदेश दौरा कशासाठी ?’’
यात समाजाचे काय चुकले ? या आणि अशा प्रवृत्तीमुळे कीर्तनकाराची श्रेष्ठ असणारी सेवा अपकीर्त होते. अरे, ईश्वरी सत्तेचे तुम्ही वर्णन करता. योगक्षेमाची तो हमी घेतो हे सांगता, तर तुमच्या सांगण्यावर तुमचा विश्वास नाही का ? तुम्ही अशी मागणीची झोळी का पसरता ? हे अत्यंत लांछनास्पद नाही का ?
तुम्हाला ज्या मानधनाची अपेक्षा आहे, ते स्पष्टपणे सांगा. यात काहीही गैर नाही; पण ‘कीर्तन चालू असतांना आपण ईश्वरी सत्तेचे-भगवंताचे भाट आहोत’, असे मानून ‘आपल्या वृत्तीची दैन्यावस्था दाखवू नका’, असे म्हणावेसे वाटते.
कीर्तनाचा कलेच्या माध्यमातून विचार केला, तर ती कला अत्यंत समृद्ध आहे. विषय प्रतिपादन, प्रबोधन हा कीर्तनाचा गाभा आहे. त्यासाठी विषयाचा सखोल अभ्यास हवा. वक्तृत्वात मार्दव, नम्रता आणि रसाळपणा हवा. अशा वक्तृत्वामुळे श्रोत्यांची मने तृप्त होतात आणि कीर्तनाचा हेतू साध्य होतो. ‘कीर्तनाच्या सुखी होय देव’ तो असा !
कीर्तनासाठी राग, स्वर आणि संगीताचे प्राथमिक ज्ञान असायला हवे, नाही तर रसभंग होतो. पाठांतराची क्षमता हवी आणि त्यासाठी सराव हवा, तसेच हजरजबाबीपणा आवश्यक असतो आणि विनोदाची पेरणी केली की, विषय फुलत जातो, असे उत्तम समयोचित विनोद करणारे कीर्तनकार अभावानेच का होईना पण ते आहेत.’
‘संगीताला पाचवा वेद मानतात आणि त्या माध्यमातून परतत्त्वाचा स्पर्श होतो, हा अनुभव, अनुभवी मंडळी सांगतात. त्याचप्रमाणे समरसून केलेले कीर्तनही परतत्त्वाचा स्पर्श करण्याइतक्या सामर्थ्याचे असते, असा अनुभव केवळ संतश्रेष्ठींच्याच नाही, तर सामान्यांनाही येतो. ही एकरूपता श्रोत्यांची असली, तर त्यांना ठाईच बसूनही या अनुपम्य आनंदाचा आस्वाद घेता येतो. श्रवणभक्ती ही नवविधा भक्तीतील प्रथम भक्ती आहे. श्रवणभक्तीमुळेच परिक्षित उद्धरून गेला.’
‘जेथे कीर्तनाची शोभा । तेथे पांडुरंग उभा ।’ म्हणजे ‘जेथे हरिकीर्तन चालू असते, तेथे प्रत्यक्ष पांडुरंग उपस्थित असतो.’ – ह.भ.प. श्रीमती लीला गोळे |
कीर्तनकार हा अष्टावधानी असायला हवा. त्याचा ताल, स्वर व्यवस्थित हवाच; पण त्याचे वक्तृत्व, संगीत आणि प्रतिपादन करत असलेल्या विषयाचे त्याला उत्तम ज्ञान असायला हवे. उत्तम अभ्यासपूर्ण आणि रंगतदारपणे केलेले कीर्तन उत्तम व्याख्यानांवर मात करून जाते.
महाराष्ट्रात ‘नारदीय कीर्तन’ ज्यात पूर्वरंग आणि उत्तररंग, असे दोन विभाग असतात. पूर्वरंगात सिद्धांन्त प्रतिपादन करतात. त्यासाठी संतवाङ्मयाचा, अभंग, पदे, श्लोक इत्यादींचा आधार घेतला जातो आणि उत्तररंगात गोष्टींच्याद्वारे सिद्धांन्त सुलभ करून लोकमानसावर ठसवला जातो.
कीर्तनाचे प्रकार
१. वारकरी कीर्तन
कीर्तनकाराला अर्धचंन्द्राकृती टाळकर्यांनी वेढून एक साथ टाळांच्या गजरात निरूपण केले जाते. याला निरूपणीचे कीर्तनही म्हणतात.
२. रामदासी कीर्तन
कीर्तनकलेला पारमार्थिक परिसस्पर्श व्हावा !
कीर्तन ही कला मानली, तरीही त्यात एकरूपता, एकाग्रता आणि विषयनिष्ठा हवी; कारण कलेलाही पारमार्थिक परिसस्पर्श व्हावा लागतो. कीर्तन हा व्यवसाय म्हणून मानला, तरी त्यात प्रामाणिकपणा, खरेपणा हवा. हाव, तृष्णा, असंतुष्टता वगैरेंना थारा असता कामा नये. ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दांत, ‘ते विहित कर्म असेल आणि ही कर्मफुले ईश्वराला प्रिय असतात.’ प्रत्यक्षात हे असे काहीच जमत नाही; पण काही ठिकाणी तर ‘वरून कीर्तन आतून तमाशा’ करण्यास लोक सरसावले आहेत. काहींच्या जवळ कीर्तनासाठी लागणारी कुवत नसते. अपुरे पाठांतर, बोलण्यातला नेभळेपणा, संगीताच्या संदर्भात साधा ताल किंवा स्वराचा अभाव !
समाज कीर्तनकाराच्या पाया पडतो. त्याला आदराने वागवतो. त्या मानाने बरी बिदागी मिळते. एवढ्यासाठी काहीजण कीर्तनाचा अट्टाहास करतात. या आणि अशा कारणाने ही परम पावनी कीर्तनसेवा नाहक अपकीर्त होते आणि कीर्तनाविषयी जाण नसलेली माणसे या उत्तम प्रबोधन प्रकाराला ‘कालबाह्य’ समजतात. काही कीर्तनकार, तर स्पष्टपणे म्हणतात, ‘‘अहो, व्याख्यानापेक्षा कीर्तनाला जाहिरात न करताही पुष्कळ गर्दी जमते; म्हणून आम्ही हा पेशा पत्करला.’’ माध्यम कोणते का असेना; पण समाजप्रबोधन हे ध्येय यामुळे साध्य होते.’
– ह.भ.प. श्रीमती लीला गोळे (आताची आध्यात्मिक पातळी ६८ टक्के)
(संदर्भ : मासिक ‘प्रसाद’, एप्रिल २०००)