दैवी वाणीतून साधकांना चैतन्य प्रदान करणार्या आणि ‘साधकांवर निरपेक्ष प्रीती करून त्यांची साधना व्हावी’, अशी तीव्र तळमळ असणार्या सद्गुरु स्वाती खाडये !
‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये बेळगाव येथे आल्यावर तेथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. श्री. परशुराम गोरल
१ अ. सद्गुरु स्वाती खाडये जसजशा बेळगावच्या जवळ येत होत्या आणि बेळगाव येथील सभेच्या मैदानात आल्यावर त्यांच्यातील चैतन्यामुळे साधकांच्या सेवा अल्प कालावधीत पूर्ण होणे : ‘बेळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेची सेवा पुष्कळ सावकाश चालू होती. त्या सभेसाठी सद्गुरु स्वाती खाडयेताई येणार होत्या. त्या जसजशा बेळगावच्या जवळ येत होत्या, तसतशी सभेच्या सेवांची गती वाढली. ज्या वेळी सद्गुरु स्वातीताई मैदानात आल्या, त्या वेळी सभेच्या ठिकाणी सेवा करणार्या साधकांना चैतन्य लाभले आणि पुष्कळ अल्प कालावधीमध्ये सर्व सेवा पूर्ण झाल्या.
१ आ. सद्गुरु स्वातीताईंच्या चैतन्यमय आवाजाने झोपी गेलेली एक अपंग मुलगी जागी होणे : हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या ठिकाणी सभा झाल्यानंतर एक साधिका तिच्या अपंग मुलीला घेऊन उभी होती. त्या वेळी सद्गुरु स्वातीताई अन्य जिज्ञासू समवेत बोलत होत्या. तेवढ्यात त्या साधिकेच्या कडेवर झोपलेली मुलगी हुंदके देत जागी झाली. तेव्हा ती साधिका सद्गुरु ताईंना म्हणाली, ‘‘मुलगी झोपली होती; मात्र तुमच्या आवाजातील चैतन्याने ती जागी झाली. मुलीचा भाव जागृत झाला आहे. त्यामुळे तिने तुम्हाला प्रतिसाद दिला.’’
१ इ. सद्गुरु स्वातीताईंनी साधिकेच्या मनातील इच्छा ओळखून तिच्याकडील प्रसाद घेणे : बेळगाव येथे मार्च २०२३ मध्ये सभा झाल्यानंतर एक साधिका सद्गुरु स्वातीताईंना देण्यासाठी श्रीकृष्णाचा प्रसाद घेऊन आल्या होत्या. सद्गुरु स्वातीताई त्या साधिकेच्या समोरूनच मैदानात भ्रमणभाषवर बोलत पुढे पुढे जात होत्या. त्या वेळी ‘सद्गुरु स्वातीताई मागे वळून पहाणार नाहीत. त्यामुळे त्यांना प्रसाद द्यायचा राहून जाईल’, असे साधिकेला वाटले; परंतु अकस्मात् सद्गुरु स्वातीताई मागे फिरून भ्रमणभाषवर बोलत असतांनाही त्या साधिकेच्या जवळ आल्या आणि त्यांच्याशी बोलायला लागल्या. त्या साधिकेने श्रीकृष्णाचा आणलेला प्रसाद सद्गुरु स्वातीताई यांना दिला. त्या वेळी साधिकेची भावजागृती झाली.
१ ई. सद्गुरु स्वातीताईंच्या अस्तित्वामुळे आलेल्या अनुभूती !
१ ई १. गुडघेदुखीचा त्रास बंद होणे : बेळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने मी सद्गुरु स्वातीताईंच्या समवेत चालक म्हणून सेवेला होतो. तेव्हा अकस्मात् माझ्या उजव्या पायाचा गुडघा दुखायला लागला. ‘मला चालता येणार नाही’, असे वाटत होते. मी प्रार्थना करून सेवा करत राहिलो. त्यानंतर मला होणारा गुडघेदुखीचा त्रास आपोआप बंद झाला.
१ ई २. सद्गुरु स्वातीताई थांबलेल्या ठिकाणावर पोचत असतांना चैतन्य मिळणे : मी सद्गुरु स्वातीताईंना एका ठिकाणाहून चारचाकीने आणण्यासाठी जात होतो. सद्गुरु स्वातीताई थांबलेले ठिकाण जसजसे जवळ येत होते, तसतसे मला चैतन्य मिळत होते. माझ्यावरील अनिष्ट शक्तीचे आवरण न्यून होऊन मला साधनेतील आनंद मिळत असल्याची जाणीव होत होती.
१ ई ३. साधकाचा पोटदुखीचा त्रास न्यून होण्यासाठी सद्गुरु स्वातीताईंनी साधकाला थांबवून ठेवणे : पुणे येथे सद्गुरु स्वातीताई मला म्हणाल्या, ‘‘तू अजून थोडा वेळ सेवेसाठी इथेच थांब आणि नंतर तुझ्या बहिणीकडे जा.’’ अनुमाने ३० मिनिटांनी माझ्या पोटात दुखू लागले. हा त्रास वाढू लागल्यावर मी सद्गुरु स्वातीताईंना या त्रासाविषयी सांगितले. तेव्हा माझा त्रास ८० टक्के न्यून झाला. यावरून ‘सद्गुरु स्वातीताईंनी काही वेळाने होणारा त्रास न्यून होण्यासाठी थांबवले होते’, असे मला वाटले.’
१ ई ४. सद्गुरु स्वातीताईंच्या अस्तित्वामुळे जिज्ञासूच्या घरातील छायाचित्रात पालट होणे : एकदा आम्ही सद्गुरु स्वातीताईंच्या समवेत खानापूर येथे एका जिज्ञासूला संपर्क करण्यासाठी गेलो होतो. त्यांच्या घरी जिज्ञासूंच्या आईचे छायाचित्र लावले होते. सद्गुरु स्वातीताई त्या जिज्ञासूच्या पत्नीशी बोलत होत्या. आरंभी मी त्या छायाचित्राकडे पाहिले आणि संपर्क झाल्यानंतर एका घंट्याने पाहिले. संपर्क झाल्यावर ते छायाचित्र स्पष्ट आणि उजळलेले दिसले. तसेच ‘त्या छायाचित्रावरील आवरण न्यून झाले होते’, असे मला वाटले.’
२. सौ. वेदश्री परशुराम गोरल
२ अ. सद्गुरु स्वातीताईंनी साधकांना नामजपादी उपाय शिकवणे आणि ते साधकांकडून करून घेणे : ‘मे २०२३ पासून सद्गुरु स्वातीताई बेळगाव येथे प्रसारासाठी येत होत्या. आरंभी त्यांनी सत्संग घेऊन साधकांना नामजपादी उपायांचे महत्त्व सांगितले. त्या सत्संगात त्यांनी साधकांना ‘प्राणशक्तीवहन पद्धतीने नामजपादी उपाय शोधणे, अनिष्ट शक्तीचे आवरण काढणे’ इत्यादी शिकवले. तसेच ‘साधकांनी प्रतिदिन सकाळी नामजप करावा’, यासाठी सत्संग चालू केला. त्यामुळे साधकांचे आध्यात्मिक त्रास उणावले.
२ आ. सद्गुरु स्वाती खाडये यांनी दिलेले प्रेम आणि त्यांचे अस्तित्व यांमुळे सर्व साधक सेवा अन् साधना यांचे प्रयत्न करू लागणे : सर्व साधक साधनेचे प्रयत्न उत्साहाने करू लागले. जे साधक पुष्कळ दिवसांपासून सेवा आणि साधना यांपासून दूर गेले होते, ते साधकसुद्धा सद्गुरु ताईंचे प्रेम आणि अस्तित्व यांमुळे सेवा अन् साधनेचे प्रयत्न करू लागले. सद्गुरूंच्या केवळ अस्तित्वानेच बेळगाव उत्साही झाले आणि आम्हा मायेत गुरफटलेल्या जिवांना साधनेची नवीन दिशा मिळाली.
२ इ. अनुभूती
२ इ १. आध्यात्मिक त्रासाची तीव्रता वाढल्यावर कौटुंबिक अडचणींसाठी दत्तगुरूंचा नामजप करण्यास सांगितल्यावर त्रासाची तीव्रता न्यून होण्यास साहाय्य होणे : माझ्या आध्यात्मिक त्रासाची तीव्रता वाढल्यावर अनेक वेळा माझ्या मनात नकारात्मक विचार यायचे. यजमानांशी मतभेद होऊन दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. याविषयी सद्गुरु ताईंना सांगितल्यानंतर त्यांनी दत्तगुरूंचा नामजप करण्यास सांगितला. त्यानंतर त्रासाची तीव्रता न्यून होण्यास साहाय्य झाले.
२ इ २. सद्गुरु स्वातीताईंनी साधकांच्या मनावर गुरुपौर्णिमेचे महत्त्व बिंबवल्यामुळे गुरुपौर्णिमेसाठी चांगली उपस्थिती लाभणे : सद्गुरु ताईंनी ‘बेळगाव जिल्ह्यातील सर्व गुरुपौर्णिमेसाठी चांगली उपस्थिती लाभली पाहिजे’, असे साधकांच्या मनावर बिंबवले. त्यांच्या संकल्पाने या वर्षी पहिल्यांदाच ग्रामीण आणि शहरातील सर्व गुरुपौर्णिमांना अपेक्षेहून अधिक उपस्थिती लाभली. यातून सर्व साधकांनी सद्गुरूंच्या संकल्पाची मोठी अनुभूती घेतली.
२ इ ३. सद्गुरु स्वातीताईंच्या समवेत सेवा केल्यावर यजमानांच्या चेहर्यात पुष्कळ पालट जाणवणे आणि यजमान घरी आल्यावर सत्संगातील सूत्रे ऐकतांना घरामध्ये सद्गुरु ताईंचे अस्तित्व जाणवणे : माझे पती श्री. परशुराम गोरल सद्गुरु ताईंच्या समवेत बेळगावमध्ये दौर्यावर वाहन सेवेसाठी जायचे. त्या वेळी सद्गुरु ताई त्यांची पुष्कळ काळजी घ्यायच्या. जेव्हा श्री. परशुराम सद्गुरु स्वातीताईंच्या समवेत असायचे, तेव्हा त्यांचा चेहरा पुष्कळ उजळायचा आणि ते पुष्कळ उत्साही दिसायचे. दौर्यानंतरचे काही दिवस सद्गुरु ताईंच्या सत्संगातील शिकायला मिळालेली सूत्रे ते मला सांगायचे. ते ऐकतांना मला घरामध्ये सद्गुरु ताईंचे अस्तित्व जाणवायचे.’
सर्व सूत्रांचा दिनांक (२०.३.२०२४)