विधान परिषदेत विरोधी पक्षनेत्यांना बोलू न दिल्याने विरोधकांचा सभात्याग !
मुंबई, १ जुलै (वार्ता.) – भारतीय संघाने ‘ट्वेंटी-२० विश्वचषक’ जिंकल्यानंतर खेळाडूंचा अभिनंदन प्रस्ताव विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात सादर केला; मात्र उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी त्यांना सभागृहात बोलू न दिल्यामुळे परिषद सभागृहातून विरोधकांनी सभात्याग करत निषेध व्यक्त केला.
सभागृहातील सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी ‘भाजपच्या क्रिकेट मंडळातील सदस्यांचे अभिनंदन करा’, असा ठराव मांडला. त्यावर ‘विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्षेप घेत मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करणार्या खेळाडूंचे अभिनंदन केले पाहिजे’, असा प्रस्ताव मांडला; मात्र सभापती यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना बोलू दिले नाही. ‘विधान परिषद सभागृहात गेल्या वर्षभरापासून सतत विरोधी पक्षनेते यांना बोलू दिले जात नाही. त्यांचा हक्क डावलला जात असून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न उपसभापतींकडून होत असल्याने ‘आम्ही सभात्याग करत निषेध व्यक्त करतो’, असे दानवे यांनी सांगितले.