योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व जाणा !
१. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग !
२१ जून या दिवशी सर्वत्र ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ साजरा झाला. भारताला काही सहस्रो वर्षांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधनेची परंपरा असून ती शरीर अन् मन यांत परिवर्तन घडवून आणते. भारतीय धर्म संस्कृतीमधील ‘योग’ संकल्पनेची मांडणी ‘श्रीमद्भगवद्गीता’ ग्रंथात केलेली आहे. भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर बळकट ठेवू शकतो, तसेच मनावर चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग ! भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवर बहुतांश देशांनी स्वीकारली असून योगासनांचे लाभ त्यांनीही मोठ्या प्रमाणावर अनुभवले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा.
२. महिलांसाठी ‘योग’ हे व्यापक साधन !
सध्याच्या योगदिनाची संकल्पना ‘महिला सक्षमीकरणासाठी योग’ अशी होती. यामध्ये महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढवण्यावर भर दिला जाईल. महिलांना सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक अन् आध्यात्मिक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ‘योग’ हे व्यापक साधन आहे.
३. योगामुळे होणारे विविध लाभ
३ अ. शारीरिक
१. योग शारीरिक हालचाल आणि लवचिकता वाढवण्यास साहाय्य करतात. त्यातून वेदना न्यून होऊन गतीमानता येते.
२. योगामुळे स्नायू बळकट होऊन मुख्य स्नायूंसह मुद्रा आणि संतुलन सुधारू शकते.
३. योगासने रक्ताभिसरण सुधारून आणि थकवा न्यून करून ऊर्जा पातळी वाढवण्यात साहाय्य करतात. योगामुळे ‘कॅलरी’ जाळली जाते आणि त्यातून चयापचय सुधारते. वजन न्यून होण्यास साहाय्य होते.
४. योगामुळे लवचिकता वाढते. रक्तदाब नियंत्रणात रहातो. रोगप्रतिकारशक्ती वाढते.
३ आ. मानसिक
१. योगामुळे शरीर आणि मन शांत होऊन तणाव न्यून होतो. शांत झोप घेता येते. मानसिक संतुलन सुधारते.
२. योगामुळे चिंता यून होऊन मानसिक आरोग्य सुधारण्यास साहाय्य होते. नैराश्य दूर होते.
३ इ. अन्य
१. निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुण : योगाभ्यासामुळे महिलांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता आणि नेतृत्वगुण विकसित होतो.
२. आत्मसंयम : योगाभ्यासामुळे धैर्य आणि शांतता वाढण्यास साहाय्य होते.
३. आत्मरक्षण : काही योगासनांमुळे आत्मरक्षणासाठी आवश्यक असलेली शारीरिक क्षमता आणि सतर्कता वाढण्यास साहाय्य होते.
४. महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न होणे आवश्यक ! : खरे तर महिला सक्षम नाहीत; म्हणून महिलांचे आरोग्य आणि सक्षमीकरण यांविषयी जागृती निर्माण करणारे कार्यक्रम आयोजित करावे लागतात. सक्षमीकरणासाठी शौर्य, साहस असणे आवश्यक आहे. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अनेक ठिकाणी शौर्यजागृती शिबिरे आयोजित केली जातात. अशा शिबिरांच्या माध्यमातून महिला शक्तीशाली होतील.
– श्री. दिलीप देशपांडे, जामनेर, जळगाव.