नालंदा विद्यापीठ म्हणजे भारताच्या सुवर्णकाळाचे पुनरुज्जीवन !
इस्लाम आणि ब्रिटीश यांच्या साम्राज्यवादाचे १ सहस्र वर्षांचे अंधकारयुग संपले, तरी मनातील गुलामीच्या भावनेचा काळोख दूर झाला नाही आणि चहूबाजूला पसरलेल्या गुलामीच्या खुणाही तशाच राहिल्या. वर्ष २०१४ नंतर हा काळोख, या खुणा दूर करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतले. मोदी यांनी गुलामीच्या खुणा दूर करत भारतियांचा आत्मसन्मान जागृत केला. नालंदा विद्यापिठाची पुर्नउभारणी हे भारताच्या पुनरुत्थानाच्या दिशेने टाकलेले असेच एक महत्त्वाचे पाऊल आहे.
भारताच्या सामर्थ्याची ओळख करून देणारे नालंदा ‘कॅम्पस’ ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी
उद्घाटनप्रसंगी केलेल्या आपल्या प्रेरणादायी भाषणात पंतप्रधान मोदी यांनी सांगितले, ‘‘आगीच्या ज्वाळांमध्ये पुस्तके जाळून टाकली, तरी ज्ञान संपवता येत नाही. नालंदा विद्यापिठाची पुनर्स्थापना हा भारताच्या सुवर्णयुगाचा प्रारंभ आहे. हे ‘कॅम्पस’ जगाला भारताच्या सामर्थ्याची ओळख करून देईल. जे राष्ट्र मानवी मूल्यांच्या आधारावर उभे असते, तेच इतिहासावरील खोटेपणाची आवरणे काढून उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करू शकते. नालंदाचा इतिहास भारतासह इतर अनेक देशांशी जोडला गेलेला आहे; म्हणूनच या प्रकल्पातील इतर अनेक देशांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. शिक्षणाला सीमा नसतात. त्यामुळे प्राचीन काळात अनेक देशांमधील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी इथे येत असत. आजही २० हून अधिक देशांमधील विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत. नालंदा विद्यापीठ हे ‘वसुधैव कुटुम्बकम्’ (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे.), या भारतीय मूल्याचे खरेखुरे प्रतीक आहे. भगवान बुद्धांच्या संदेशानुसार ‘मानवतेला नवा मार्ग दाखवण्याचे काम हे ‘कॅम्पस’ करील.’’
– श्री. अभिजित जोग
१. बख्तियार खिलजीने नालंदा विद्यापिठाला आग लावण्यामागील कारण आणि त्याचे क्रौर्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ जून २०२४ या दिवशी बिहारमधील राजगीर येथे नालंदा विद्यापिठाच्या नव्या कॅम्पसचे (महाविद्यालयाची वा विद्यापिठाची इमारत अन् त्यांच्या परिसरातील आवार) उद्घाटन केले. ५ व्या शतकात गुप्त साम्राज्याच्या काळात स्थापन झालेले नालंदा विद्यापीठ प्राचीन जगतातील ज्ञानार्जनाचे एक महान केंद्र होते. नालंदा विद्यापिठाच्या भव्य परिसरात २ सहस्र अध्यापक कोरिया, जपान, ग्रीस, इंडोनेशिया, कंबोडिया, चीन, पर्शिया येथून आलेल्या १० सहस्र विद्यार्थ्यांना विविध विषयांचे ज्ञानदान करत असत. नालंदा विद्यापीठ हे शिक्षणासह संशोधन आणि ज्ञानाच्या निर्मितीचेही मोठे केंद्र होते. इथल्या ग्रंथालयातील लाखो ग्रंथांमध्ये भारताच्या पारंपरिक ज्ञानाचा प्रचंड मोठा खजिना विद्यार्थी आणि संशोधक यांना अभ्यासासाठी उपलब्ध होता. वर्ष ११९३ मध्ये बख्तियार खिलजीने नालंदा विद्यापिठाला आग लावली आणि संपूर्ण विद्यापीठ भस्मसात् करून टाकले. बख्तियार खिलजी हा अतिशय शूर; पण कमालीचा धर्मवेडा, काफिरांचा द्वेष करणारा तुर्की सरदार होता. महंमद घोरीसह भारतात आलेल्या बख्तियार खिलजीने, कुतुबुद्दीन ऐबकच्या सैन्यात आपल्याला महत्त्वाचे स्थान मिळत नाही, हे पाहून पूर्वेला बिहारमध्ये त्याने स्वतःच्या स्वतंत्र मोहिमा चालू केल्या. त्याच्या मोहिमा म्हणजे जुलूम, अत्याचार, कत्तली, मंदिरांचा विध्वंस, बलात्कार, लुटालूट यांचा प्रलयंकारी आविष्कार होता.
असे म्हणतात की, एकदा तो पुष्कळ आजारी पडला असता त्याला कुणीतरी नालंदा विद्यापिठातील आयुर्वेद विभागाचे प्रमुख आचार्य राहुल श्रीभद्र यांची भेट घेण्याचे सुचवले. काफिरांकडून कुठलेही उपचार घेण्यात कमीपणा वाटून खिलजीने अट घातली, ‘तुम्ही दिलेले कोणतेही औषध मी घेणार नाही.’ यावर वैद्यराजांनी त्याला सांगितले, ‘तू औषध घेऊ नकोस; पण प्रतिदिन न चुकता कुराणाचे पठण करत जा.’ वैद्यराजांनी खिलजीच्या नकळत कुराणाच्या पानांना औषध चोपडून ठेवले. बख्तियार खिलजीला पाने उलटतांना बोटाला थुंकी लावण्याची सवय होती. त्यामुळे पोटात औषध जाऊन तो हळूहळू बरा झाला. स्वतःचा आजार दूर केल्याविषयी कृतज्ञता बाळगण्याऐवजी खिलजीला भारतीय वैद्यांचे ज्ञान आपल्या हकिमांपेक्षा उच्च दर्जाचे असल्याचा राग आला. त्याचा दुखावलेला अहंकार त्याला स्वस्थ बसू देईना. इस्लामची शिकवण असे सांगते, ‘इस्लामच्या उदयाच्या आधीचा काळ हा ‘जाहिलियत’, म्हणजेच अडाणीपणाचा कालखंड होता. जगातील सगळे ज्ञान कुराणमध्ये असतांना जाहिलियतच्या कालखंडातील ज्ञानाची आवश्यकताच काय ?’, ही भावनाही खिलजीच्या मनात होती. शेवटी त्याने काफिरांच्या ज्ञानाचे भंडार असलेल्या नालंदा विद्यापिठाला आग लावली, तेथील गुरुजन आणि देश-विदेशातून आलेले विद्यार्थी यांची कत्तल केली. तिथल्या ग्रंथालयातील ९० लाख ग्रंथ ३ मास जळत होते. इतिहासकार मिनाझ-ई-शिराझ याने त्याच्या ‘तबाकत-ई-नसीरी’ या ग्रंथात खिलजीने केलेली कत्तल, तलवारीच्या धाकाने घडवलेले धर्मांतर आणि ग्रंथालयांचा संहार यांविषयी लिहून ठेवले आहे. तो म्हणतो, ‘जळणार्या ग्रंथांमधून निघणार्या धुराचा पडदा कित्येक दिवस आजूबाजूच्या टेकड्यांवर पसरला होता.’
२. साम्यवादी इतिहासकारांनी नालंदाचा विध्वंस बख्तियार खिलजीने केल्याचे नाकारणे
साम्यवादी इतिहासकारांनी अर्थातच ‘नालंदाचा विध्वंस बख्तियार खिलजीने केला’, हे नाकारण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. ‘हिंदु आणि बौद्ध यांच्यातील भांडणामुळे हिंदूंनी ग्रंथालयाला आग लावली, एकमेकांत खेळणार्या गुराख्यांच्या पोरांकडून चुकून एक पेटता बोळा पडला आणि आग पसरली…’, असे अनेक हास्यास्पद सिद्धांत या ‘एमिनंन्ट हिस्टरियन्स’नी (प्रख्यात इतिहासकारांनी) मांडले. ‘तबाकत-ई-नसीरी’ यांसारखे ठोस पुरावे नसते, तर त्यांनी त्यांना हवा तोच इतिहास लादला असता. आजही या घटनेविषयी वेगवेगळी मते असल्याची मखलाशी ते करतातच. ‘स्वतःच्या प्रतिपादनासाठी गैरसोयीचे ठरेल, अशा घटनेविषयी कुठलाही पुरावा नसतांना आपणच वेगळी मते ठोकून द्यायची आणि या घटनेविषयी वेगवेगळी मते असल्याचे सांगून तिच्या सत्यतेविषयी संशय निर्माण करायचा’, ही या मंडळींची हातखंडा खेळी असते. यानंतर खिलजीने विक्रमशीला आणि ओदांतपुरी या बिहारमधील इतर प्रमुख विद्यापिठांनाही आगी लावून असाच विनाश घडवला. या संपूर्ण विध्वंसात भारताच्या ज्ञान परंपरेची किती भयंकर हानी झाली असेल, याची कल्पनाच न केलेली बरी !
३. नालंदा विद्यापिठाच्या पुनरुज्जीवनाविषयी काँग्रेसची उदासीनता आणि चालढकलपणा !
अशा या वैभवशाली विद्यापिठाचे पुनर्निर्माण हा देशासाठी गौरवाचा क्षण आहे; पण देशाच्या आनंदात मोकळ्या मनाने सामील झाले तर ते काँग्रेसवाले कसले ! त्यांनी लगेच ‘डॉ. मनमोहन सिंह यांच्या शासन काळात चालू झालेल्या या प्रकल्पाचे उद्घाटन मोदींनी केले’, असा गोंधळ चालू केला. खरे तर अशा आनंदाच्या प्रसंगी राजकीय चिखलफेक व्हायला नको; पण ‘मोदीद्वेषातून सांगितलेले हे असत्य सत्य म्हणून प्रस्थापित होऊ नये’, यासाठी खरे काय हे समजून घेतलेच पाहिजे.
वर्ष २००६ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी ‘नालंदा विद्यापिठाचे पुनरुज्जीवन केले जावे’, अशी सूचना केली. त्यावर या पुनरुज्जीवनाची रूपरेषा ठरवण्यासाठी मनमोहन सिंह सरकारने अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांच्या अध्यक्षतेखाली ‘नालंदा मेंटॉर ग्रुप’ची जून २००७ मध्ये स्थापना केली आणि त्यांना ३ मासांत अहवाल देण्यास सांगितले. अमर्त्य सेन यांची परकीय मुसलमान आक्रमकांविषयीची मते ही त्यांचे अत्याचार लपवणारी आणि नाकारणारी होती. त्यामुळे बख्तियार खिलजीच्या धर्मांधपणामुळे नष्ट झालेले नालंदा विद्यापीठ पुन्हा उभे करण्यासाठी त्यांची निवड अयोग्यच होती. त्यामुळे समितीला अहवालासाठी एकूण तब्बल ३ वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. शेवटी वर्ष २०१२ मध्ये अमर्त्य सेन यांचीच ‘कुलपती’ म्हणून नेमणूक झाली. वर्ष २०१४ पर्यंत या प्रकल्पाची काहीही प्रगती झाली नाही.
४. नालंदा विद्यापिठाच्या समितीने केलेल्या अवाढव्य व्ययाविषयी महालेखापरीक्षकांचे ताशेरे
या मधल्या काळात व्यय मात्र बेबंदपणे होत गेला. अमर्त्य सेन यांच्या सोयीसाठी समितीच्या बैठका न्यू यॉर्क, टोकियो, सिंगापूर येथे होत राहिल्या. वर्ष २००७ ते वर्ष २०१४ या कालावधीत २ सहस्र ७३० कोटी रुपये व्यय झाला आणि हाती काहीच लागले नाही. या सर्व व्यवहारावर ‘कॅग’ने (महालेखापरीक्षकांनी) कठोर ताशेरे ओढले.
५. नालंदाची नवी वाटचाल
शेवटी नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात या प्रकल्पावर खर्या अर्थाने काम चालू झाले. आता जागितक कीर्तीचे अर्थतज्ञ अरविंद पांगरिया हे कुलपती, तर प्रा. अभय कुमार सिंग हे ‘कुलगुरु’ म्हणून नालंदाचे नेतृत्व करत आहेत. जागतिक कीर्ती प्राप्त करून गतवैभवाला पोचण्याच्या दिशेने नालंदाची वाटचाल आता चालू झाली आहे. नालंदा विद्यापिठात सध्या ‘बुद्धिस्ट स्टडीज्’, ‘तत्त्वज्ञान आणि धर्मशास्त्र’, ‘इतिहास’, ‘पर्यावरण’, ‘भाषा आणि साहित्य’, ‘व्यवस्थापनशास्त्र’, असे विविध विभाग चालू करण्यात आले आहेत. या विषयांमध्ये पदवी, पदव्युत्तर, तसेच ‘डिप्लोमा’ (पदविका) आणि ‘सर्टिफिकेट’ (प्रमाणपत्र) कोर्सेस चालवले जातात. इतर अनेक विषयही टप्प्याटप्प्याने चालू करण्यात येतील. ४०० एकरवर पसरलेल्या या विस्तीर्ण ‘कॅम्पस’मध्ये १५० एकरवर वृक्षराजी, तर १०० एकरवर तलाव आहेत. साडेसहा मेगावॅट सौरऊर्जा निर्माण करण्याची क्षमता असलेले ‘सोलर पार्क’ हे ‘कॅम्पस’ जगातील सगळ्यात मोठे ‘कार्बन झिरो कॅम्पस’ (कार्बन उत्सर्जन शून्य असणारा परिसर) आहे. जगप्रसिद्ध वास्तूविशारद बी.व्ही. दोशी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या कॅम्पसमध्ये चिरपुरातन भारतीय संस्कृतीचा नित्य, नूतन आधुनिकतेशी झालेल्या समन्वयाचा अप्रतिम आविष्कार आढळतो.
६. नालंदा विद्यापीठ पुन्हा उभे रहाणे ही देशाच्या उज्ज्वल भविष्याची नांदी !
वर्ष २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुलामगिरीचा काळोख, त्यांच्या खुणा दूर करण्याचे काम हाती घेतले. भारतीय नौदलाच्या ध्वजावरचे चिन्ह पालटणे, ‘राजपथ’चे नाव पालटून ‘कर्तव्यपथ’ करणे, जम्मू-काश्मीरला देशापासून तोडणारे आणि विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रहित करणे, भव्य श्रीराममंदिराची उभारणी करणे, संसदेत ‘सेंगोल’ची (धर्मदंडाची) स्थापना करणे, अशी अनेक पावले उचलून मोदी यांनी भारतियांचा आत्मसन्मान जागृत केला. भारताच्या ज्ञानपरंपरेचा सर्वोच्च आविष्कार असलेले नालंदा विद्यापीठ पुन्हा उभे रहाणे, ही देशाच्या उज्ज्वल भविष्याची नांदी आहे.
– श्री. अभिजित जोग, ‘असत्यमेव जयते’ आणि ‘जगाला पोखरणारी डाव्यांची वाळवी’ या पुस्तकांचे लेखक, पुणे.
(साभार : श्री. अभिजित जोग यांचे फेसबुक आणि साप्ताहिक ‘विवेक’, मराठी)