हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांच्या कार्यासाठी त्याग करणे, हीच गुरुतत्त्वाला काळानुसार अपेक्षित असलेली गुरुदक्षिणा !
‘गुरुपौर्णिमा हा गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि गुरुकार्याच्या वृद्धीसाठी त्याग करण्याचा संकल्प दिवस असतो. व्यापक स्वरूपाचे गुरुकार्य म्हणजे हिंदु धर्माचे कार्य आणि सध्याच्या काळानुसार व्यापक गुरुकार्य म्हणजे धर्मसंस्थापनेचे कार्य अर्थात् हिंदु राष्ट्र संस्थापनेचे कार्य ! अध्यात्मातील अनेक अधिकारी संत हे कार्य करत आहेत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी अशा संतांच्या मार्गदर्शनाखाली हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांच्या कार्यासाठी तन-मन-धन यांचा त्याग करण्याचा संकल्प करणे, हीच गुरुतत्त्वाला काळानुसार अपेक्षित असलेली गुरुदक्षिणा ठरेल.
त्याग ही हिंदु धर्माची शिकवण आहे. तन-मन-धन यांचा आणि पुढे सर्वस्वाचा त्याग केल्याविना आध्यात्मिक उन्नती होत नाही. तनाचा त्याग करणे म्हणजे शरिराने राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणे, मनाचा त्याग म्हणजे नामस्मरण करणे किंवा राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याचे चिंतन करणे आणि धनाच्या त्याग म्हणजे या कार्यार्थ स्वतःकडील धन अर्पण करणे. हा त्याग टप्प्याटप्प्याने केल्यानंतर एक दिवस सर्वस्वाचा त्याग करण्याची मनाची सिद्धता होते. आजच्या काळात सर्वस्वाचा त्याग म्हणजे स्वतःचे संपूर्ण जीवन हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांच्या कार्यासाठी समर्पित करणे होय. धर्मनिष्ठ हिंदू, साधक आणि शिष्य यांना आध्यात्मिक उन्नतीसाठी हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांच्या कार्यासाठी स्वक्षमतेनुसार त्याग करण्याची बुद्धी व्हावी, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था