हिंदु यंत्रणा निर्माण करण्यासाठी प्रत्येक राज्यात हिंदु राष्ट्र समन्वय समितीची स्थापना करणार ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त निश्चित झालेल्या पुढील दिशेविषयी दिली माहिती
फोंडा – दरवर्षी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी देशविदेशांतून येणार्या, तसेच ‘हिंदु राष्ट्र’ संकल्पनेशी जोडलेल्या सर्व हिंदु संघटनांनी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या माध्यमातून वर्षभर कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला आहे. यातून हिंदु ‘इकोसिस्टीम’ (हिंदु यंत्रणा) निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आज काश्मीर, बंगाल आदी प्रांतांतील हिंदूंवरील अत्याचार देशभरात चालू झाले आहेत. त्यामुळे सरकारला हिंदूंच्या प्रश्नांची नोंद घ्यायला लावणारा ‘दबावगट’ कार्यरत करण्यात येणार आहे. सेक्युलरवादाच्या नावे केले जाणारे अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण बंद करण्यात यावे आणि हिंदु समाजावरील अन्यायाच्या विरोधात राष्ट्रीय स्तरावर जनआंदोलन उभारून ‘हिंदु राष्ट्र निर्मिती’च्या कार्याला देशभर गती देण्यात येणार आहे, अशी माहिती ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या समारोपीय पत्रकार परिषदेत दिली.
फोंडा (गोवा) येथील हॉटेल ‘पॅन अॅरोमा’मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी ‘गोमंतक मंदिर महासंघा’चे राज्य सचिव श्री. जयेश थळी, ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’चे गोवा राज्य सचिव अधिवक्ता नागेश जोशी आणि ‘हिंदु जनजागृती समिती’चे दक्षिण गोवा राज्य समन्वयक श्री. सत्यविजय नाईक उपस्थित होते. २४ ते ३० जून २०२४ या कालावधीत श्रीरामनाथ देवस्थान, फोंडा, गोवा येथे पार पडलेल्या ७ दिवसीय हिंदू अधिवेशनात अमेरिका, सिंगापूर, घाना (दक्षिण अफ्रिका), इंडोनेशिया आणि नेपाळ या देशांसह भारतातील २६ राज्यांतील विविध संघटनांचे १ सहस्र हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते.
श्री. सुनील घनवट यांनी मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे
१. या अधिवेशनात भारत आणि नेपाळ यांना हिंदु राष्ट्र घोषित करणे; काशी-मथुरा आदी हिंदूंची मंदिरे अतिक्रमणमुक्त करून हिंदूंना देणे आदी सूत्रांवर चर्चा झाली.
२. धर्मांतर आणि गोवंश हत्या विरोधी कठोर कायदा करणे, मंदिरांचे सरकारीकरण रहित करणे, ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ अन् ‘वक्फ’ कायदे रहित करणे, लोकसंख्या नियंत्रण कायदा करणे, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, श्रीराम सेनेचे श्री. प्रमोद मुतालिक यांच्यावरील गोवा बंदी उठवणे, रोहिंग्या आणि बांग्लादेशी घुसखोरांना बाहेर काढणे, ऑनलाईन रमीसारख्या जुगारांवर बंदी आणणे आदी विषयांवरील ठराव ‘हर हर महादेव’च्या जयघोषात एकमताने संमत करण्यात आले. हे ठराव लवकरच राज्य आणि केंद्र सरकारला पाठवले जातील.
समाजात जागृती करण्यासाठी वर्षभरात विविध उपक्रम राबवणार ! – सत्यविजय नाईक, दक्षिण गोवा राज्य समन्वयक, हिंदु जानजागृती समिती
या अधिवेशनात हिंदु राष्ट्र-स्थापनेविषयी समाजात जागृती आणण्यासाठी समानसूत्री कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’, ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’, ‘मंदिरांमध्ये प्रबोधन बैठक’, ‘देशभरात अनेक ठिकाणी राज्यस्तरीय मंदिर परिषद आयोजित करणे’ ‘लव्ह जिहाद’ तसेच ‘हलाल जिहाद’ यांच्या संदर्भात जनजागृती बैठका अन् आंदोलने’, आदी विविध उपक्रम येत्या वर्षभरात राबवण्याचे अधिवेशनात ठरवण्यात आले आहे. हिंदु धर्मावर नाटक, चित्रपट अथवा अन्य कोणत्याही माध्यमातून आघात झाला, तर त्याला तीव्र विरोध केला जाणार आहे.
हिंदू मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी देशव्यापी अभियान चालवणार ! – जयेश थळी, राज्य सचिव, गोमंतक मंदिर महासंघ
गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत अधिवेशनाद्वारे ‘मंदिर संस्कृती रक्षा अभियान’ राबवण्यात आले. त्यातून ७१० मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली असून अन्य मंदिरांमध्येही वस्त्रसंहिता लागू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मंदिर महासंघाच्या वतीने देशभरात १४ सहस्र मंदिरांचे संघटन झाले आहे. हे संघटन व्यापक करण्यासाठी देशभरातील लहान-मोठ्या मंदिरांनाही यात सहभागी करून घेतले जाणार आहे. यातून मंदिरांची सुरक्षा, संवर्धन करण्यासह मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांप्रमाणे अन्य राज्यांमध्ये मंदिरांचे संघटन करण्यासाठी मंदिर महासंघाच्या वतीने अनेक ठिकाणी राज्यस्तरीय मंदिर परिषदांचे आयोजन करण्यात येणार आहेत. ‘सेक्युलर’ सरकारने देशभरात हिंदूंच्या साडेचार लाखांहून अधिक मंदिरांचे सरकारीकरण केले आहे. ही मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी देशव्यापी अभियान राबवण्यात राबवण्यात येणार आहे. त्याचबरोबर मंदिराच्या १०० मिटरच्या परिसरात मद्य-मांस यांवर बंदी घालण्यासाठी घटनात्मक मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे.
हिंदुविरोधी इकोसिस्टमच्या विरोधात लढण्यासाठी अधिवक्त्यांचे संघटना वाढवणार ! – अधिवक्ता नागेश जोशी, हिंदु विधीज्ञ परिषद
या अधिवेशनात देशभरातून २१५ हून अधिवक्ते सहभागी झाले होते. काशी, मथुरा, भोजशाळा आदी प्रमुख मंदिरांच्या मुक्तीसाठी लढा चालू आहे. सध्या देशभरात हिंदुत्वनिष्ठांना द्वेषयुक्त भाषणांच्या खोट्या प्रकरणांमध्ये गुंतवण्याचे काम शहरी नक्षलवाद्यांकडून नियोजनबद्ध पद्धतीने चालू आहे. अनेकदा असा अनुभव येतो की प्रचारतंत्र, प्रशासनतंत्र, न्यायतंत्र यात अनेक कम्युनिस्ट विचारांच्या लोकांचा भरणा आहे. त्यांची एक ‘इकोसिस्टम’ (यंत्रणा) कार्यरत असून ती हिंदु धर्मावर आघात करण्याचा प्रयत्न करत आहे. या ‘इकोसिस्टम’च्या विरोधात लढण्यासाठीही आपल्याला अधिवक्त्यांची संघटन वाढवण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेत झालेली प्रश्नोत्तरे
१. प्रश्न : भाजपचे वर्ष २०१४ मध्ये २८२, वर्ष २०१९ मध्ये ३०३ आणि आता वर्ष २०२४ मध्ये २४० आमदार निवडून आले आहेत, तरीही वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात तेलंगाणा येथील गोशामहलचे आमदार श्री. टी. राजासिंह यांनी संसदेत ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी करतील असे हिंदुत्वनिष्ठ ५० खासदार निवडून आणा’ असे वक्तव्य केले. हे नेमके काय आहे?
श्री. सुनील घनवट : आज प्रत्येक जण स्वत:ला ‘सेक्युलर’ समजतो. देशात आज हिंदू बहुसंख्य असूनही हिंदूंच्या मागण्या प्रखरपणे मांडल्या जात नाहीत; मात्र ‘एम्.आय.एम्.’चे भाग्यनगरचे खासदार असदुद्दीन ओवैसी किंवा महाराष्ट्रात अबू आझमी असो, ते लोकसभा किंवा विधानसभा येथे विकासाची सूत्रे न मांडता त्यांच्या धार्मिक मागण्याच प्रखरपणे मांडत असतात. त्यामुळे संसदेत हिंदुत्वाच्या विचारांचे, हिंदुत्वाचे समर्थन करणारे आणि हिंदूंच्या मागण्या मांडणारे ५० तरी खासदार असावेत, अशी आमदार श्री. टी. राजासिंह यांची मागणी आहे.
२. प्रश्न : महोत्सवातील सत्रांमध्ये महिलांना संधी दिली होती का?
श्री. सुनिल घनवट : एक सत्र पूर्ण महिलांसाठी होते. हिंदुत्वासाठी प्रखरपणे कार्य करणार्या महिला उदा. मुंबई येथील ‘अयोध्या फाउंडेशन’च्या संस्थापिका श्रीमती मीनाक्षी शरण, देहली येथील प्रसिद्ध लेखिका प्रा. मधु पौर्णिमा किश्वर यांसह अनेक महिला या अधिवेशनात सहभागी होत्या आणि अनेकांनी त्यांची भूमिका व्यासपिठावरूनही मांडली
३. प्रश्न : गोव्यात झालेल्या ‘इन्क्वीझिशन’ची माहिती पाठ्यपुस्तकात समाविष्ट केली जाणार आहे का?
श्री. सुनील घनवट : जगभरात ज्या ठिकाणी ‘इन्क्वीझिशन’ झाले, त्या ठिकाणी पोप यांनी क्षमा मागितलेली आहे; मात्र त्यांनी गोव्यात ‘इन्क्वीझिशन’ होऊनही क्षमा मागितलेली नाही. पोप यांनी पोर्तुगिजांनी ‘इन्क्वीझिशन’ लादल्याबद्दल गोमंतकियांची क्षमा मागूनच गोव्यात यावे. हा इतिहास पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे.