Pune Accident : पुणे येथील कात्रज-कोंढवा मार्गावर वारकर्यांचा टेंपो उलटून २० वारकरी घायाळ !
पुणे – येथील कात्रज-कोंढवा रस्त्यावर वारकर्यांचा टेंपो उलटला असून यामध्ये २० वारकर्यांना दुखापत झाली. या प्रकरणी टेंपो चालकाच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना ३० जूनला रात्री उशिरा घडली. या प्रकरणी प्रयागबाई बोखारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार टेंपाचालक नवनाथ चोपडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. घायाळ वारकर्यांवर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. घायाळांमध्ये बहुतांश महिला वारकरी आहेत.
पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या परभणी जिल्ह्यातील वारकर्यांना घेऊन टेंपो मुक्कामी निघाला होता. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील शिवशंभोनगर परिसरात गल्ली क्रमांक १ येथे टेंपोचालक चोपडे यांचे नियंत्रण सुटले. तक्रारदार प्रयागबाई बोखारे यांच्या डोक्याला, हाताला आणि मनगटालाही दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.