पंढरपूर येथील भक्तनिवासांमध्ये भाविकांना अल्प दरामध्ये अल्पाहार, जेवण मिळणार !
पंढरपूर – येथील भक्तनिवासामध्ये येणार्या भाविकांना चांगल्या प्रतीचा अल्पहार, चहा, भोजन मिळावे यांसाठी या उपाहारगृहाचा ठेका देण्यात आला होता; परंतु अधिक दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर मंदिर समितीने उपाहारगृहाचा ठेका रहित करून ते उपाहारगृह स्वत: चालवण्यास घेतले आहे. त्यामुळे भक्तनिवासमधील उपाहारगृहामध्ये भाविकांना अल्प दरामध्ये चहा, अल्पाहार आणि भोजन मिळणार आहे. श्री विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला येणार्या भाविकांना चांगली सुविधा देण्यासाठी मंदिर समितीने भक्तनिवासाची उभारणी केली आहे. त्यामध्ये ३६४ खोल्या असून प्रतिदिन १ सहस्र ५०० हून अधिक भाविक रहात असतात. त्यांच्या चहा, अल्पाहार आणि भोजन यांसाठी उपाहारगृहाची उभारणी करून ते चालवण्यासाठी ठेका दिला होता.
मंदिर समितीने येथे येणार्या भाविकांना चहा, कॉफी, दूध आणि अल्पाहाराच्या दरामध्ये निम्म्याने कपात केली असून जेवणाची थाळी केवळ १०० रुपयांमध्ये उपलब्ध करून दिली आहे. याकडे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि व्यवस्थापक बालाजी पुदलवाड लक्ष ठेवत आहेत.