छत्रपती शिवराय, शंभूराजे, जिजामाता यांची जयंती दिनांकानुसार, तर शिवराज्याभिषेक तिथीनुसार साजरा होणार ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक मंत्री
मुंबई, ३० जून (वार्ता.) – ‘छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि जिजामाता यांची जयंती दिनांकानुसार साजरी केली जाईल. केवळ शिवराज्याभिषेक सोहळा तिथीनुसार साजरा करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. त्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खोटी माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल करू नये’, असे वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २९ जून या दिवशी आव्हाड यांना सुनावले.
‘पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन’द्वारे जितेंद्र आव्हाड यांनी मांडलेल्या सूत्रावर बोलतांना मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, आव्हाड यांनी काही कपोलकल्पित गोष्टी सांगितल्या. ‘जिजामाता, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती दिनांकानुसार न करता तिथीनुसार साजरी करण्यात येईल, असे सुधीर मुनगंटीवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत घोषित केले आहे’, असा दावा त्यांनी केला; पण ‘हे धांदात खोटे आहे. अशी कोणतीही मुलाखत झालेली नाही’, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
‘२० जून २०२४ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर झालेल्या कार्यक्रमात प्रतिवर्षी शिवाजी महाराजांचा सोहळा तिथीनुसार साजरा करावा’, अशी घोषणा करण्यात आली. ही गोष्ट केवळ शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यापुरती मर्यादित आहे. रायगडावरील शिलालेखात राज्याभिषेकाचा दिनांक नसून ‘ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी’ असा तिथीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे राज्याभिषेकाच्या संदर्भात हा निर्णय जाणिवपूर्वक करण्यात आला. त्याव्यतिरिक्त ज्या जयंतीचे दिनांक निश्चित झालेले आहेत, त्याच दिनांकानुसार ती साजरी होईल. तिथीनुसार होणार नाही’, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात सांगितले.
जितेंद्र आव्हाड यांनी भ्रम निर्माण करू नये !मुनगंटीवार म्हणाले की, वर्ष १९६२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या महाराष्ट्र्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या पुस्तकात शिवराज्याभिषेकाच्या संदर्भात अतिशय सविस्तर वर्णन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील एकमेव असे राजे होते, ज्यांनी राज्याभिषेकाच्या दिवशी कालगणनेला स्वतःचे नाव देण्याऐवजी ‘स्वस्ती श्री राज्याभिषेक शक’ असे नाव दिले. त्यादिवशी ६ जून हा दिवस होता. रायगडावरील शिलालेखावरही तिथीचा उल्लेख आहे, दिनांकाचा नाही. त्यामुळे यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस राज्यशासनाच्या वतीने चालू करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली; कारण हे शिवरायांच्या विचारांवर चालणारे सरकार आहे. त्यामुळे आव्हाड यांनी भ्रम निर्माण करणे बंद करावे. |