विद्येचे मंदिर !
नुकताच ‘फेसबुक’वर एक व्हिडिओ पहाण्यात आला. ज्यामध्ये एका शाळेच्या बालवाडीतील मुलांचा शाळेतील पहिला दिवस वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आला होता. शाळेतील शिक्षक मुलांचे स्वागत कपाळावर टिळा आणि कुंकू लावून करत होते, मुलांचे बोट धरून त्यांच्या हाताने ‘ॐ’ काढण्यात आला, तसेच मुले शाळेच्या पायरीला नमस्कार करून शाळेत प्रवेश करत होती. या वेळी सरस्वतीदेवीचे पूजन करण्यात आले. अशी आदर्श संस्कृती आणि परंपरा या शाळेप्रमाणेच इतरही शाळांनी चालू केल्यास खर्या अर्थाने अनेक मुलांच्या शैक्षणिक आयुष्याचा ‘श्रीगणेशा’ होईल आणि या सात्त्विकतेचा लाभ विद्यार्थी अन् शिक्षक या दोघांनाही होईल.
पूर्वी भारतात गुरुकुल शिक्षणपद्धत होती. ‘आचार्यदेवो भव ।’ अशीच प्रतिमा विद्यार्थ्यांच्या मनात सिद्ध होत होती. त्यामुळे आचार्य हे स्वतः साधना करणारे असल्याने विद्यार्थ्यांवरही तसेच संस्कार होत असत. वरील व्हिडिओतील कृतीही त्या दृष्टीने आशादायक दृश्य होते. कपाळावर टिकली, गंध लावण्यास मनाई करणार्या ख्रिस्ती हिंदुद्रोही शाळांच्या पार्श्वभूमीवर संस्कृतीचा आदर्श प्रस्थापित करणारी ही शाळा आदर्शच म्हणावी लागेल. शिक्षक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात पालट घडवत असतात. याप्रमाणे धर्माचरणाचे संस्कार जर लहानपणापासूनच मुलांवर केले, तर पुढे मोठे होऊन ही मुले देशाचे उज्ज्वल भविष्य घडवतील. अशा शिक्षिका ज्या शाळेत असतील, त्या शाळेतून नक्कीच राष्ट्र आणि धर्म प्रेमी पिढी सिद्ध होईल. पूर्वीच्या काळी शाळेत शिकवणार्या शिक्षकांच्या साध्या रहाणीमानाचा आणि विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर होता. त्यांचे सात्त्विक आचार, विचार विद्यार्थ्यांना अनुकरण करण्यास योग्य होते. त्यामुळे शाळेत गेल्यावर आपल्या मुलांवर चांगले संस्कार होतील, याची शाश्वती पालकांना होती; परंतु दुर्दैवाने आज काही शिक्षक त्यांचे चारित्र्य, व्यक्तीमत्त्व गमावून बसत असल्याचे दृश्य बघायला मिळत आहे. हिंदु विद्यार्थ्यांना धर्मानुसार कृती करण्यास विरोध करणे, शाळकरी मुलींशी अश्लील कृत्य करणे यांसारख्या कृतींमुळे काही शिक्षकांची प्रतिमा मलिन होत आहे. काही स्त्री शिक्षिकाही विद्यार्थ्यांशी अत्यंत लज्जास्पद वर्तन करून स्वत:ची मर्यादा ओलांडत आहेत.
विद्यार्थ्यांवर संस्कार करण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. शासनानेसुद्धा ‘उत्कृष्ट दर्जाचे लोक शिक्षकी पेशाकडे कसे वळतील’, हे पाहिले पाहिजे. समाजात ‘सर्वतोपरी अपयशी ठरलेली व्यक्तीच शिक्षणक्षेत्रात येते’, हा समज आता अशा शिक्षकांनी खोटा ठरवावा. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आदर्श विद्यार्थी घडवणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षकांनी ज्ञानार्जन आणि ज्ञानप्रसार यांना वाहून घ्यावयास हवे, तरच ज्ञानदानाचे पवित्र कार्य तेवढ्याच तन्मतेने, उत्कटतेने पार पडेल !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे