ही वेळ आहे जागरूक रहाण्याची…!
लोकसभेतील शपथविधीच्या वेळी ‘इंडी’ आघाडीच्या सदस्यांनी हातात राज्यघटनेची प्रत घेऊन शपथ घेण्याची नौटंकी केली. राज्यघटनेची हत्या करणारी आणीबाणी ज्या दिवशी लादली गेली, त्या घटनेच्या स्मृतीच्या आदल्याच दिवशी काँग्रेसने राज्यघटनेच्या प्रती नाचवणे हास्यास्पद होते आणि त्याच्या दुसर्याच दिवशी भारतीय लोकांची वंशवादी विभागणी करून ‘भारत’ अशी काही वेगळी ओळख असल्याचे नाकारणार्या सॅम पित्रोदा या वावदूक (वाचाळ) गृहस्थाला ‘जागतिक काँग्रेस’चे अध्यक्षपद पुन्हा बहाल केले. यातून काँग्रेसने तिला राज्यघटनेची किती चाड आहे, हे दाखवून दिले आणि निवडणुकीच्या वेळी पित्रोदा यांच्यावर झालेली कारवाई ही जनतेच्या डोळ्यांत केलेली धूळफेक होती, हेही स्पष्ट केले.
१. राज्यघटनेचा लाल रंग करून सोनिया-राहुल गांधी यांनी काँग्रेसला अतीसाम्यवादी विचारांकडे झुकवले !
विशेष लक्षात घेण्यासारखे, म्हणजे ‘इंडी’ आघाडीच्या सदस्यांनी हातात धरलेली राज्यघटना लाल रंगाची होती ! निवडणूक प्रचाराच्या वेळी ‘आम्ही जातीनिहाय जनगणना करून भारताचा ‘सोशिओ-इकॉनॉमिक एक्स-रे’ (सामाजिक आर्थिक विषमता दूर करण्यासाठी संशोधन) काढू आणि नंतर क्रांती चालू होईल’, अशी वक्तव्ये राहुल गांधींनी केली. यातून काँग्रेसने साम्यवादांची विचारसरणी पूर्णपणे स्वीकारल्याचे दाखवून दिले होते. वर्ष २००४ पासून सोनिया-राहुल गांधी यांनी काँग्रेसला अतीसाम्यवादी विचारांकडे झुकवले आहे, हे उघड आहे. राज्यघटनेचा रंग लाल करून त्यांनी हाच संदेश दिला आहे.
२. काँग्रेसची यापुढील वाटचाल साम्यवादाच्या वाटेनेच होण्याची शक्यता
‘हा नसलेला अर्थ शोधणारा अतिरेक आहे’, असे समजू नका. हा नसलेला नाही, तर लपलेला अर्थ आहे. असे ‘सटल (सूक्ष्म), सब्लिमिनल मेसेजिंग (अचेतन संदेश)’ हा विचारांच्या ‘स्लो पॉयझनिंग’चा (मंद विष देण्याचा) अत्यंत प्रभावी मार्ग आहे; कारण असे संदेश थेट ‘सबकॉन्शस माईंड’पर्यंत (सुप्त मनापर्यंत) पोचतात आणि म्हणून परिणामकारक ठरते. साम्यवाद्यांची या तंत्रावर हुकूमत आहे. ‘काँग्रेसची यापुढील वाटचाल साम्यवादाच्या वाटेनेच होणार’, असा हा स्पष्ट संदेश आहे. साम्यवाद म्हणजे लोकशाहीची हत्या आणि राज्यघटनेचा अंत ! आणीबाणीच्या वेळी हे देशाने अनुभवलेच आहे; कारण त्या वेळीही इंदिरा गांधी पूर्णपणे साम्यवाद्यांच्या कह्यात होत्या. म्हणूनच लाल रंगात रंगलेल्या काँग्रेसचे राज्यघटनेचे प्रेम ही निव्वळ धूळफेक आहे.
३. राष्ट्रप्रेमी नागरिकांनी सतर्क रहाण्याची आवश्यकता !
सध्या राष्ट्रवादी विचारांना संपवण्यासाठी साम्यवादी, जिहादी आणि आंतरराष्ट्रीय उद्योगपती जॉर्ज सोरोस प्रभुतींची ‘डीप स्टेट’ यांची (‘डीप स्टेट’ म्हणजे सरकारी अधिकारी आणि खासगी संस्था यांच्या गुप्त जाळ्यांचा संदर्भ देते जी कुणासही उत्तरदायी न रहाता सरकारी धोरणावर प्रभाव टाकते.) अभेद्य युती झाली आहे. ‘इंडी’ आघाडीच्या हातात लाल राज्यघटना, एम्.आय.एम्.चे खासदार ओवैसींची भारताच्या संसदेत ‘जय पॅलेस्टाईन’ची घोषणा आणि ‘डीप स्टेट’चे प्यादे असलेल्या पित्रोदा यांची पुन्हा नेमणूक या ३ गोष्टी एकाच वेळी घडाव्यात, हा योगायोग निश्चितच नाही ! ज्यांचे भारतावर प्रेम आहे आणि ज्यांना राज्यघटनेविषयी ‘खरी’ श्रद्धा आहे, त्यांनी अतिशय जागरूक रहायला हवे. (२८.६.२०२४)
– श्री. अभिजित जोग, ‘असत्यमेव जयते’ आणि ‘जगाला पोखरणारी डाव्यांची वाळवी’, पुणे. (श्री. जोग यांच्या फेसबुकवरून साभार)