सतत आनंदी आणि उत्साही असलेल्या बडोदा (गुजरात) येथील श्रीमती शालिनी फाटक (वय ९० वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
बडोदा – बडोदा (गुजरात) येथील श्रीमती शालिनी फाटकआजी (वय ९० वर्षे) यांनी नुकतीच ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. ही आनंदवार्ता सनातनच्या साधिका सौ. ऋचा सुळे यांनी दिली. सौ. ऋचा सुळे यांनी श्रीमती फाटकआजींचा ‘श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देऊन’ सत्कार केला. मनोगत व्यक्त करतांना श्रीमती फाटकआजी म्हणाल्या की, सौ. सुचेताने (मुलगी सौ. सुचेता जठार यांनी) मला वेळोवेळी अध्यात्माचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात आजींचा मुलगा, सून, नातू, नातसून आणि पणती आदी कुटुंबीय उपस्थित होते. या प्रसंगी सर्व कुटुंबीय आनंदी आणि उत्साही झाले होते.
श्रीमती शालिनी फाटक यांच्याविषयी त्यांची मुलगी आणि नात यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
१. श्रीमती सुचेता जठार (श्रीमती शालिनी फाटक यांची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ अ. परिस्थिती स्वीकारणे : ‘वर्ष १९३४ मध्ये आईचा जन्म अहिल्यानगर (महाराष्ट्र) येथे झाला. आई आणि तिचा भाऊ अशी दोघेच भावंडे होती. वर्ष १९५१ मध्ये आईचा विवाह जुनागढ (गुजरात) येथील दिनकर फाटक यांच्याशी झाला. सासरी आल्यावर आईने गुजराती भाषा आणि ‘चूल पेटवणे, जात्यावर दळण दळणे’, या गोष्टीही शिकून घेतल्या. तिने एकत्र कुटुंब आणि पाहुण्यांची असलेली सततची वर्दळ’, ही सर्व परिस्थिती आनंदाने स्वीकारली.
१ आ. आनंदी : ती नेहमी आनंदी असते. तिला क्वचित्च राग येतो. ती कधीच प्रतिक्रिया व्यक्त करत नाही.
१ इ. धाडशी : आईला इंग्रजी भाषा येत नाही. असे असतांनाही ती तिच्या धाकट्या मुलाकडे (माझ्या भावाकडे) दक्षिण अफ्रिकेला विमानाने एकटीच गेली होती. तो विमानप्रवास १२ घंट्यांचा होता आणि ती पहिल्यांदाच विमानप्रवास करणार होती. तेव्हा तिचे वय ६५ वर्षे होते. तरीही तिला थोडीही भीती किंवा काळजी वाटली नाही.
१ ई. सत्संग घेणे : दक्षिण अफ्रिकेला गेल्यावर तिथे तिने प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांचे ‘स्वाध्याय’चे सत्संग घ्यायला चालू केले. आता माझा भाऊ ते केंद्र चालवतो.
१ उ. सतत कार्यरत आणि उत्साही असणे : आई सतत उत्साही असते. वयाच्या ८५ व्या वर्षी तिने शेजारच्या मुलींना शास्त्रीय संगीत आणि संवादिनी (पेटी) वादन विनामूल्य शिकवले. आता आईचे वय ९० वर्षे आहे. या वयातही ती संवादिनी वाजवते आणि सुंदर वीणकामही करते. तिने भ्रमणभाष ठेवण्यासाठी लोकरीचे सुंदर बटवे बनवले आहेत, तसेच ती देवतेचे चित्र किंवा मूर्ती यांच्या खाली घालण्यासाठी जरीचे काठ लावून आसने बनवते आणि त्यावर सुंदर विणकाम करते. हे सर्व ती हाताने बनवते आणि त्याच्या विक्रीतून मिळालेले पैसे ती सनातन संस्थेला अर्पण करते.
१ ऊ. नियमित साधना करणे : आई प्रत्येक पौर्णिमेला ‘श्री सत्यनारायण’ कथेचे वाचन करते. ती प्रतिदिन ‘श्रीकृष्णं शरणं मम् ।’, असा नामजप लिहिते. ती दासबोध, एकनाथी भागवत, रामायण, महाभारत, प.पू. गोंदवलेकर महाराज आणि पू. बेलसरे यांचे मार्गदर्शन असलेले ग्रंथ, सनातन संस्थेचे ग्रंथ अशा धार्मिक ग्रंथांचे नियमित वाचन करते. तिचा हा नेम कधीच चुकत नाही. तिला सनातन संस्थेचे कार्य आवडते. त्यामुळे ती मला साधनेसाठी नेहमीच प्रोत्साहन देते.’
२. कु. सुप्रिया जठार (श्रीमती शालिनी फाटक यांची नात, मुलीची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२ अ. उत्तम आरोग्य : ‘आजीचे वय ९० वर्षे असूनही तिचे आरोग्य चांगले आहे. अजूनही तिला उपनेत्र (चष्मा) न लावता दिसते.
२ आ. स्थिर, सकारात्मक आणि उत्साही : आजी नेहमी उत्साही आणि सकारात्मक असते. मी तिला निराश झालेले कधीच पाहिले नाही. आजी मनाने खंबीर आणि स्थिर आहे. आजीच्या जीवनात अनेक दु:खद प्रसंग घडले, तरीही ती कधीच डगमगली नाही.
२ इ. नियोजनबद्ध दिनक्रम आणि साधना : आजी ९० वर्षांची आहे. तरीही तिचा दिनक्रम ठरलेला असतो. ‘कुठल्या ग्रंथाचे वाचन कधी करायचे ?’ किंवा ‘नामजप कधी लिहायचा ?’, हे सर्व ती ठरलेल्या वेळेप्रमाणे करते. आजी प्रतिदिन दैनंदिनी लिहिते. घरी पाहुणे आले किंवा अन्य काही कार्यक्रम असला, तरी तिच्या साधनेत कधी खंड पडत नाही.
२ ई. नेहमी सकारात्मक असणे : आजी मला सांगते, ‘‘मनातील नकारात्मक विचार आपल्याला कमकुवत करतात. त्यामुळे अशा विचारांना मनात थाराच द्यायचा नाही. नकारात्मक विचार त्या त्या वेळी कापूनच टाकायचे.’’ आजी स्वतः हे आचरणात आणते. एकदा आजी स्नानगृहात असतांना तिला चक्कर आली. तेव्हा आजीने स्वतःलाच विचारले ‘मी व्यवस्थित आहार घेत असतांना मला चक्कर येतेच कशी ?’ आणि ती स्वतःच उठून स्नानगृहातून बाहेर आली. त्यानंतर तिला चक्कर आली नाही.
२ उ. भावनाशीलता न्यून होऊन विरक्त जीवन जगणे : डिसेंबर २०२३ मधे मी बडोद्याला गेले होते. तिथे माझी आजीशी भेट झाली. तेव्हा ‘आजी मायेपासून अलिप्त झाली आहे. ती सर्वांमधे असूनही नाही’, असे मला जाणवले. ‘आजीची भावनाशीलता पुष्कळ न्यून झाली असून ती कुणातही अडकलेली नाही’, असे मला जाणवले.
२ ऊ. आजीला आलेल्या अनुभूती
२ ऊ १. घरी घडलेल्या प्रसंगाविषयी संतांनी प्रवचनात मार्गदर्शन केल्यामुळे अपेक्षा न्यून होणे : आजी घरातील सर्व कामे करून नियमितपणे एका संतांच्या प्रवचनाला जात असे. एकदा आजीच्या सासूबाईंनी अख्ख्या डाळीचे लाडू केले होते. आजीच्या सासूबाईंनी घरातील सर्वांना लाडू दिला; पण आजीला दिला नाही. याचे आजीला पुष्कळ वाईट वाटले. त्याच विचारांत आजी संतांच्या प्रवचनाला गेली. संतांनी प्रवचनात सांगितले, ‘‘आपण कधीही कुणाकडून २ कण डाळीचीही अपेक्षा करू नये.’’ संतांचे हे शब्द एकून आजीला फार आश्चर्य वाटले. जो प्रसंग प्रवचनाला येण्याआधी घडला होता, नेमके त्याविषयीच संतांनी उपदेश केल्यावर ‘ही भगवंताने केलेली कृपा आहे’, याची आजीला जाणीव झाली. तेव्हापासून आजीने अपेक्षा न्यून करण्यासाठीचे प्रयत्न चालू केले.
२ ऊ २. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे तेजरूपात दर्शन देणे : एकदा आजी नात्यातील एका विवाहानिमित्त सांगली येथे गेली होती. या विवाहानंतर ती सांगली येथून गोंदवल्याला जायला निघाली. बराच वेळ वाट पाहूनही गोंदवल्याची बस आली नाही; पण आजीला ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या दर्शनाला जाण्याची तीव्र तळमळ होती. काही वेळाने तिला गोंदवल्याला जाणारी बस मिळाली आणि ती गोंदवल्याला गेली. गोंदवल्याला मंदिरात ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे मोठे छायाचित्र आहे. आजीने त्या छायाचित्राला नमस्कार केल्यावर आजीला महाराजांच्या डोळ्यांत पुष्कळ तेज दिसले. तेव्हा आजीला वाटले, ‘महाराजांनी तेजाच्या स्वरूपात दर्शन दिले.’
२ ऊ २. आजीच्या तीव्र तळमळीमुळे मोदकाचे सारण वाढणे आणि गणपतीला २१ मोदकांचा नैवेद्य दाखवता येणे : एकदा आजीच्या सूनेने मोदकाचे थोडेसे सारण बनवले होते. तेव्हा आजी म्हणाली, ‘‘आज संकष्टी चतुर्थी असल्याने मला गणपतीला २१ मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यासाठी आणखीन सारण बनव.’’ काही कारणास्तव आजीच्या सूनेला पुन्हा सारण करायला जमले नाही; पण आजीच्या मनात ‘गणपतीला २१ मोदकांचा नैवेद्य दाखवावा’, अशी तीव्र तळमळ होती. मोदक करत असतांना आजीला ‘परातीत असलेले सारण वाढत आहे’, असे दिसले आणि प्रत्यक्षात ११ मोदक होतील एवढेच सारण असतांना त्यातून २१ मोदक झाले. आजीने त्या २१ मोदकांचा गणपतीला नैवेद्य दाखवला.’
(सर्व लिखाणाचा दिनांक ९.४.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |