हिंदुहिताचे कायदे करण्यासाठी सरकारला भाग पाडले पाहिजे ! – मुन्नाकुमार शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारत हिंदु महासभा, देहली
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा सातवा दिवस (३० जून) : हिंदुत्वनिष्ठांचे अनुभव
रामनाथी, गोवा : आज आपली संस्कृती, सीमा आणि हिंदू यांच्या रक्षणासाठी ‘राजकारणाचे हिंदुकरण’ करणे आवश्यक आहे. राजकारण म्हणजे केवळ निवडून येणे नाही. सध्याचे राजकारण स्वार्थी आणि कौटुंबिक झाले आहे. राज्यकर्त्यांकडे देशांच्या सीमांचे रक्षण करण्याचे दायित्व असते. अजून गोहत्या थांबलेली नाही. मंदिरे तोडली जात आहेत. हिंदूंची अल्प होत चाललेली संख्या, लव्ह जिहाद या सार्या समस्या आहेत. नरसिंह राव सरकारने बनवलेला ‘मंदिर कायदा’ रहित करून पाडलेल्या किंवा मुसलमानांनी बळकावलेल्या ३ लाख मंदिरांचे पुनर्निमाण करायचे आहे. या सर्वांविषयीचे कायदे करण्यासाठी सरकारला भाग पाडले पाहिजे. आता या महोत्सवाच्या माध्यमातून ‘हिंदु राष्ट्र समिती’ बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी माझे संपूर्ण समर्थन असेल. पूर्वी राष्ट्रीय पातळीवर असणारे अधिवेशन आता वैश्विक पातळीवर झाले आहे. त्यामुळे अखंड हिंदु राष्ट्र निर्माण होईल, असा विश्वास वाटतो, असे प्रतिपादन अखिल भारत हिंदु महासभेचे अध्यक्ष श्री. मुन्नाकुमार शर्मा यांनी केले. वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या शेवटच्या म्हणजे ३० जून या दिवशी द्वितीय सत्रात ‘राजकारणाचे हिंदुकरण’ या विषयावर ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, अखिल भारत हिंदु महासभेचे कार्यकर्ते स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले; परंतु त्यांनी राजकीय अधिकार गाजवण्याचा कधी प्रयत्न केला नाही. त्याचा परिणाम असा झाला की, देश काँग्रेसच्या हातात गेला. त्यानंतर काँग्रेसने संपूर्ण भारताचे इस्लामीकरण चालू केले. मुख्यंमत्री, राज्यपाल, शिक्षणमंत्री सगळे मुसलमान होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कारागृहातून बाहेर आल्यावर घोषणा केली की, राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण करा. त्यांनी इंग्रजी सैन्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यांच्यावर टीका झाली; पण त्यांनी सांगितले ‘स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सीमांचे रक्षण करण्यासाठी सैनिक नकोत का ?’