वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव : सनातन धर्माची वैचारिक सुरक्षा आणि हिंदु राष्ट्र स्थापनेचे वैधमार्गाने प्रयत्न यांवर केंद्रीभूत !
१. प्रारंभातून तपपूर्तीकडे…
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चा हा आरंभ, म्हणजे हिंदु राष्ट्राचा बुलंद आवाज विश्वस्तरावर निनादण्याचा क्षण आहे. वर्ष २०१२ मध्ये संपूर्ण देशात हिंदुद्वेषी काँग्रेसचे प्राबल्य होते. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हिंदु राष्ट्राचा उद्घोष अधिवेशनाच्या माध्यमातून करण्याची प्रेरणा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिली. या मंचावरून याच स्थानावरून वर्ष २०१२ पासून हिंदु शक्तींचे संघटन करण्याचे कार्य आरंभ झाले. आज वर्ष २०२४ मध्ये याला एक तप पूर्ण होत आहे. संतांची दूरदृष्टी, त्यांचा संकल्प, आपल्या सर्वांचे प्रामाणिक प्रयत्न आणि साथ यांमुळे या अधिवेशनाने १ तप पूर्ण केले आहे.
अयोध्येत प्रतिष्ठापित होऊन प्रभु श्रीरामांनी एक प्रकारे आपल्या रामराज्य स्थापनेच्या अभियानाला अधिष्ठानच दिले, ही आपल्या सर्वांची दृढ श्रद्धा आहे. याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्हणाले की, या मंदिरातून केवळ भारतच नव्हे, तर संपूर्ण पृथ्वीवर साक्षात् श्रीरामाची स्पंदने प्रक्षेपित होत आहेत. प्रभु श्रीराम अयोध्यापती झाल्यानंतर पृथ्वीवर रामराज्य अवतरले होते. अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेमुळे सूक्ष्मातून रामराज्याचा अर्थात् भावी हिंदु राष्ट्राचा प्रारंभ झाला आहे. आपण सर्व या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार आहोत, हीच कृतज्ञता आहे.
श्रीराममंदिराची स्थापना हा हिंदूंच्या मनामनांमध्ये रुजलेला विचार होता, त्याचे साकार रूप २ पिढ्यांच्या संघर्षानंतर आज आपण पहात आहोत. त्याचप्रमाणे वर्ष २०१२ मध्ये या अधिवेशनाच्या माध्यमातून रोवलेले हिंदु राष्ट्राचे बीजही आज आकार घेतांना दिसत आहे. पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचेही या अधिवेशनाला आशीर्वाद लाभले. वर्ष २०१३ मध्ये झालेल्या अधिवेशनाला पुरी पीठाचे प्रतिनिधी उपस्थित होते. आज त्यांनीही हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी व्यापक अभियान प्रारंभ केले आहे. ब्रिटीश वृत्तपत्र ‘गार्डियन’नेही ‘भारताला हिंदु राष्ट्राच्या रूपात स्थापित करण्याच्या दिशेने पाऊल’, असे श्रीराममंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे वार्तांकन केले आहे. एकंदर रामभक्तीने ओतप्रोत झालेले देश-विदेशांतील हिंदू, अबुधाबीमध्ये उभारण्यात आलेले हिंदु मंदिर, विदेशात वाढत असलेले श्रीकृष्णभक्तीचे वातावरण, नेपाळला पुन्हा हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी रस्त्यावर उतरून होत असलेले आंदोलन…, हे सर्व कशाचे द्योतक आहे ? आज केवळ भारत नाही, तर संपूर्ण विश्व हिंदु होण्यासाठी उत्सुक आहे. देश-विदेशांत चर्चेत असलेले युवा संत बागेश्वर धामचे स्वामी धीरेंद्र शास्त्री यांनी स्पष्टच सांगितले की, हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हा माझा संकल्प आहे. त्यासाठी राज्यघटनेत आणखी एक सुधारणा झाली, तर त्यात काही चुकीचे नाही. या तपपूर्तीच्या वर्षात देश-विदेशांत रुजत असलेला हिंदु राष्ट्राचा विचार, ही या अधिवेशनाची फलनिष्पत्ती आहे.
हिंदु राष्ट्र स्थापनेत हिंदूंचे संघटन आणि समन्वय हे महत्त्वाचे सूत्र आहे. वैश्विक स्तरावर या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. यावर्षी थायलंडमध्ये हिंदु संघटनांमध्ये एकता निर्माण करणे आणि सनातन धर्मद्वेष्ट्यांच्या प्रतिकाराचा संकल्प करून आयोजित केलेल्या ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’मध्ये ६१ देशांचे २ सहस्र १०० प्रतिनिधी सहभागी झाले होते. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मी स्वत: आणि धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ त्या ठिकाणी उपस्थित होतो.
२. नवनिर्वाचित केंद्र सरकारला हार्दिक शुभेच्छा !
या महिन्यात देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एन्.डी.ए.) सरकार स्थापन झाले आहे. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या वतीने मी नवीन सरकारला राष्ट्र आणि धर्म हिताचे कार्य करण्यासाठी शुभेच्छा देतो.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल म्हणजे भाजपसह हिंदुत्वासाठी काम करणार्या आपल्या सर्वांसाठी एक धडा आहे. हिंदुत्वाविषयी जागरूक असलेल्या हिंदूंच्या एका वर्गाला असे वाटते की, ‘आता केंद्रात आपले सरकार आहे, तर सर्व काही होईल. आम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही.’ दुसरा एक वर्ग असा आहे की, ज्यांना हे जाणवते की, ‘जे व्हायला हवे ते होत नाही; पण पुढे काहीतरी होईल’, असा विचार करून ते आशावादी रहातात. एकंदरीत, हिंदु समाज हे गृहीत धरतो किंवा कुणावर तरी अवलंबून रहातो आणि स्वतःचे दायित्व विसरतो – मग ते मतदान करणे असो किंवा सरकार सत्तेवर आल्यानंतर हिंदूंच्या हिताचे काम करून घेणे असो. यामध्ये आपल्याला पालट करावे लागतील.
जिथे आपण आशेने बसलो आहोत, तिथे सत्तेची तत्त्वे आणि कल्पना बाजूला ठेवून तडजोडी होतांना दिसत आहेत. त्या जोडीला जागतिक शक्ती हिंदुत्वाला रोखण्याचे कसे प्रयत्न करत आहेत, हेही आपण पाहिले. एकंदरीत, आपण हा बोध घ्यायला हवा की, धर्मकार्य करण्यासाठी कुणावर तरी अवलंबून राहून चालणार नाही. त्यामुळे हिंदु राष्ट्राचे काम सरकारकडून करून घेण्यासाठी कोणती रणनीती आखली पाहिजे ? यावर या अधिवेशनात विचारमंथन करण्याचा प्रयत्न केला जाईल.
३. भारतभूमीवरील हिंदु राष्ट्रासमोरील आव्हाने !
हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न करतांना आपल्याला आव्हानांचा, संकटांचा विचार करायला हवा. आता या संदर्भात मी बोलणार आहे.
३ अ. जिहादी आतंकवाद : जिहादी आतंकवादाचे मोठे आव्हान हिंदु राष्ट्रासमोर आहे. एकदा ‘सर्जिकल स्ट्राइक’ झाला म्हणजे या देशातील आतंकवादी कारवाया थांबलेल्या आहेत, असे नाही. ही वस्तूस्थिती आहे. बेंगळुरूच्या रामेश्वर कॅफेमध्ये झालेला स्फोट, आसाममधून झालेली इसिसच्या भारतातील म्होरक्याची अटक, अनंतनागमध्ये झालेले आतंकवादी आक्रमण, पूंछ, कुपवाडा, पुलवामा येथे सैन्यदलावर झालेली आक्रमणे दुर्लक्षित करून चालणार नाहीत. आजही जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, गुजरात, केरळ, उत्तरप्रदेश आदी राज्यांमध्ये मोठ्या योजना आखणारे आतंकवादी सापडत आहेत. त्यांचा समूळ बंदोबस्त करावा लागणार आहे. गुजरात ‘एटीएस्’ने मे २०२४ मध्ये कर्णावती विमानतळावर ४ आतंकवाद्यांना पकडले. हे आतंकवादी श्रीलंकेतून चेन्नईमार्गे गुजरातला आले होते. म्हणजे भारताला इस्लामीस्तान बनवू पहाणारे हे जिहादी, त्यांना साहाय्य करणारे ‘स्लीपर सेल’ (स्थानिक समाज) आणि या सर्वांच्या पाठीशी रहाणारे बहुसंख्य धर्मांध मुसलमान, हे देशासमोरील आव्हान आहे. इस्रायलवर हमासने आक्रमण करून त्यांच्या १ सहस्र २०० हून अधिक नागरिकांचे प्राण घेतले. त्यातील काही जणांचे अपहरण केले; पण इस्रायलने हमासला नष्ट करण्याचा विडाच उचलला आहे. हमासला अभय देणार्या इराणच्या विरोधातही इस्रायलने संघर्ष आरंभला आहे. राष्ट्राची सुरक्षा कशी असायला हवी, हे यातून शिकायला मिळते. निरपराध नागरिकांना मारणारा आपला शत्रू पुन्हा उभाच राहू नये, ही राष्ट्रीय सुरक्षेसाठीची इस्रायलची भूमिका भविष्यात भारताने स्वीकारायला हवी.
३ आ. वाढत्या जिहादी कारवाया : केंद्र सरकारने संसदेत सादर केलेल्या ‘एन्.सी.आर्.बी.’च्या (नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या) अहवालानुसार देशभरात गेल्या ३ वर्षांत १० लाख मुली बेपत्ता झाल्या. मुली बेपत्ता होण्यामागे ‘लव्ह जिहाद’ हे एक मुख्य कारण आहे; पण अनेक आंदोलने होऊनही अद्यापही अनेक राज्यांत लव्ह जिहादविरोधी कायदा झालेला नाही. ‘नार्कोटिक’ (अमली पदार्थ) जिहादच्या माध्यमातून हिंदु तरुण-तरुणींना नशेला लावून हिंदु युवा पिढी संपवली जात आहे. समाजकल्याण आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या सर्वेक्षणानुसार, भारतात ३७ कोटी लोक नशा करतात. त्यात १७ वर्षांपेक्षा अल्प वय असलेली २० लाख मुले आहेत. गेल्या १० वर्षांत अमली पदार्थांची विक्री १८० टक्क्यांनी वाढली आहे. हा पैसा जिहादी कारवायांसाठी वापरला जातो.
अहिंदूंची वाढती लोकसंख्या हीसुद्धा देश आणि हिंदु धर्म यांसाठी धोक्याची घंटा आहे. या संदर्भात पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने वर्ष १९५० ते २०१५ या ६५ वर्षांचा एक अहवाल दिला. त्यानुसार भारतात हिंदूंची लोकसंख्या ८ टक्के अल्प होऊन ७८ टक्के झाली आणि मुसलमानांची लोकसंख्या १० टक्क्यांवरून १४ टक्क्यांवर पोचली आहे. वर्ष २०१५ नंतर या आकड्यांत आणखी वाढ झाली असणार. आज देशातील ९ राज्यांत हिंदु अल्पसंख्यांकच आहेत. ब्रिटनचे उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर आहे. तेथील नगर परिषदांच्या निवडणुकीत ४० कट्टर गाझाप्रेमी उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. येत्या काही वर्षांत केवळ ब्रिटनच नाही, तर पूर्ण युरोपचे इस्लामीकरण झाल्यास आश्चर्य वाटणार नाही !
याच प्रमाणात मुसलमानांची लोकसंख्या वाढत राहिली, तर वर्ष २०६० पर्यंत विश्वात मुसलमानांची लोकसंख्या ख्रिस्त्यांपेक्षा अधिक होईल आणि वर्ष २०७० मध्ये भारत विश्वातील सर्वाधिक मुसलमान लोकसंख्येचा देश बनेल. या अनुषंगाने समान नागरी कायदा लागू करण्याचे गांभीर्य आपल्या लक्षात आले असेल.
बंधूंनो, लँड जिहादसाठी कुणाचीही भूमी कह्यात घेण्याचा ‘वक्फ कायदा’ करून काँग्रेसने एक हत्यारच मुसलमानांच्या हाती दिले आहे. एकदा का एखाद्या भूमीवर वक्फ बोर्डने मालकी हक्काचा दावा केला की, या विरोधात केवळ ‘वक्फ न्यायालया’कडेच दाद मागता येते. हे म्हणजे चोरी करणार्या चोराकडेच न्याय मागण्यासारखे आहे. भारतीय रेल्वे आणि सेना यांच्यानंतर सर्वाधिक म्हणजे सुमारे ८ लाख एकर भूमी वक्फ बोर्डाच्या अधिपत्याखाली आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकार वक्फ बोर्डाला १० कोटी रुपये का देत आहे ? त्यामुळे हा वक्फ कायदा रहित करण्यासाठी आपण संघटितपणे संघर्ष केला पाहिजे.
३ इ. अर्बन नक्षलवाद : बांधवांनो, केवळ जिहादी आतंकवाद हे आपल्यापुढील संकट नाही, तर ‘अर्बन नक्षलवाद’ हेही तितकेच गंभीर आणि व्यापक आहे. नक्षलवाद्यांनी आतापर्यंत ठार मारलेल्या निरपराध लोकांची संख्या १४ सहस्रांहून अधिक आहे. आतापर्यंतच्या झालेल्या युद्धांमध्येही एवढे सैनिक मारले गेले नाहीत. हा नक्षलवाद आहे. प्रस्थापित व्यवस्था उलथवून लावणे, हा त्यांचा मुख्य ‘अजेंडा’ आहे. आपल्याला वाटेल की, नक्षलवाद हा गडचिरोलीच्या जंगलात किंवा दंडकारण्यात आहे, तर तसे नाही. या नक्षलवादाने केव्हाच शहरांतही हात-पाय पसरले आहेत.
काही महिन्यांपूर्वी तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन याने ‘सनातन धर्म डेंग्यू, मलेरियासारखा पसरत असून त्याचे उच्चाटन करायला हवे’, असे फुत्कार सोडले.
‘टू जी स्पेक्ट्रम’ घोटाळ्यात कारागृहाची हवा खाऊन आलेले द्रमुकचे ए. राजा, कर्नाटकातील काँग्रेसचे प्रियांक खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी त्याला साथ दिली. एवढे होऊनही त्यांच्यावर कठोर कारवाई झाली नाही. आज रामचरितमानस, मनुस्मृती यांचे दहन करून हिंदु श्रद्धांवर आघात करण्यात येत आहे, तर दुसरीकडे टिपू सुलतानची जयंती, महिषासुर जयंती, रावण, शुर्पणखा यांच्याविषयी ममत्व दर्शवणारे कार्यक्रम करून समाजात दिशाभूल केली जात आहे. हा ‘अर्बन नक्षलवादा’चाच प्रकार आहे. ‘अर्बन नक्षलवाद्यां’चा चेहरा एक आहे; पण मुखवटे अनेक आहेत. ते हिंदु धर्माला आणि हिंदूंना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता आपले कर्तव्य आहे की, हिंदु धर्म संपवण्यासाठी प्रयत्न करणार्यांना संवैधानिक मार्गाने उत्तर दिले पाहिजे.
३ ई. ‘हेट स्पीच’च्या (द्वेषयुक्त भाषणाच्या) आडून हिंदूंची गळचेपी : सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल २०२३ मध्ये सांगितले होते की, आतापासून दुसर्या धर्माविषयी तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणे, हा गुन्हा आहे. पोलिसांनी अशा प्रकारच्या गुन्ह्याची स्वतःहून नोंद घ्यावी; अन्यथा तो न्यायालयाचा अवमान समजला जाईल; पण दुर्दैव हे आहे की, सनातनद्वेष्ट्यांनी सनातन धर्माच्या विरोधात केलेल्या विखारी वक्तव्यांवर कारवाई होत नाही; पण अर्बन नक्षलवादी तिस्ता सेटलवाडच्या ‘सिटीझन फॉर जस्टिस’ आणि ‘पीस’ने हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधात केलेल्या तक्रारींवर कारवाई होते. सुदर्शन वाहिनीचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके यांनी त्यांच्या सभेत लोकांना हिंदवी स्वराज्याची शपथ घ्यायला सांगितली; म्हणून त्यांच्यावर ‘हेट स्पीच’चा गुन्हा नोंदवण्यात आला. भाग्यनगरचे भाजपचे आमदार टी. राजासिंह, हिंदु जनजागृती समितीचे काही वक्ते यांच्यावरही अशा प्रकारचे गुन्हे नोंदवण्यात आले. त्यामुळे आता आपल्यावरील अन्याय सांगतांनाही सजग रहावे लागणार आहे. कायद्याच्या कचाट्यात न अडकता हिंदूंवरील अन्याय प्रभावीपणे कसे मांडता येतील ?, याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल.
३ उ. हिंदुविरोधी पक्षांची लांगूलचालनाची आणि दडपशाहीची भूमिका ! : विविध राज्यांत सत्तारूढ झालेली हिंदुविरोधी राजकीय पक्षांची सरकारे हिंदुत्वनिष्ठांवर अत्याचार करत आहेत. कर्नाटकच्या निवडणुकीत ‘बजरंग दला’वर बंदी घालण्याचा घोषणापत्रातील उल्लेख, ‘दि केरल स्टोरी’ चित्रपटावर तमिळनाडू-बंगाल राज्यांत बंदी, अशी याची अनेक उदाहरणे देता येतील. मे महिन्यामध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी बंदुका घेऊन रामकृष्ण मिशनच्या संन्यास्यांवर आक्रमण केले. त्यांना मारले, आश्रमातून बाहेर काढले, काहींचे अपहरण करून नंतर त्यांना सोडले. हे सर्व होऊन संन्यास्यांच्याच विरोधात अजामीनपात्र गुन्हा नोंदवला गेला, तर ज्याच्या पुढाकाराने हे सर्व झाले, त्याच्या विरोधात जामीनपात्र गुन्हे लावले गेले. ‘ऑप इंडिया’ या हिंदुत्वनिष्ठ वृत्तसंकेतस्थळाच्या मुख्य संपादिका नुपूर शर्मा या बंगाल विधानसभेच्या निवडणुकांनंतर झालेल्या भयावह हिंसाचाराविषयी म्हणाल्या, ‘‘वर्ष २०२१ मध्ये झालेला हिंसाचार हा वर्ष १९४६ च्या ‘डायरेक्ट अॅक्शन डे’सारखा अमानुष होता.’’ त्या काळात अन्य राजकीय पक्षांनी स्पष्टपणे हिंदुत्वविरोधी भूमिका घेतली आहे. आजपर्यंत ते अयोध्येतील राममंदिरात गेलेले नाहीत. उलट कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने श्रीरामजन्मभूमी आंदोलनात सहभागी ३०० हिंदूंवर कारवाईचे आदेश दिले. याच सिद्धरामय्या सरकारने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पी.एफ्.आय.) १ सहस्र ६०० सदस्यांविरुद्धचे १७५ गुन्हे मागे घेतले होते, हे आपण लक्षात घ्यायला हवे.
३ ऊ. अराजकतेकडे जाणारे राजकारण : हे सध्याचे सर्वांत गंभीर आव्हान आहे. ‘भाजपचा राजकीय विजय हा हिंदु राष्ट्राकडे जाणारी पहिली पायरी आहे’, असे समजले जात होते; परंतु भावनेच्या आहारी न जाता आपण वस्तूस्थिती समजून घेतली पाहिजे. आज जर या भारतातील व्यवस्थेचा अभ्यास केला, तर कोणती व्यवस्था, कोणता कायदा हिंदूंच्या हिताचा आहे ? मंदिरांचे अधिग्रहण करण्यासाठी कायदा येथे होतो; पण मशीद आणि चर्च यांच्या अधिग्रहणासाठी होत नाही ! राज्यघटनेतील अनुच्छेद ४८ म्हणते की, सरकारला गोवंशियांच्या वधावर प्रतिबंध लावायला हवा. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्या अनेक क्रांतीकारकांची ती मागणी होती; पण आज गोवंश वधावर बंदी घालणारा राष्ट्रव्यापी कायदा नाही. आजही हिंदूंना यासाठी आंदोलन करावे लागते. हिंदूंना शिक्षणात गीता-महाभारत शिकवता येत नाही; राज्यघटना त्यावर प्रतिबंध घालते; पण मुसलमान मदरशात आणि ख्रिस्ती कॉन्व्हेंटमध्ये त्यांच्या पंथाचे शिक्षण घेऊ शकतात. हिंदूंवर अन्याय करणार्या या अनुच्छेदामध्ये पालट कोण आणि कधी करणार ? लोकसंख्येत वेगाने होत असलेले परिवर्तन पहाता लोकसंख्या नियंत्रणासाठी केंद्रीय कायदा कधी होणार ? थोडक्यात, येथील कायदे आणि व्यवस्था या आजही हिंदुहिताच्या नाहीत. जोपर्यंत देशाच्या राज्यघटनेत अवैधरित्या घुसवलेले ‘सेक्युलॅरिझम्’ आणि ‘सोशालिस्ट’ हे शब्द हटवून तेथे हिंदु राष्ट्राला स्थान मिळत नाही, तोपर्यंत ‘आपण वाहनचालक पालटत राहू; पण गाडी तीच राहील’, हे लक्षात घ्यायला हवे.
अनेकांना वाटते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर आले आहेत, त्यामुळे हिंदु राष्ट्र होईल; पण आपल्याला लक्षात घ्यायला हवे की, हिंदुिहताची राज्यव्यवस्था असली पाहिजे. राजा हा व्यवस्थेवर नियंत्रण करत असतो. आपले राष्ट्र जर धर्म राष्ट्र व्हायला हवे, तर राज्यव्यवस्था तशी हवी. त्यामुळे आपले पहिले ध्येय भारत संवैधानिक रूपाने हिंदु राष्ट्र बनवणे, हे असेल, तर पुढचे ध्येय हिंदु राष्ट्राला अनुकूल व्यवस्था बनण्यासाठी प्रयत्न करणे अर्थात् रामराज्यासाठी प्रयत्न करणे, हे असेल. सध्याच्या ध्रुवीकरणाच्या काळात हिंदू जागृत होत आहेत; पण हिंदूंच्या राजकीय पक्षांना जागृत करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
६. आवाहन
बंधूंनो, यावर्षीचा हा महोत्सव प्रामुख्याने सनातन धर्माची वैचारिक सुरक्षा, हिंदु समाजाच्या सुरक्षेचे उपाय, हिंदु राष्ट्र स्थापनेचे वैधमार्गानी प्रयत्न, मंदिर सुरक्षेचे प्रयत्न, वैश्विक स्तरावर हिंदुत्वाची सुरक्षा यांवर केंद्रीभूत असेल. यात २६ जूनपर्यंत हिंदु राष्ट्राच्या संदर्भात प्रत्यक्ष कार्य करणार्यांचे दिशादर्शनात्मक अनुभव आपण पहाणार आहोत. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ म्हणजे एक प्रकारचे लोकमंथन आहे ! हा विचार महोत्सव हा हिंदु राष्ट्राचे कार्य करणार्यांना शिकण्यासाठी आहे. आज येथे एकत्रित आलेली हिंदु शक्ती हिंदु राष्ट्र स्थापनेच्या विश्वकल्याणकारी कार्यासाठी जोडली जाणार आहे. आपल्या सर्वांकडून हिंदु राष्ट्राचे ऐतिहासिक कार्य व्हावे, अशी प्रार्थना करतो !
– सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.
अधिवेशनाची फलनिष्पत्ती !
आपल्यासमोरील आव्हाने आपण पाहिली. आव्हाने अनेक आहेत; पण भगवंताच्या कृपेने आपण एक एक आव्हान पार करत आहोत, हेही लक्षात घ्यायला हवे. हे अधिवेशन आपल्या सर्वांच्या निरंतर आणि गांभीर्याने चाललेल्या प्रयत्नांचे यश आहे. या अधिवेशनांनी पाकिस्तानी-बांगलादेशी शरणार्थी हिंदूंसाठी कायदा बनवण्यापासून काशी-ज्ञानव्यापीच्या मुक्तीलढ्यापर्यंत अनेक संघर्ष केले आणि विजय प्राप्त केले. या अधिवेशनांनी प्रत्येक राज्य आणि क्षेत्र यांतील हिंदु शक्तींना (फोर्सेसना) हिंदु राष्ट्रासाठी संघटित केले आहे. हिंदु संघटना, धर्मनिष्ठ अधिवक्ते, विचारवंत, संत, व्यावसायिक, प्रसारमाध्यमे आदींची हिंदु ‘इकोसिस्टीम’ (परस्परांना संपर्क करणारी व्यवस्था) उभी केली आहे.
गत अधिवेशनानंतर ही इकोसिस्टीम मजबूत करण्यासाठी करण्यात आलेले कार्य आपल्यासमोर ठेवू इच्छितो.
१. हिंदु विचारक संघ अर्थात् ‘हिंदु इन्टेलेक्चुअल फोरम’ची स्थापना
आज आपण पहातो की, साम्यवादी लोक ‘परिस्थितीनुसार कोणते नॅरेटिव्ह वापरायचे ? कसे वापरायचे ? त्यासाठी ‘टूल किट’चा उपयोग कसा करायचा ?’, हे पद्धतशीरपणे करतात. ते खोट्याला खरे करण्यासाठी नॅरेटिव्हचा पद्धतशीर वापर करतात आणि मिडिया, राजकारणी सर्वांच्या माध्यमातून समाजाला संभ्रमित करतात; पण आपण जे सत्य आहे, आपल्यावर झालेला अन्याय आहे, तोही तार्किकदृष्ट्या, प्रमाणांसह समाजासमोर पोचवण्यास अल्प पडतो. ही उणीव भरून काढण्यासाठी अधिवेशनाला आलेल्या काही विचारकांच्या सहकार्याने ‘हिंदु इन्टेलेक्चुअल फोरम’ची स्थापना झाली आहे. याच्या तीन बैठका मुंबई, देहली आणि रांची या ठिकाणी झाल्या. भविष्यात या उपक्रमाला आणखी गती देण्याचा प्रयत्न आहे. आज हिंदु राष्ट्र, सनातन धर्म यांवर अनेक आरोप हिंदु धर्म विरोधकांकडून केले जातात. या आरोपांना उत्तर देण्याचे कार्यही या ‘इन्टेलेक्चुअल फोरम’च्या माध्यमातून करण्यात येईल.
२. हिंदु राष्ट्र समन्वय समिती
गत अधिवेशनात आपण हिंदु राष्ट्र समन्वय समिती स्थापन केली. काही राज्यांत यासाठी अल्प प्रयत्न झाले; पण बहुतांश ठिकाणी या दृष्टीने प्रयत्न करण्यात आपण अल्प पडलो. आपण येथे ज्या गोष्टी निश्चित करतो, त्यासाठी वर्षभर प्रयत्न करणे आवश्यक आहे. या वर्षभरात ही उणीव आपल्याला भरून काढायची आहे.
३ . मंदिरमुक्ती अभियान
मंदिरमुक्ती अभियान, हा हिंदु राष्ट्राचा पाया आहे ! केवळ अयोध्येतील राममंदिरच नाही, तर काशी-मथुरा-भोजशाळा यांसारख्या सर्वच इस्लामी अतिक्रमणग्रस्त मंदिरांच्या मुक्तीसाठी हे अधिवेशन कटीबद्ध असेल. त्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन अत्यंत तळमळीने हा लढा देत आहेत. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. तसेच मला सांगायला आनंद वाटतो की, यावर्षी ‘हिंदु जनजागृती समिती’च्या पुढाकारातून महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा येथे ‘मंदिर महासंघा’ची स्थापना झाली असून या महासंघाने मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्याची घोषणा केली आहे, तसेच मंदिर धर्मशिक्षणाचे केंद्र बनावे, यासाठीही प्रयत्न चालू आहेत.
– सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे