Mukhyamantri Tirtha Darshan : ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’द्वारे ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य देवदर्शन घडवणार !
मुंबई, २९ जून (वार्ता.) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २९ जून या दिवशी विधानसभेत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य देवदर्शन घडवणण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ चालू करण्याची घोषणा केली. ‘राज्यातील अनेक नागरिकांना आर्थिक अडचणींमुळे देवदर्शन करता येत नाही. अशांना सरकार स्वतः पुढाकार घेऊन मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत देवदर्शन घडवून आणेल’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. सरकारच्या या योजनेचा लाभ राज्यातील लाखो वयोवृद्धांना होणार आहे.
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन’ योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली.
या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी… pic.twitter.com/3biaAgG0Jr— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 29, 2024
विधानसभेत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी २९ जून या दिवशी ही लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देतांना मुख्यमंत्री बोलत होते.
‘ऑनलाईन’ आवेदन (अर्ज) मागवणार !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र ही संतांची भूमी असून प्रतिवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन सुलभपणे होण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ चालू करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वंकष धोरण सिद्ध करून त्याची नियमावली घोषित केली जाईल. त्यासाठी ‘ऑनलाईन’ आवेदन मागवले जातील. या योजनेंतर्गत हिंदु बौद्ध, जैन, ख्रिस्ती आदी सर्वच समुदायातील ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य देवदर्शन घडवून आणले जाईल. प्रतिवर्षी ‘रोटेशन’ पद्धतीने (आळीपाळीने) ५ ते १० सहस्र ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य तीर्थयात्रा घडवून आणली जाईल. सरकार याविषयी अत्यंत सकारात्मक आहे. सभागृहात झालेल्या यासंबंधीच्या चर्चेत आमदार राम कदम, प्रकाश सुर्वे, श्रीमती देवयानी फरांदे, मनीषा चौधरी आदी आमदारांनी भाग घेतला.