मंदिराचे सौंदर्यीकरण करायला ती पर्यटनस्थळे नव्हेत, तीर्थक्षेत्रे आहेत ! – अनिल कुमार धीर, संयोजक, ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज’, ओडिशा
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा पाचवा दिवस (२८ जून) : उद्बोधन सत्र – हिंदु राष्ट्रसाठी वैचारिक आंदोलन
रामनाथी, गोवा – ओडिशामधील सुप्रसिद्ध जगन्नाथ मंदिराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी २२ प्राचीन मठ तोडण्यात आले. या विरोधात आम्ही न्यायालयात गेलो, तर आम्हालाच १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. जी मंदिरे मुळातच सुंदर आहेत, त्यांचे सौंदर्यीकरण कशासाठी करायचे ? प्लास्टिकची झाडे आणि खांब उभारणे, सर्व चकाचक करणे, यांसाठी ही पर्यटनस्थळे नव्हेत, ती तीर्थक्षेत्रे आहेत. फळवाले, फुलवाले, बाहेर बसणारे बाबा हे सर्व मंदिरांच्या ‘व्हरनॅक्युलर इकोसिस्टिम’चा (एकमेकांवर अवलंबून असलेली स्थानिक व्यवस्थेचा) भाग आहेत. त्यांना हटवून कसे चालेल ? जगन्नाथ मंदिरात २ रत्नभंडार आहेत, त्यांपैकी एक गेली ४६ वर्षे उघडलेले नाही. तेथे पडझड झाली आहे. आता निवडून आलेल्या सरकारकडून हे काम रथयात्रेच्या काळात केवळ ७ दिवसांत तेथील दुरूस्ती करण्यास सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात ७ दिवसांत ते शक्य नाही. आमच्या दृष्टीने मंदिराची स्थापत्यरचना नीट रहाणे महत्त्वाचे आहे; त्यातील धन मिळाले नाही, तरी चालेल, असे प्रतिपादन वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनात ‘पुरातत्त्व विभागाकडून संरक्षित मंदिरांच्या रक्षण होण्यासाठी भारत सरकारकडून अपेक्षा’ या सत्रात ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज’चे संयोजक श्री. अनिल कुमार धीर यांनी केले.
‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज’च्या माध्यमातून श्री. धीर करत असलेले कार्य
१. ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज’ (इनटॅक) या संस्थेला केंद्र सरकारने ‘सेंटर फॉर एक्सलन्स’चा दर्जा देऊन १०० कोटी रुपये दिले आहेत आणि अजून १०० कोटी रुपये देणार आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण या संस्थेनंतर ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज’ ही दुसर्या क्रमांकाची संस्था आहे.
२. ओडिशामध्ये ३०० मंदिरे पुरातत्त्व विभागाच्या अंतर्गत संरक्षित आहेत. १०० वर्षांपूर्वीचे मंदिर पुरातत्त्व खात्याच्या अंतर्गत येते.ओडिशाच्या १७ जिल्ह्यांतील ३०० वर्षांपूर्वीची ६ सहस्र ५०० मंदिरे मी शोधली आहेत आणि उर्वरित १३ जिल्ह्यांत शोधमोहिम घेतली, तर अशी १५ सहस्र मंदिरे सहज मिळू शकतात.
३. छत्तीसगडमधून महानदी ओडिशात येते. तिचा निम्मा भाग म्हणजे ४०० कि.मी.च्या परिसरात दोन्ही काठांवर आम्ही बैलगाडीतून फिरून सर्वेक्षण केले. या नदीत ६३ मंदिरे मागील ८० वर्षे पाण्याखाली गेली आहेत. ‘त्यांतील २-३ मंदिरे तरी उचलून बाहेर काढून त्याचे पुनर्निमाण करा’, अशी मागणी आम्ही केली होती.
४. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण ही जुनी आणि सक्षम लोकांची सरकारी संस्था आहे. जगभर तिने अनेक कामे केली आहेत; परंतु सध्या ताजमहाल, कुतुबमिनार आदींकडून तिला निधी मिळत असल्याने त्यांच्याकडे तिचे लक्ष आहे. आज बंगालमध्ये नवीन मंदिरांपेक्षा उद्ध्वस्त (अवशेष राहिलेल्या) झालेल्या मंदिरांचीच संख्या पुष्कळ म्हणजे जवळजवळ एक पंचमांश आहे. कुणीही जात नसले, तरी जुन्या मशिदींची देखभाल सरकारी पैशांतून केली जाते. आज हिंदूंची प्राचीन मंदिरे पहाण्यासाठी पैसे द्यावे लागतात. आपल्या पूर्वजांची देण आपण भावी पिढीला जशीच्या तशी दिली पाहिजे.
५. आज अनेक चोरल्या गेलेल्या प्राचीन मूर्ती परत मिळालेल्या आहेत, ज्या जिल्हाधिकारी, पोलीस यांच्याकडे पडून आहेत; कारण त्या मूर्ती कुठल्या आहेत ? याची नोंदच नाही; म्हणून आम्ही प्रत्येक मंदिरातील मूर्तीची सर्व माहिती नोंद करण्याचे काम चालू केले आहे.
श्री. धीर पुढे म्हणाले की, आपण कुठल्या आधारावर विश्वगुरु होणार आहोत ? मोहंजोदडो, हडप्पा यांच्या संशोधनानंतर कुठलेही मोठे संशोधन झाले नाही. संशोधन करण्यासाठी उत्खनन करण्याची आवश्यकता नाही, अन्य भागातही आपल्या प्राचीन संस्कृतीचे अनेक पुरावे मिळतात; परंतु त्याविषयीचे संशोधनच होत नाही. आता वैज्ञानिक प्रगतीमुळे लोकांची गुणसूत्रे (जीन्स) कुठली आहेत, ते कळते. त्यावरून प्राचीन काळी येथूनच लोक बाहेर गेले आहेत, हे येत्या काळात लक्षात येऊ शकते. ज्याला ‘रिव्हर्स इन्व्हेशन’ (उलट शोध) म्हटले जाईल. याविषयीचे संशोधन बाहेर आले, तर येत्या काळात इतिहासाचे पुनर्लेखन करण्याची वेळ येणार आहे.
It is the fundamental duty of every citizen to protect his heritage – Shri Anil Dhir, Convener, INTACH Bhubaneshwar
Vaishvik Hindu Rashtra Mahotsav
🛕 The Ratna Bhandar of the Sri Puri Jagannath Mandir, a protected ASI monument has not been opened for the past 46 years which as… pic.twitter.com/30D9Yn9FI5
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 28, 2024
ओडिशातील सूर्यमंदिरात ३७ टन वजनाचा दगड शिखरावर गेला कसा ? याचे उत्तर अजून व्यवस्थित मिळालेले नाही. त्या बांधकामात १ इंचही चूक झाली असती, तरी पूर्ण बांधकाम चुकू शकले असते. अशी मंदिरे कशी उभारली गेली ? अशा प्रकारच्या मंदिर संस्कृतीविषयीच्या संशोधनाची आवश्यकता आहे.