थोडक्यात : ५५ कोटींहून अधिक किमतीचा अमली पदार्थ साठा जप्त !………बुलेट ट्रेनसाठी विरार स्थानकाचा समावेश !
५५ कोटींहून अधिक किमतीचा अमली पदार्थ साठा जप्त !
ठाणे – गेल्या ६ महिन्यांत ठाणे पोलिसांनी अमली पदार्थांच्या खरेदी-विक्री प्रकरणात ७२ गुन्हे नोंदवले असून ११२ आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून ५५ कोटी ७६ लाख रुपयांहून अधिक किमतीचे विविध प्रकारचे अमली पदार्थ, अमली पदार्थ निर्मितीचे साहित्य आणि रसायने जप्त केली आहे.
बुलेट ट्रेनसाठी विरार स्थानकाचा समावेश !
वसई – मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी विरार येथे एक स्थानक उभारण्यात येणार आहे. या ट्रेनसाठी राज्यातून एकूण चार स्थानके आहेत. त्यात बीकेसी, ठाणे, विरार आणि बोईसर यांचा समावेश आहे. या अनुषंगाने तेथील परिसराचा विकास करण्यात येणार आहे.
रेल्वेतून खाली पडून तरुणाचा मृत्यू !
रायगड – दिवा-रत्नागिरी या रेल्वेमधून संकेत गोठल (वय २० वर्षे) हा प्रवास करत होता. दरवाजात उभा असतांना त्याचा तोल जाऊन तो महाड येथे खाली पडला आणि त्याचा जागीत मृत्यू झाला.
कल्याण येथे अवैध टपर्या पाडल्या !
कल्याण – येथे शाळा आणि महाविद्यालय परिसरात चालू असलेले बेकायदेशीर ढाबे आणि टपर्या यांच्या विरोधात महापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. बिर्ला महाविद्यालयाजवळील काही टपर्या जेसीबीने पाडण्यात आल्या.
आजपासून दुधाला दर मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन !
मुंबई – दुधाला किमान ३५ रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी राज्यभर दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत. दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २८ जूनपासून राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार आहे.
इंद्रायणी प्रदूषणाच्या निषेधार्थ आंदोलन !
पिंपरी-चिंचवड – पवित्र इंद्रायणी नदीमध्ये मैलामिश्रित सांडपाणी सोडून जलप्रदूषण केले जाते याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे याच्या विरोधात ‘छावा मराठा युवा महासंघा’ने आंदोलन छेडले आहे. देवाची आळंदी यथे नदीपात्रात उतरत छावा मराठा युवा महासंघ संघटनेने प्रतिकात्मक जलसमाधी आंदोलन केले. (असे आंदोलन का करावे लागते ? – संपादक)
संत चैतन्य महाराज यांच्या पालखीचे ओतूर येथे प्रस्थान !
ओतूर (पुणे) – जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे गुरु संत चैतन्य महाराज यांच्या दिंडी सोहळ्याचे ओतूर येथे प्रस्थान झाले आहे. ६४ वर्षांची परंपरा असणार्या या दिंडी सोहळ्याला ओतूर येथून प्रारंभ झाला असून येणार्या ४० दिवसांचा पायी प्रवास करून ही दिंडी पंढरपूर येथे पोचणार आहे.