‘खोटे बोल पण रेटून बोल’, अशी विरोधकांची मानसिकता आहे ! – मुख्यमंत्री
मुंबई, २७ जून (वार्ता.) – लोकसभेतील विजयामुळे विरोधक छाती फुगवून प्रसारमाध्यमांसमोर आले आहेत; पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकणार नाही. आम्हाला दिलेल्या पत्रात कोणतीही सूत्रे नाहीत. तीच तीच सूत्रे त्या पत्रात मांडली जात आहेत. ‘खोटे बोल रेटून बोल’ अशी यांची मानसिकता आहे. स्वतःची पाठ थोपटून घ्यायची ही त्यांची प्रवृत्ती आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २६ जून या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृहावर ही पत्रकार परिषद आयोजित केली होती.
या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विदर्भातील सिंचन प्रश्नावर सरकार अपयशी असे विरोधक म्हणतात; पण हे अपयश महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात झाले आहे. त्यांनीच या मराठवाड्यातील वॉटर ग्रीड रोखले होते. ‘नीट’ पेपरफुटीवरून विरोधक आम्हाला बोलत आहेत; पण उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातच सर्वाधिक पेपरफुटीची प्रकरणे घडली. अमली पदार्थांच्या विरोधात आम्ही लढाई चालू केली. संपूर्ण देशात लढाई चालू झाली आहे. ही कारवाई मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. त्यामुळे ही कारवाई थांबणार नाही.