सद्गुरु सत्यवान कदम यांनी विविध त्रासांवर सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर साधकाला आलेल्या अनुभूती
१. २५ – ३० वर्षांपासून होत असलेला डोकेदुखीचा त्रास नामजपादी उपायांमुळे पूर्णपणे थांबणे
‘मला मागील २५ – ३० वर्षांपूर्वीपासून डोकेदुखीचा त्रास होता. यामध्ये मागचे डोक्याचे केस संपतात (मानेवर), तिथून डोकेदुखीला प्रारंभ होतो आणि भ्रूमध्यापर्यंत वेदना होतात. मला उन्हाकडे बघवतच नाही आणि आठवड्यातून २ दिवस या वेदनाही मला असह्य व्हायच्या. डोकेदुखीच्या गोळ्या घेतल्यानंतर थोडे बरे वाटायचे. या त्रासाविषयी सद्गुरु सत्यवान कदम यांना लिहून पाठवले. त्यांनी मला ‘श्री दुर्गादेव्यै नमः । श्री राम जय राम जय जय राम । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप २ घंटे करण्यास सांगितला. मी नियमितपणे नामजप केल्यावर गेल्या वर्षभरात माझी डोकेदुखी पूर्णत: थांबली.
२. ग्रंथप्रदर्शन सेवेसाठी जागेची स्वच्छता करतांना नामजपादी उपाय केल्याने सापाचा अडथळा दूर होणे
२ अ. सद्गुरु सत्यवान कदम यांनी ग्रंथप्रदर्शन सेवेसाठी ‘जागेची स्वच्छता करण्यापूर्वीच सरपटणार्या प्राण्यांचा त्रास होऊ शकतो’, अशी पूर्वकल्पना देणे : प्रतिवर्षी आम्ही दत्तजयंतीच्या निमित्ताने माणगाव (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील दत्त मंदिराजवळ ग्रंथप्रदर्शन आणि उत्पादन कक्ष लावतो. वर्ष २०२३ च्या दत्तजयंतीसाठी ग्रंथ कक्ष उभारण्यासाठी जागेची स्वच्छता करत होतो. जागेची स्वच्छता करण्यापूर्वीच सद्गुरु सत्यवानदादा यांनी आम्हाला सांगितले होते, ‘‘सांभाळून सेवा करा. सरपटणार्या प्राण्यांचा त्रास होऊ शकतो.’’
२ आ. जागेची स्वच्छता करत असतांना दगडामध्ये साप दिसणे; परंतु तो बाहेर न आल्याने सद्गुरु सत्यवानदादा यांना सांगितल्यावर त्यांनी ‘महाशून्य’ नामजप करण्यास सांगणे : त्यांनी सांगितल्याप्रमाणेच घडले. आम्ही जागेची स्वच्छता करत असतांना तेथील मोठमोठे दगड सावधपणे बाजूला करत होतो. त्या दगडामध्ये एक साप होता. तो अर्धवट बाहेर यायचा आणि फणा काढून परत आतमध्ये जायचा. त्यामुळे आम्हाला त्या जागेची स्वच्छता करता येईना. या संदर्भात लगेचच सद्गुरु दादांना सांगितल्यावर त्यांनी आम्हाला ‘महाशून्य’ हा नामजप एक घंटा करण्यास सांगितला.
२ इ. सद्गुरु सत्यवान कदम यांची सर्वज्ञता ! : माझ्या मनात विचार आला, ‘एक घंट्यानंतर उशीर होईल. दुपारी बारानंतर उन्हाचा त्रास होणार’, हे विचार चालू असतांना सद्गुरु दादांनी पुन्हा संपर्क करून सांगितले की, ‘‘दोन साधकांनी प्रत्येकी अर्धा घंटा नामजप करा.’’ तेव्हा ‘सद्गुरु दादांना माझ्या मनातील विचार समजला’, असे मला समजले.
२ ई. नामजप केल्यावर साप दगडातून बाहेर पडणे : आम्ही दोन साधकांनी प्रत्येकी अर्धा घंटा नामजप केल्यावर साप दगडातून बाहेर पडला आणि त्याला काठीने उचलून दूर नेता आले.
३. कौटुंबिक त्रासामुळे झालेल्या मनस्तापातून नामजपामुळे बाहेर पडता येणे
आमच्या घरात काही कारणावरून मतमतांतर झाले आणि कौटुंबिक संबंध बिघडले. त्याचा मला पुष्कळ मनस्ताप झाला. मी जवळपास दोन-तीन मास तो त्रास सहन केला. नंतर हा सर्व प्रकार सद्गुरु दादांना सांगितला. त्या वेळी सद्गुरु दादांनी मला ‘ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय । श्री गणेशाय नमः । श्री गणेशाय नमः । श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप प्रतिदिन एक घंटा करण्यास सांगितला. तसेच अन्य उपायही सांगितले. त्यांचा परिणाम म्हणून या प्रसंगातून मी जवळपास ८० टक्के बाहेर पडलो. वरील सर्व प्रसंगांतून माझी नामजपावरील श्रद्धा वाढली आहे.
वरील प्रसंगांतून गुरुमाऊलीने (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) पुष्कळ काही शिकवले आहे. तसेच ‘अनुभूती देऊन श्रद्धाही बळकट केली’, याबद्दल त्यांच्या आणि सद्गुरु सत्यवानदादा यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’
– श्री. हेमंत पुरुषोत्तम पावसकर (वय ६३ वर्षे), कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (२२.४.२०२४)