‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त उपस्थित असलेले पू. डॉ. शिवनारायण सेन यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’साठी बंगाल येथील ‘शास्त्र धर्म प्रचार सभे’चे उपसचिव पू. डॉ. शिवनारायण सेन आले होते. गुरुकृपेने मला त्यांना रामनाथी आश्रम दाखवण्याची सेवा लाभली. त्या वेळी मला पू. डॉ. सेन यांच्यातील गुणांचे घडलेले दर्शन श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.
१. सनातन आश्रमाविषयी आपुलकी वाटणे
पू. डॉ. सेन हे अत्यंत आपुलकीने आश्रम पहात होते. ‘हा आश्रम माझा आहे आणि येथील साधक माझे आहेत’, असे त्यांच्या बोलण्यातून सातत्याने व्यक्त होते. ते म्हणाले, ‘‘साधकांनी घरादाराचा केलेला त्याग मोठा आहे. त्यांना घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले एक महात्मा आहेत.’’
२. पू. डॉ. सेन यांनी त्यांच्या ‘शास्त्र धर्मप्रचार सभे’च्या अंतर्गत अनेक ग्रंथांचे संकलन केले आहे, तरीही ‘त्यांना सनातनचे ग्रंथ आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ यांतील लिखाणाविषयी विशेष आत्मीयता आहे.
३. नम्रता
पू. डॉ. सेन संत असूनही अतिशय नम्र आहेत. त्यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे ‘पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन’ (हे एक सॉफ्टवेअर असून यावर संबंधित विषयाची विविध वैशिष्ट्ये दर्शवता येतात.) बघितले. त्यानंतर त्यांनी अतिशय नम्रतेने त्याविषयी जाणून घेतले. त्यांनी ‘त्यांच्या स्तरावर ते काय साहाय्य करू शकतात ?’, याचा विचार केला. त्यांनी बंगालमधील १ – २ मोठ्या कलाकारांची नावे सांगून ‘त्यांना कसा संपर्क करता येईल ?’, याविषयी माहिती दिली.
४. परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र पाहून भावजागृती होणे
पू. डॉ. सेन यांनी ‘छायाचित्रमय जीवनदर्शन खंड ५ – परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुणदर्शन’ या ग्रंथातील पृष्ठ ५१ वरील पिवळी शाल घेतलेले परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र पाहिले. ते पाहून त्यांची भावजागृती होऊन त्यांचा कंठ दाटून आला. ते म्हणाले, ‘‘किती सुंदर रूप आहे ! गुरुदेवजी (परात्पर गुरु डॉक्टर) साक्षात् परमात्मास्वरूप आहेत. त्यांच्या मुखावर किती तेज आहे ! किती सात्त्विकता आहे !’’
– श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.७.२०२२)