मोठ्या, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पांद्वारे ५५.६० लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण !
-
महाराष्ट्राच्या आर्थिक पहाणी अहवालातील माहिती !
-
राज्यात वर्ष २०२३-२४ मध्ये तृणधान्ये आणि कडधान्ये पिकांमध्ये घट !
मुंबई, २७ जून (वार्ता.) – राज्यात वर्ष २०२३-२४ खरीप आणि रब्बी हंगामात पेरणी झालेल्या क्षेत्रावरील पिकांपैकी विशेषतः तृणधान्ये आणि कडधान्ये पिकांमध्ये अनुक्रमे खरीप हंगामात २३ आणि १० टक्के, तर रब्बी हंगामात ५ अन् ४ टक्के घट अपेक्षित आहे, तसेच मोठ्या, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पांद्वारे जून २०२२ पर्यंत ५५.६० लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे, असा अंदाज महाराष्ट्राच्या आर्थिक पहाणी अहवाल २०२३-२४ मध्ये वर्तवण्यात आला आहे. विधानसभेत २७ जून या दिवशी हा अहवाल सादर करण्यात आला.
वर्ष २०२३-२४ मध्ये खरीप हंगामात १५५.६४ लाख हेक्टर क्षेत्रावर आणि रब्बी हंगामात ५८.६० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्यापैकी खरीप हंगामात तेलबिया आणि ऊस या पीक उत्पादनांत अनुक्रमे २ आणि १७ टक्के घट अपेक्षित आहे, तर कापूस उत्पादनात ३ टक्के वाढ अपेक्षित आहे. रब्बी हंगामात तेलबिया उत्पादनात भरीव अशी १३ टक्के वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अहवालात सेंद्रिय शेती उत्पादनात मध्यप्रदेश प्रथम, तर २७ टक्के हिश्श्यासह महाराष्ट्र दुसर्या क्रमांकावर आहे.
जानेवारी ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत झालेला अवेळी पाऊस आणि अतीवृष्टी यांमुळे राज्यातील १६.५५ लाख हेक्टर बाधित क्षेत्रासाठी २२.७४ लाख शेतकर्यांना १७००.५० कोटी रुपये हानी भरपाई राज्यशासनाने संमत केली. परकीय थेट गुंतवणुकीत राज्य देशात सर्वोच्च स्थानी राहिले आहे. मार्च २०२४ पर्यंत केंद्रशासन मान्यता प्राप्त ‘स्टार्टअप्स’मध्ये (नवीन आस्थापन, उद्योगांमध्ये)अखिल भारतीय स्तरावर राज्याचा हिस्सा १९ टक्के आहे. वर्ष २०२२-२३ मध्ये देशाच्या एकूण निर्यातीत राज्याचा हिस्सा १६ टक्के आहे, अशी माहिती या आर्थिक पहाणी अहवालात दिली आहे.