वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा चौथा दिवस (२७ जून) उद़्‍बोधन सत्र – ओटीटी आणि हिंदी चित्रपटसृष्‍टी

अश्‍लीलता पसरवून समाजावर आघात करणार्‍यांवर बलात्‍काराचा गुन्‍हा नोंदवायला हवा ! – उदय माहुरकर, संस्‍थापक, सेव्‍ह कल्‍चर सेव्‍ह भारत फाऊंडेशन, देहली

श्री. उदय माहुरकर

विद्याधिराज सभागृह – भावाने बहिणीवर बलात्‍कार केला, शिक्षकाने विद्यार्थीनींवर बलात्‍कार गेला, वडिलांनी मुलीवर बलात्‍कार केला, अशा घटना समाज घडत आहेत. संस्‍कृतीवरील या आक्रमणाच्‍या विरोधात मागील २० वर्षांपासून आम्‍ही काम करत आहोत. वर्ष २०२० मध्‍ये ‘ओटीटी प्‍लॅटफॉर्म्‍स’ आल्‍यावर व्‍यभिचाराच्‍या सर्व मर्यादा ओलांडण्‍यात आल्‍या आहेत. ‘अल्‍ट बालाजी’ या ओटीटी प्‍लॅटफार्मवर पुरुषाचे आजी, सावत्र आई, सून यांच्‍याशी व्‍यभिचार असल्‍याचे दाखवण्‍यात येत आहे. पुरुषाचे सासूसमवेत, वहिनीसमवेत, मोलकरीण, शेजारीण यांसमेत व्‍यभिचाराचे चित्रण दाखवले जात आहे. भारतावर आक्रमण करणार्‍यांनी जेवढी देशाची हानी केली नाही, तेवढी हानी ‘ओटीटी प्‍लॅटफॉर्म्‍स’वरील व्‍यभिचारी व्‍हिडिओंच्या माध्‍यमातून झाली आहे. ८० टक्‍के बलात्‍कार अशा प्रकारचे व्‍हिडिओ पाहून होत आहेत. समाजाला तोडण्‍याचे हे षड्‍यंत्र आहे. असा व्‍यभिचार दाखवणार्‍यांची जागा कारागृहात असायला हवी. हे रोखण्‍यासाठी आम्‍ही योजना निश्‍चित करत आहोत. अश्‍लीलता पसरवून समाजावर आघात करणार्‍यांवर बलात्‍काराचा गुन्‍हा नोंदवायला हवा. अशांना ३ वर्षांपर्यंत जामीन मिळू नये.  संस्‍कृतीवरील हे आक्रमण राष्‍ट्रद्रोह मानला जावा, असा कडक कायदा या विरोधात असणे अपेक्षित आहे. आम्‍ही केलेल्‍या तक्रारीनंतर ५७ ओटीटी प्‍लॅटफॉर्म्‍स आणि अन्‍य सामाजिक माध्‍यमे यांवर बंदी घालण्‍यात आली आहे. हा व्‍यभिचार रोखण्‍यासाठी सरकारने जी जागृती दाखवायला हवी, ती दाखवली नाही, ही वस्‍तूस्‍थिती आहे; मात्र भविष्‍यात हे रोखण्‍यासाठी ठोस पावले उचलली जातील. हे केवळ सरकारचे काम नाही, तर या सांस्‍कृतिक आघाताविषयी समाजानेही जागृत असायला हवे, असे वक्‍तव्‍य सेवा कल्‍चर सेवा भारत फाऊंडेशनचे संस्‍थापक श्री. उदय माहुरकर यांनी केले. ते ‘ओटीटी प्‍लॅटफॉम्‍सद्वारे पसरवण्‍यात येणारी अश्‍लीलता आणि त्‍याच्‍या विरोधात चालू करण्‍यात आलेली सेव्‍ह केल्‍चर, सेव्‍ह नेशन मुव्‍हमेंट’ या विषयावर बोलत होते.

भारताला ‘विकृत सामुग्रीमुक्‍त’ करण्‍यासाठी प्रतिज्ञा करायला हवी !

श्री. माहुरकर पुढे म्‍हणाले की, ‘नेटफिक्‍स आणि ‘एक्‍स’ द्वारे ‘पोर्नोग्राफी’चे उदात्तीरकण चालू आहे. यावरून अत्‍यंत व्‍यभिचारी व्‍हिडिओ प्रसारित केले जात आहेत. ‘पोर्नोग्राफी’वर बंधी घालण्‍याची मागणी आम्‍ही केंद्रशासनाकडे केली आहे. केंद्र सरकारने मागील १० वर्षांत विविध क्षेत्रांमध्‍ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. काही इस्‍लामी देशांमध्‍ये ‘पोर्नोग्राफी’वर बंदी घालण्‍यात आली आहे. भारतालाही ‘विकृत सामग्रीमुक्‍त’ करण्‍यासाठी आपण प्रतिज्ञा करायला हवी.

संस्‍कृतीरक्षणाचे कार्य करणारी हिंदु जनजागृती समिती जगातील सर्वांत सात्त्विक संघटना !

संस्‍कृतीच्‍या रक्षणासाठी कार्य करणारी हिंदु जनजागृती समिती विश्‍वातील सर्वांत सात्त्विक संघटना आहे. या संघटनेमध्‍ये काम करणारी एकही व्‍यक्‍ती संधीसाधू नाही, असे गौरवोद़्‍गार श्री. उदय माहुरकर यांनी काढले.


सनातन संस्‍था संस्‍कृती रक्षणाचे कार्य करत आहे !

सनातन संस्‍था कोणते आतंकवादी कारवाया करणारी संस्‍था नाही, तर संस्‍कृतीचे रक्षण करणारी संस्‍था आहे. बंदी घालायची असेल, तर देवबंद, तबलिगी जमात यांवर बंदी आणावी, असे वक्‍तव्‍य श्री. उदय माहुरकर यांनी केले.


हिंदु राष्‍ट्र बनवण्‍यासाठी मोठे जनआंदोलन उभारणे आवश्‍यक ! – प्रवीण चतुर्वेदी, संस्‍थापक तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी, ‘प्राच्‍यम’

श्री. प्रवीण चतुर्वेदी

विद्याधिराज सभागृह – आज संपूर्ण जग हिंदु धर्म आणि संस्‍कृती यांना नष्‍ट करण्‍याचा प्रयत्न करत आहे. त्‍यामुळे आपल्‍याला संघटित होऊन त्‍याचा सामना करावा लागेल. हिंदु राष्‍ट्र बनण्‍यासाठी धार्मिकता आणि आध्‍यात्मिकता यांचे मिश्रण असलेले एक मोठे जनआंदोलन उभे करणे आवश्‍यक आहे. तेच हिंदु जनजागृती समिती या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या माध्‍यमातून करत आहे, असे प्रतिपादन ‘प्राच्‍यम्’चे संस्‍थापक तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. प्रवीण चतुर्वेदी यांनी ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या चौथ्‍या दिवशी केले. ‘हिंदु ओटीटी प्‍लॅटफॉर्म ‘प्राच्‍यम्’च्‍या माध्‍यमातून वैचारिक आतंकवाद रोखण्‍यापासून केलेले कार्य’ या विषयावर ते बोलत होते.

‘प्राच्‍यम्’च्‍या स्‍थापनेमागील उद्देश !

ते म्‍हणाले, ‘‘हिंदू त्‍यांचा धर्म आणि संस्‍कृती यांपासून लांब जावेत, यासाठी हिंदुविरोधी शक्‍ती चित्रपट, वाहिन्‍या, यू ट्यूब वाहिनी आणि सामाजिक माध्‍यमे यांचा अतिशय चातुर्याने वापर करून खोटे कथानक (नॅरेटिव्‍ह) पसरवत आहेत. हे नियोजित षड्‍यंत्र देश आणि विदेशांतून चालवण्‍यात येत आहे. ‘भारताच्‍या नवीन पिढीला हिंदु संस्‍कृतीविषयी आत्‍मगौरव वाटू नये’, हा यामागील उद्देश आहे. या खोट्या कथानकाचा प्रतिवाद करून भारताचा खरा इतिहास, हिंदु धर्म आणि महान संस्‍कृती यांचे खरे कथानक लोकांसमोर ठेवावे लागणार आहे. या संकल्‍पनेतून ‘प्राच्‍यम्’ या यु ट्यूब वाहिनीचा प्रारंभ झाला आहे.’’

ओटीटी प्‍लॅटफॉर्मवर ‘प्राच्‍यम्’चा उदय !

ते म्‍हणाले, ‘‘श्रीराममंदिराची प्रतिष्‍ठापना होणार होती. त्‍यामुळे श्रीरामजन्‍मभूमीसाठी रामभक्‍तांना कराव्‍या लागलेल्‍या संघर्षावर एक ‘व्‍हिडिओ’ बनवला होता. तो ‘यू ट्यूब’ वाहिनीवर प्रसारित केल्‍यानंतर १ घंट्याच्‍या आत वाहिनीने काढून टाकला. माझे यू ट्यूब बंद करण्‍याचीही धमकी देण्‍यात आली. त्‍यानंतर हा ‘व्‍हिडिओ’ अन्‍य सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित करण्‍यात आला. त्‍याला कोट्यवधी दर्शकांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. त्‍यानंतर ‘यू ट्यूब’ने हा व्‍हिडिओ परत प्रसारित केला. या बंदीप्रकरणानंतर हिंदूंच्‍या ‘ओटीटी प्‍लॅटफॉर्म’ ‘प्राच्‍यम्’चा प्रारंभ झाला.’ या प्‍लॅटफॉर्मवरून महान भारतीय संस्‍कृतीविषयी व्‍हिडिओ बनवण्‍यात येत असतात. त्‍यामुळे भारतीय युवकांना चांगला संदेश मिळतो.’’

क्षणचित्र :

‘प्राच्‍यम’ ने निर्मित केलेले ‘आपण काय होतो आणि काय बनलो ?, स्‍वातंत्र्यापूर्वी आणि स्‍वातंत्र्यनंतरची स्‍थिती याविषयी सद्यस्‍थिती दर्शवणारा ‘साहेब’, तसेच ‘श्रीरामजन्‍मभूमी संघर्ष’ याविषयावर बनवलेला ‘व्‍हिडिओ’ या वेळी दाखवण्‍यात आला.


काँग्रेसने मुसलमानांना दिलेल्या आश्वासनामुळेच स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत हिंदु राष्ट्र झाला नाही ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती !

श्री. रमेश शिंदे

‘जमियत उलेमा ए हिंद’चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांनी एका सार्वजनिक सभेत सांगितले की, ‘काँग्रेसने स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच मुसलमानांना ‘भारताला हिंदु राष्ट्र केले जाणार नाही’, असे आश्वासन दिले होते.’ त्यामुळेच भारत ‘हिंदु राष्ट्र’ झाले नाही. राज्यघटनेच्या कलम ३६८ मध्ये सरकारला राज्यघटना पालटण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे म्हटले आहे. १०६ वेळा पालट झालेल्या राज्यघटनेत १०७ वा पालट करून भारताला ‘हिंदु राष्ट्र’ करता येऊ शकते.

सामाजिक माध्यमांवरून एक लहान मुलगी ‘मोदी आल्यानंतर भारताचा दरडोई उत्पन्न अल्प झाला’, असे सांगत असल्याचा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला. ज्या वेळी तिला दरडोई उत्पन्न म्हणजे काय ? पूर्वीचे दरडोई उत्पन्न किती होते ? आणि आता किती आहे ? असे विचारल्यावर तिला त्यावर उत्तर देता आले नाही. अशा प्रकारे खोटे कथानक पसरवले जात आहेत, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे.

जगात कुठेही ‘हिंदु आतंकवाद’ अस्तित्वात नाही. अमेरिकेच्या आतंकवाद्यांच्या सूचीमध्ये किंवा ‘विकीपिडिया’वरील आतंकवाद्यांच्या सूचीमध्ये कुठेही ‘हिंदु आतंकवाद’  असा उल्लेख नाही. भारतात मात्र हिंदु आतंकवादाचे खोटे कथानक निर्माण करण्यात आले आहे. ‘एकीकडे आतंकवाद्यांना धर्म नसतो’, असे म्हटले जाते आणि दुसरीकडे हिंदु  आतंकवादाचे खोटे कथानक निर्माण केले जाते. ‘द वायर’ या वृत्तसंकेतस्थळावर ‘आतंकवाद’ आणि ‘कट्टरतावादी’ वेगवेगळे असल्याचे म्हटले आहे आणि त्यांचा लढा भारत सरकारशी हक्कासाठी असल्याचे भासवले जात आहे. हमाससारख्या आतंकवादी संघटनांचा उल्लेख ‘बीबीसी’ वृत्तवाहिनीवर ‘उग्रवादी’ (मिलिटंट) म्हणून केला जातो. काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांचा नरसंहार करणारे, महिलांवर बलात्कार करणारे आतंकवादी नाहीत; मात्र हिंदूंना आतंकवादी ठरवले जाते. अशा प्रकारे खोटे कथानक निर्माण केले जाते.


राष्ट्र उद्ध्वस्त करू पहाणार्‍या शक्तींच्या विरोधात लक्ष केंद्रित करा ! –  विनोद कुमार, संपादक, ‘स्ट्रिंग रिव्हिल्स’, कर्नाटक

श्री. विनोद कुमार

भारत नष्ट करणे हेच काँग्रेसचे कार्य आहे. जगात भारताची नालस्ती करण्याचाच त्यांचा डाव आहे. ते खोटी कथानके सिद्ध करून भारत तोडण्याची भाषा करत आहेत. यासाठी या लोकांनी सामाजिक प्रसारमाध्यमांचा प्रभावी वापर केला. राष्ट्र नष्ट करू पहाणार्‍या या शक्तींच्या विरोधात लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असे विधान ‘स्ट्रिंग रिव्हिल्स’चे संपादक श्री. विनोद कुमार यांनी येथे केले.

श्री. विनोद कुमार पुढे म्हणाले की, भारत सरकारने ‘सीएए’, ‘एन्आरसी’ आणि ‘अग्नीपथ’ या योजना लागू केल्या, तेव्हा या लोकांनी देशात दंगली घडवून आणल्या. भारतात अराजकता निर्माण करणे, हा आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा एक भाग आहे. राष्ट्रविरोधी शक्ती देशाच्या धोरणाच्या विरोधात रस्त्यांवर उतरून दंगली घडवून आणतात. या शक्तींवर प्रतिप्रहार करण्यास राष्ट्रनिष्ठ लोक अल्प पडतात. जॉर्ज सोरोससारख्या लोकांनी खोटी कथानके रचून निवडणुकीच्या निकालावर परिणाम घडवून आणला. हिंदूंनी त्यांचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी सामाजिक प्रसारमाध्यमांचा प्रभावी वापर केला पाहिजे.