स्वामी विवेकानंद यांची शिकवण
आज स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथी (तिथीनुसार) आहे. त्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम !
१. उतावळेपणाने तसेच घाईने काहीही करू नका. पावित्र्य, धीर आणि चिकाटी या ३ गोष्टी कार्याच्या सफलतेसाठी आवश्यक आहेत अन् या सर्वांहून आवश्यक गोष्ट म्हणजे प्रेम ही होय.
२. केवळ स्वतः इच्छा केल्याने कुणी काही मोठा होत नाही, तर सर्वकाही भगवंताच्या इच्छेने घडत असते. त्याला ज्याला वर आणायचे असते, तोच वर येतो आणि ज्याला खाली आणायचे असते, तो खाली येतो. ही गोष्ट लोकांना एखाद्या दिवशी एक क्षणभर जरी कळेल, तरी सर्व दुःख, कष्ट आणि सर्व संघर्ष नाहीसे होतील; पण हा अहंकार आहे ना ! असा पोकळ अहंकार की, ज्याच्या ठाई बोट हालवण्याचीही शक्ती नाही; असा हा अहंकार जर म्हणेल की, ‘मी कुणाला वर येऊ देणार नाही’, तर त्याचे हे म्हणणे किती हास्यास्पद आहे. हा मत्सर, सर्वांनी मिळून कार्य करण्याच्या वृत्तीचा हा अभाव गुलाम बनलेल्या राष्ट्रांच्या स्वभावात मुरलेला असतो; पण हा स्वभाव आपल्याला दूर केलाच पाहिजे.
३. आपल्या राष्ट्राच्या रक्तात एक भयंकर रोग शिरत आहे, तो म्हणजे प्रत्येक गोष्टीचा उपहास करणे आणि कोणत्याही गोष्टीचा गंभीरपणे विचार न करणे हा होय ! हा रोग आपण दूर केलाच पाहिजे, तो आपण नष्ट केलाच पाहिजे. शक्तीसंपन्न व्हा, श्रद्धा असू द्या आणि मग बाकीच्या सर्व गोष्टी आपोआप जुळून येतील.
४. आपल्या ध्येयाविषयी तुमच्या हृदयात उत्कट निष्ठा असली पाहिजे. ही निष्ठा सतत टिकणारी, प्रयत्नशील आणि अचंचल अशी हवी. मेघांमधून पडलेल्या पाण्यावाचून दुसरे कोणतेही पाणी न पिणार्या चातकाप्रमाणे ही निष्ठा असली पाहिजे.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)