मुंबईतून मॅफेड्रोनचा पुरवठा; संगणक अभियंता तरुणासह दोघे अटकेत !

पुणे येथील ‘एल्-३’ बारमधील झालेल्या अवैध मेजवानीचे प्रकरण

पुणे – येथील फर्ग्युसन रस्त्यावरील ‘लिक्विड लिजर लाऊंज’ (एल्-३) बारमध्ये झालेल्या अवैध मेजवानीत मॅफेड्रोनचे सेवन करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलिसांच्या पथकाने एका तरुणाला मुंबईतील गोरेगावमधून कह्यात घेतले आहे. मेजवानीसाठी त्याने मुंबईतून मॅफेड्रोन आणल्याचे अन्वेषणात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. (मुंबईतून कुणाकडून अमली पदार्थ घेतले, ती सर्व साखळी पोलिसांनी नेस्तनाबूत करण्याची आवश्यकता आहे ! – संपादक) नितीन ठोंबरे, करण मिश्रा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जे.एस्. भाटिया यांनी दोघांना २९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ठोंबरे यांना गोरेगाव परिसरातून अटक करण्यात आली. मिश्रा यांना मुंढव्यातून अटक करण्यात आली. ठोंबरे वास्तूविशारद म्हणून काम करतात. मिश्रा हे एका नामांकित आस्थापनात संगणक अभियंता म्हणून काम करतात, दोघे मित्र आहेत. त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांनी पार्टीत अमली पदार्थांचे सेवन केल्याची कबुली दिली. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने ६ कर्मचार्‍यांना (वेटर) अटक केली. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक अनंत पाटील आणि विठ्ठल बोबडे यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे कार्यालयाचे अधीक्षक चरणसिंह रजपूत यांनी दिली.

बारमध्ये अवैध मेजवानीचे आयोजन आरोपी अक्षय कामठे यांनी केले होते. मेजवानीसाठी ऑनलाईन, तसेच रोख स्वरूपात शुल्क स्वीकारण्यात आले होते. सामाजिक माध्यमात कामठे यांनी मेजवानीचे विद्यापन प्रसारित केले होते. मेजवानीत सामील झालेल्या ४० ते ४५ जणांची पोलिसांनी चौकशी केली. पोलिसांनी ८ आरोपींपैकी तिघांच्या रक्ताचे नमुने पडताळणीसाठी कह्यात घेतले होते. रक्त पडताळणीचा अहवाल अद्याप पोलिसांना मिळालेला नाही.