Censor Board On Teesri Begum : धर्माच्या आधारे पक्षपात करणार्या चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचा चेहरा मला जगासमोर आणायचा आहे ! – के.सी. बोकाडिया
|
मुंबई – सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक के.सी. बोकाडिया यांच्या ‘तीसरी बेगम’ या चित्रपटातील संवादातून ‘जय श्रीराम’ हे वाक्य काढून टाकण्याच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात युक्तीवाद चालू आहे. चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने अर्थात् सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात १४ ठिकाणी आक्षेप घेतले होते; परंतु त्यांपैकी १३ पालट करण्याचे मान्य होऊन बोर्डाने या चित्रपटाला ‘केवळ प्रौढांसाठी’ हे प्रमाणपत्र दिले आहे. चौदाव्या आक्षेपाविषयी मात्र बोकाडिया माघार घेण्यास सिद्ध नाहीत. ते म्हणाले की, काहीही होऊ दे, ‘जय श्रीराम’ हे शब्द मी काढणार नाही. हे केवळ माझ्या चित्रपटाशी संबंधित नाही, तर धर्माधारित पक्षपात करणार्या चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या अधिकार्यांचा खरा चेहरा जगासमोर आणण्याविषयीचे हे सूत्र आहे. मला त्यांचा चेहरा जगासमोर आणायचा आहे.
काय आहे ‘जय श्रीराम’विषयीचा हा प्रसंग ?
चित्रपटाच्या शेवटच्या भागात एक मुसलमान कुटुंब ‘जय श्रीराम’, असे म्हणत असल्याचे दाखवण्यात आले आहे. चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने या चित्रपटातून हे शब्द काढून टाकण्यास सांगितले होते.
बोकाडिया यांचा घणाघात !
बोकाडिया पुढे म्हणाले, ‘माझा लढा कोणतीही व्यक्ती किंवा संस्था यांच्याविरुद्ध नसून विचारसरणीविरुद्ध आहे. आज सर्व जण ‘जय श्रीराम’ म्हणतात. जावेद अख्तर हेही सामाजिक व्यासपिठांवर ‘जय श्रीराम’ म्हणत आहेत. मग माझ्या चित्रपटात जर एखादा मुसलमान ‘जय श्रीराम’ म्हणत असेल, तर चित्रपट परिनिरीक्षण मंडळ त्याला आक्षेप कसा घेतो ? श्रीराम हे माझ्या श्रद्धेचे प्रतीक असून इतके चित्रपट करून आणि इतकी प्रसिद्धी मिळवूनही जर मी माझ्या चित्रपटातील श्रीरामाचे नाव वाचवू शकलो नाही, तर माझे सर्व प्रयत्न व्यर्थ जातील, असेही बोकाडिया म्हणाले.
बोकाडिया यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ अधिवक्ता अशोक सरावगी युक्तीवाद करत आहेत.
कोण आहेत निर्माता-दिग्दर्शक के.सी. बोकाडिया ?
देशातील सर्वांत जलद ५० चित्रपट बनवण्याचा विक्रम निर्माते-दिग्दर्शक के.सी. बोकाडिया यांच्या नावावर आहे. अमिताभ बच्चन यांना मुंबई चित्रपटसृष्टीत पुन्हा प्रस्थापित करण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली होती.
संपादकीय भूमिका
|