Robo Dogs : भारतीय सैन्यात लवकरच ‘रोबो डॉग्स’ सहभागी होणार !
नवी देहली – भारतीय सैन्यात लवकरच कुत्र्यांच्या आकाराचे रोबोट कुत्रे (मल्टी-युटिलिटी लेग्ड इक्विपमेंट ) सहभागी होणार आहेत. हे रोबोट कुत्रे आवश्यकता भासल्यास शत्रूंवर गोळीदेखील चालवू शकतात. यांचा वापर प्रामुख्याने पाळत ठेवणे आणि अल्प वजनाचे सामान वाहून नेणे यांसाठी केला जाईल. भारतीय सैन्याने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये १०० रोबोट कुत्र्यांची मागणी केली होती. आता पहिल्या टप्प्यात २५ रोबोट मिळणार आहेत. सध्या प्राथमिक स्वरूपात रोबो कुत्र्यांची खरेदी केली जात आहे. जर या रोबो कुत्र्यांनी चांगली कामगिरी केली, तर त्यांची संख्या वाढवली जाणार आहे.
रोबो कुत्र्यांची वैशिष्ट्ये
१. रोबो कुत्र्याचे वजन ५१ किलोग्राम असून त्याची लांबी २७ इंच आहे. या कुत्र्यांना रिमोटद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते.
२. या कुत्र्यांमध्ये थर्मल कॅमेरे आणि इतर विविध सेंसर लावले आहेत. याच्या साहाय्याने शत्रूचे स्थान सहजरित्या दिसून येईल. हे रात्रीच्या अंधारातदेखील काम करू शकतात.
३. या रोबो कुत्र्यांमध्ये लहान आकाराची शस्त्रेे बसवली जातील, जी गरज पडल्यास शत्रूवर आक्रमण करण्यास सक्षम आहे.
४. रस्ते, जंगल, डोंगर अशा विविध ठिकाणी हे कुत्रे चालू शकते आणि स्वतःसमवेत काही सामानदेखील वाहून नेऊ शकते.
५. या रोबो कुत्र्यांमध्ये बॅटरी आहे, जी एकदा भारित (चार्ज) केल्यावर १० घंटे काम करू शकते.