Sai Baba Idols : तमिळनाडूतील हिंदु मंदिरांतील साईबाबांच्या मूर्ती हटवा !
|
चेन्नई (तमिळनाडू) – ‘तमिळनाडू हिंदु धार्मिक आणि धर्मादाय देणगी विभागा’ला शिर्डीच्या साईबाबांच्या मूर्ती त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या सर्व मंदिरांमधून काढून टाकण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी जनहित याचिका मद्रास उच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. साईबाबांची मूर्ती मंदिरांत स्थापन करणे आगम शास्त्राच्या (मंदिर बांधणे, मंदिरातील पूजा, व्रत आदींच्या संदर्भातील नियमावली) विरोधात असल्याचे यात म्हटले आहे. न्यायालयाने २५ जून या दिवशी यावर सुनावणी करत विभागाकडून या संदर्भात २ आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
राज्यातील कोईम्बतूरमधील डी. सुरेशबाबू यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे. त्यांनी याचिकेत म्हटले आहे की, अनेक मंदिरांमध्ये साईबाबांच्या पांढर्या संगमरवरी मूर्ती बसवण्याच्या वाढत्या प्रथेमुळे मी व्यथित झालो. साईबाबांचे खरे नाव ठाऊक नाही. त्यांचे अनेक मुसलमान अनुयायी असूनही त्यांच्या धार्मिक ओळखीविषयीक कोणतीही माहिती नाही. त्यांच्याविषयीच्या पुस्तकामध्ये साईबाबांची अनेकदा पर्शियन वाक्य उधृत केली आहेत. अल्ला आणि कुराण यांच्याविषयी सांगितले आहे. साईबाबा यांनी वारंवार ‘अल्लाह जेथे ठेवेल तेथे रहा’, असे म्हटले आहे. इस्लाम आणि हिंदु धर्म यांचा प्रचार करणारी व्यक्ती असतांनाही साईबाबांच्या मूर्ती हिंदु मंदिरांमध्ये स्थापित केल्या जात आहेत. या मूर्ती मंदिरांमधून काढून टाकण्यासाठी धर्मादाय विभागाला निर्देश द्यावेत आणि भविष्यातही अशा मूर्ती या मंदिरांमध्ये बसवल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशी विनंती याचिकाकर्त्याने केली आहे.