Arvind Kejriwal Arrest : मद्य धोरण घोटाळा : ‘ईडी’नंतर आता केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक !
नवी देहली – देहली सरकारच्या मद्य धोरण घोटाळ्याच्या प्रकरणी देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी आता आणखी वाढल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालयाच्या (‘ईडी’च्या) अटकेत असलेल्या केजरीवाल यांना आता सीबीआयनेही अटक केली आहे.
केजरीवाल यांचे अधिवक्ता चौधरी यांनी या अटकेचा विरोध करत म्हटले की, ही अटक राज्यघटनेच्या कलम २१ चे उल्लंघन आहे. केजरीवाल यांना सीबीआयने अटक केल्याची बातमी आम्हाला प्रसारमाध्यमांद्वारे समजली. त्यामुळे आम्ही न्यायालयाकडे मागणी केली आहे की, सीबीआयने केजरीवाल यांच्या अटकेसाठी प्रविष्ट (दाखल) केलेला अर्ज आम्हालाही दिला जावा.
काही दिवसांपूर्वीच देहलीतील सत्र न्यायालयाने मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांना जामीन दिला होता; परंतु ‘ईडी’ने उच्च न्यायालयात धाव घेत त्यांच्या जामिनावर स्थगिती आणली. त्या विरोधात केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असता सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची मागणी फेटाळून लावली.