विरोधानंतरही नेपाळची हिंदु राष्‍ट्राकडे वाटचाल ! – श्री. शंकर खराल, विश्‍व हिंदु महासंघ, नेपाळ

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या दुसर्‍या दिवशी पत्रकार परिषदेचे आयोजन

डावीकडून श्री. विठ्ठल चौधरी, डॉ. नीलेश ओक, सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, श्री. शंकर खराल आणि रस आचार्य डॉ. धर्मयश

विद्याधिराज सभागृह, २५ जून (वार्ता.) – नेपाळमध्‍ये बहुसंख्‍य हिंदु समाज असला, तरी हिंदू मात्र चीन, युरोपीयन युनियन आदी विदेशी शक्‍तींकडून मिळणार्‍या अर्थसाहाय्‍यामुळे त्‍यांच्‍या विचारांप्रमाणे कार्य करत आहे. तसेच भारतातील कट्टरतावादी साम्‍यवादी विचारसरणीच्‍या काही विद्यापिठांमधून हिंदुविरोधी विचारांचे कार्यकर्ते हे नेपाळमध्‍ये येऊन हिंदुविरोधी तथा नक्षलवादी कार्य करत आहेत. तरीही नेपाळमध्‍ये पूर्वीपेक्षा हिंदूसंघटन वाढले आहे. जो पक्ष हिंदुत्‍वासाठी कार्य करतो, त्‍याला सर्व हिंदू पाठिंबा देत आहेत. नेपाळ जोमाने हिंदु राष्‍ट्रच्‍या दिशेने वाटचाल करत आहे, असे वक्‍तव्‍य नेपाळ येथील विश्‍व हिंदु महासंघाचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष श्री. शंकर खराल यांनी पत्रकार परिषदेत केले. ते ‘श्री रामनाथ देवस्‍थान’, फोंडा, गोवा येथील श्री विद्याधिराज सभागृहात आयोजित ‘जागतिक स्‍तरावरील हिंदूसंघटन’ या विषयावरील पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी व्‍यासपिठावर इंडोनेशियातील बाली येथील रस आचार्य डॉ. धर्मयश, अमेरिका येथील ‘इन्‍स्‍टिट्यूट ऑफ अ‍ॅडवान्‍स सायन्‍स’चे डॉ. नीलेश ओक, ‘युथ फॉर पनून कश्‍मीर’चे देहलीचे अध्‍यक्ष श्री. विठ्ठल चौधरी आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे हे उपस्‍थित होते.  आफ्रिका येथील ‘इस्‍कॉन’चे श्रीवास दास वनचारी यांनी पत्रकार परिषदेसाठी स्‍वत:चा संदेश पाठवला होता.

हिंदुविरोधी अपप्रचाराला विज्ञानाच्‍या आधारे उत्तर देणे सहज शक्‍य ! – डॉ. नीलेश ओक, अमेरिका

या वेळी अमेरिका येथील ‘इन्‍स्‍टिट्यूट ऑफ अ‍ॅडवान्‍स सायन्‍स’चे डॉ. नीलेश ओक म्‍हणाले की, हिंदु धर्मातील विज्ञानाला ‘अंधश्रद्धा’ संबोधून, तसेच राम-कृष्‍णादी अवतारांना ‘काल्‍पनिक’ संबोधून अपप्रचार केला जातो. प्रत्‍यक्षात आजच्‍या आधुनिक विज्ञानाच्‍या, विशेषतः खगोलशास्‍त्राच्‍या आधारे त्‍यांचा कालावधी निश्‍चित करता येऊ शकतो. त्‍यामुळे विज्ञानाच्‍या आधारे हिंदुविरोधी अपप्रचाराला उत्तर देणे आणि हिंदु धर्माचे श्रेष्‍ठत्‍व सिद्ध करणे सहज शक्‍य आहे. त्‍यादृष्‍टीने सर्वांनी सनातन धर्म शिकण्‍याचा आरंभ आपल्‍या घरातून, विशेषत: लहान मुलांपासून केला पाहिजे.

मुलांना वैदिक परंपरांचे शिक्षण देणे आवश्‍यक ! – रस आचार्य डॉ. धर्मयश, इंडोनेशिया

या प्रसंगी इंडोनेशियातील बाली येथील रस आचार्य डॉ. धर्मयश म्‍हणाले की, आपली पुढची पिढी, हेच आपले भविष्‍य आहे. त्‍यांना आपण भगवद़्‍गीता, रामायण आणि वैदिक परंपरा यांचे शिक्षण देऊन प्राचीन संस्‍कृती शिकवली पाहिजे, मग आपले भविष्‍य उज्‍ज्‍वल असेल.

काश्‍मिरी हिंदूंचा नरसंहार झाल्‍याचे मान्‍य करून सरकारने त्‍यांच्‍या पुनर्वसनाविषयी कृती करणे आवश्‍यक ! – विठ्ठल चौधरी, अध्‍यक्ष, ‘युथ फॉर पनून काश्‍मीर’, देहली

आजही काश्‍मीरमध्‍ये लक्ष्य करून हिंदूंना ठार मारले जात आहे. काश्‍मीरनंतर आता आतंकवादी आक्रमणाचा केंद्रबिंदू जम्‍मूकडे सरकला आहे. ‘पनून कश्‍मीर’च्‍या निर्मितीनेच काश्‍मिरी हिंदूंचे पुनर्वसन शक्‍य आहे. या ‘पनून कश्‍मीर’च्‍या स्‍थापनेत भारतीय आणि सनातन हिंदु धर्मीय महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.

काश्‍मीरच्‍या प्रश्‍नावर काही वर्षांपूर्वी ज्‍याप्रमाणे सर्व हिंदूंनी एकत्र येऊन ‘एक भारत अभियान, चलो कश्‍मीर की ओर’, हे अभियान राबवले होते, ते पुन्‍हा एकदा राबवण्‍याची आवश्‍यकता आहे. ‘काश्‍मिरी हिंदूंचा नरसंहार झाला’, हे मान्‍य करून सरकारने काश्‍मिरी हिंदूंच्‍या पुनर्वसनाविषयी कृती केली पाहिजे.

केवळ भारतीय संस्‍कृती जागतिक स्‍तरावर सर्वांना एकत्र आणू शकते ! – सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्‍ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

भारत सोडून बाहेर गेलेले लोक पुन्‍हा भारतात येत आहेत. अन्‍य धर्मीय लोक मोठ्या प्रमाणावर सनातन धर्माकडे वळत आहेत. विदेशी योग, अध्‍यात्‍म, आयुर्वेदच नव्‍हे, तर समृद्ध आणि परिपूर्ण सनातन भारतीय ज्ञानामुळे प्रभावित होऊन सनातन धर्माकडे आकर्षित होत आहेत. समाधान मिळवण्‍यासाठी भारतीय संस्‍कृतीनुसार आचरण करत आहेत. भारतीय संस्‍कृती ही जागतिक स्‍तरावरील सर्व धर्मियांना एकत्र आणू शकते. तिचा प्रसार करणे आवश्‍यक आहे; म्‍हणूनच या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’चे आयोजन करण्‍यात आले आहे.

संपूर्ण पत्रकार परिषद पहा –

जागतिक स्‍तरावर हिंदु धर्म स्‍वीकारण्‍याचे प्रमाण वाढले आहे ! – श्रीवास दास वनचारी, ‘इस्‍कॉन’, आफ्रिका

आफ्रिका येथील ‘इस्‍कॉन’चे श्रीवास दास वनचारी यांनी पत्रकार परिषदेसाठी  संदेश पाठवला होता. त्‍यात म्‍हटले होते की, जागतिक स्‍तरावर हिंदु धर्म स्‍वीकारण्‍याचे प्रमाण वाढले आहे. हिंदु धर्मग्रंथांचा अभ्‍यास केला जात आहे. भगवद़्‍गीतेतील अद़्‍भूत ज्ञान लक्षात आल्‍यानंतर घाना (दक्षिण आफ्रिका) येथील अनेक चर्चमध्‍ये पाद्य्रांकडून गीतेचे ज्ञान दिले जात आहे.

काश्‍मीरविषयी विचारलेल्‍या प्रश्‍नांना श्री. विठ्ठर चौधरी यांनी दिलेली समर्पक उत्तरे !

प्रश्‍न : काश्‍मीरमधील ३७० कलम हटवले आणि आता केंद्र सरकार तेथे रोजगार, उद्योग आदी आणत आहे. भारत सरकारकडून तुम्‍हाला काय अपेक्षा आहेत ?

श्री. विठ्ठल चौधरी, ‘युथ फॉर पनून काश्‍मीर’ : काश्‍मीरमध्‍ये होणारा जिहाद हा रोजगार मिळवण्‍यासाठी केला जात नाही, तर तो इस्‍लामी राष्‍ट्राच्‍या निर्मितीसाठी केला जात आहे. रोजगार किंवा पैसे यांचे प्रलोबन दाखवून जिहाद रोखला जाऊ शकत नाही. ‘काश्‍मीरमध्‍ये जे चालेले आहे, तो जिहाद आहे’, हे मान्‍य करून तो रोखण्‍यासाठी उपाययोजना काढेल्‍या पाहिजेत. काश्‍मीरमधून ३७० कलम हटवले गेले असले, तरी आतापर्यंत यासंबंधी केवळ एक तांत्रिक बाब पूर्ण झाली आहे. काश्‍मीरच्‍या मूळ स्‍वरूपात पालट झालेला नाही. ३७० कलम हटवले, तरी आजही भारताचा कुठलाही नागरिक काश्‍मीरमध्‍ये भूमी विकत घेऊ शकत नाही. ३७० कलम हटवल्‍यानंतर तेथील सरकारने तेथे अधिवास कायदा (डॉमिसायल अ‍ॅक्‍ट) लागू केला. यामुळे काश्‍मीरमध्‍ये १५ वर्षे वास्‍तव्‍य केलेल्‍या व्‍यक्‍तीलाच तेथील भूमी खरेदी करता येते. केवळ ३७० कलम हटवल्‍याने काश्‍मिरी हिंदूंची काश्‍मीरमध्‍ये पुनर्वापसी होऊ शकत नाही. यासाठी काश्‍मीरमधील समस्‍येचे मूळ कारण शोधून त्‍यावर उपाययोजना काढणे अत्‍यावश्‍यक आहे. काश्‍मिरी हिंदूंनी मागील ७०० वर्षांत काश्‍मीरमध्‍ये ७ वेळा पुनर्वापसी केली आहे. यामुळे ‘ज्‍या ठिकाणी इस्‍लाम बहुसंख्‍य असेल, तेथे अल्‍पसंख्‍य राहू शकत नाही’, हे आम्‍हाला कळून चुकले आहे. यासाठी काश्‍मीरमध्‍ये काश्‍मिरी हिंदूंसाठी ‘पनून कश्‍मीर’ची निर्मिती करावी, जेथे भारताचे राज्‍यघटना पूर्ण स्‍वरूपात लागू असेल. काश्‍मीरमध्‍ये सध्‍या भारतियांना इंडियन’ (Indian)  नव्‍हे, तर ‘ईनडियन’ (‘Endian’ म्‍हणजे जेथे आपला अंत होणार आहे) असे संबोधिले जाते. ‘पनून कश्‍मीर’ची निर्मिती झाल्‍यास अशा समस्‍या रहाणार नाहीत आणि हे हिंदु राष्‍ट्राच्‍या निर्मितीचे ते पहिले पाऊल ठरणार आहे.

प्रश्‍न : मागील १ दशक अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन होत आहे आणि त्‍याचा काश्‍मीरवर कितपत प्रभाव पडला आहे ?

श्री. विठ्ठल चौधरी : आम्‍ही गेली १२ वर्षे हिंदु जनजागृती समितीशी जोडलेलो आहोत. हिंदु जनजागृती समिती ही देशातील अशी पहिली संघटना आहे जिने स्‍वत:हून स्‍वयंस्‍फूर्तीने काश्‍मिरी हिंदूंच्‍या नरसंहारावर भारतभर ‘फॅक्‍ट’प्रदर्शन भरवून या विषयावर प्रकाश टाकला. वर्ष २०१६ पासून ‘युथ फॉर पनून कश्‍मीर’ आणि हिंदु जनजागृती समिती यांनी ‘एक भारत अभियान’, हे राष्‍ट्रव्‍यापी आंदोलन संयुक्‍तपणे राबवले. यामुळे देशातील अनेक भागांमध्‍ये ‘काश्‍मीरमध्‍ये काय चालले आहे ?, ‘काश्‍मीरमधील हिंदूंची स्‍थिती काय आहे ?’, यांविषयी जागृती झाली. या अभियानाचा सरकारवरही काही प्रमाणात दबाव पडू शकला; मात्र जोपर्यंत सरकार काश्‍मीरमधील समस्‍येचे मूळ कारण मान्‍य करून त्‍यावर उपाययोजना काढणार नाही, तोपर्यंत तेथील स्‍थितीत पालट होऊ शकत नाही. अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाच्‍या मंचावरून ‘काश्‍मीरमध्‍ये हिंदूंचा नरसंहार झाला आणि तो न रोखल्‍यास तो भारताच्‍या इतर भागांत पसरेल’, याविषयी भारतभर जागृती करण्‍यात आली आहे.

प्रश्‍न : काश्‍मीरचा प्रश्‍न येतो, तेव्‍हा परराष्‍ट्र धोरणचाही प्रश्‍न आपसूक उद़्‍भवतो ! सैन्‍यामध्‍ये ‘कव्‍हर फायरिंग’ (शत्रूला कमकूवत करण्‍यासाठी त्‍याची कमजोरी ओळखून त्‍याच्‍या कमजोरीवर आघात करणे) नावाची गोष्‍ट आहे. सध्‍या पाकव्‍याप्‍त काश्‍मीर कह्यात घेणे, पाकिस्‍तानचे ४ तुकडे करणे, असा मतप्रवाह चालू आहे. सध्‍या काश्‍मीरमधीलच स्‍थिती चांगली नाही; मग पाकव्‍याप्‍त काश्‍मीर कह्यात घेण्‍यासारख्‍या गोष्‍टी करणे, हे सैन्‍यदलाप्रमाणे ‘कव्‍हर फायरिंग’ करणे असे आहे का ?

श्री. विठ्ठल चौधरी : पाक्‍यव्‍याप्‍त काश्‍मीरला (‘पीओके’ला) आपण ‘पीओके’ असे न संबोधता पाकव्‍याप जम्‍मू काश्‍मीर ‘पीओजेके’ असे संबोधले पाहिजे. ‘पीओजेके’ मध्‍ये सध्‍या काय चालले आहे ?, हे मी सांगू शकत नाही, तर काश्‍मीरसंबंधीच मी बोलेन. काश्‍मीरमध्‍ये जे चालले आहे, तो जिहाद आहे आणि सरकारच्‍या धोरणांविषयी मी काहीही बोलू शकत नाही.

प्रश्‍न : विदेशी मिशनरी नेपाळमध्‍ये धर्मांतर करत आहेत. चीनसुद्धा नेपाळवर सध्‍या कब्‍जा मिळवला आहे. नेपाळला जास्‍त धोका हा धर्मांतराच्‍या कारवायांचा आहे कि चीनपासून आहे ?

नेपाळ येथील विश्‍व हिंदु महासंघाचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष श्री. शंकर खराल : चीन व्‍यापाराच्‍या माध्‍यमातून मध्‍य आशिया खंडातील सर्व देशांवर नियंत्रण मिळवू पहात आहे. चीनपासून धोका कायम आहे. चीनचा नेपाळमधील राजकारणावर मोठा प्रभाव आहे. ज्‍या देशाला संपवायचे असते, तेथील संस्‍कृतीवर अगोदर घाला घालून ती पालटण्‍याचा प्रयत्न होतो. संस्‍कृती म्‍हणजे भोजन, भाषा, वेशभूषा आदी. नेपाळमध्‍ये अशा प्रकारे आक्रमण झालेले आहे.

जेव्‍हा नेपाळ हिंदु राष्‍ट्र होईल, तेव्‍हा भारतालाही हिंदु राष्‍ट्र बनवणे सोपे होईल !

प्रश्‍न : नेपाळ भारताकडून कोणती अपेक्षा करतो ?

श्री. शंकर खराल : बहुसंख्‍य हिंदू लोकसंख्‍या असलेले नेपाळ हे ‘हिंदु राष्‍ट्र व्‍हावे. हा प्रश्‍न केवळ नेपाळमधील हिंदूंशी नव्‍हे, तर जगातील हिंदूंशी निगडित आहे. जेव्‍हा नेपाळ हिंदु राष्‍ट्र होईल, तेव्‍हा भारतालाही हिंदु राष्‍ट्र बनवणे सोपे होईल. यासाठी सर्वांनी संघटित होऊन नेपाळला हिंदु राष्‍ट्र बनवण्‍यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.