स्वतःच्या आजारपणाकडे साक्षीभावाने पहाणारे आणि आपल्या कृतीतून साधकांना आनंद देणारे पू. बलभीम येळेगावकर !
‘देवद (पनवेल) येथील आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे पू. बलभीम येळेगावकर (सनातनचे ८२ वे संत, वय ८९ वर्षे) मागील काही मासांपासून पुष्कळ रुग्णाईत आहेत. त्यांना अंथरुणावरून उठताही येत नाही. त्यामुळे त्यांचा मुलगा श्री. कौस्तुभ येळेगावकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ५५ वर्षे) त्यांच्या सेवेसाठी त्यांच्या समवेत असतात. १५.६.२०२४ या दिवशी श्री. कौस्तुभदादांना काही कारणास्तव गोवा येथे जावे लागणार होते. त्यामुळे मला पू. आजोबांची काही सेवा मिळाली. तेव्हा पू. आजोबांचे दुसरे पुत्र श्री. नाना येळेगावकर हे त्यांच्या सेवेसाठी बार्शी येथून आले होते.
१. सेवेला येणार्या साधकाचे आनंदाने स्वागत करणे
१५.६.२०२४ या दिवशी सायंकाळी ७.१५ वाजता मी आजोबांकडे सेवेसाठी गेलो. त्या वेळी आजारी असूनही ते पुष्कळ आनंदाने मला म्हणाले, ‘‘या रामराया, स्वागत आहे.’’ त्यांच्या या बोलण्याने मला चैतन्य मिळाले. मी पू. आजोबांना सांगितले, ‘‘पू. आजोबा, आज माझा वाढदिवस आहे. मला आशीर्वाद द्यावेत.’’ तेव्हा त्यांनी मला लगेचच आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या.
२. उत्तम स्मरणशक्ती
मी त्यांच्या वयाच्या अनुषंगाने त्यांची विचारपूस केली. ‘मी आणि ते देवद आश्रमात कधीपासून आहोत ?’, याविषयी आमच्यात चर्चा झाली. त्यांनीही ते देवद आश्रमात आल्याचे वर्ष सांगितले.
३. स्वतःच्या आजाराकडे साक्षीभावाने पहाणे
पुढे सेवा चालू असतांनाच ते माझ्याशी आणखी काही वाक्ये बोलले. त्या वेळी ते ‘त्यांचे आजार, कुठलीही अडचण किंवा स्वतःला होणारे त्रास’, यांविषयी एक शब्दही बोलले नाहीत. ‘ते त्यांच्या आजाराकडे पूर्णतः साक्षीभावाने पहात आहेत’, असे माझ्या लक्षात आले आणि ‘माझ्यातही अशा प्रकारचा साक्षीभाव यायला हवा’, असा विचार माझ्या मनात आपोआपच आला.
४. सर्वांना आनंद देणार्या संतांचा सत्संग वाढदिवसाच्या दिवशी मिळाल्याबद्दल साधकाला कृतज्ञता वाटणे
मी त्यांच्याकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य ग्रहण करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी मला पुष्कळ आनंद जाणवला. ‘संत सतत सर्वांना आनंद देत असतात’, हे या प्रसंगातून मला शिकायला मिळाले. ‘गुरुदेवांनी आज मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी संतांचा सत्संग दिला’, याबद्दल माझ्या मनात कृतज्ञता दाटून आली.
५. साधकाच्या वाढदिवसानिमित्त त्याला आठवणीने प्रसाद देणे
मी त्यांच्या खोलीतून बाहेर गेल्यावर पू. आजोबांनी त्यांच्या मुलाला सांगितले, ‘‘रामचा (माझा) आज वाढदिवस होता, तर त्याला खाऊ द्यायला हवा होता.’’ तेव्हा पुष्कळ रात्र झाली होती. मी दुसर्या दिवशी सकाळी त्यांच्याकडे सेवेसाठी गेलो. तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितले, ‘‘रामला त्याच्या वाढदिवसानिमित्तचा खाऊ आता पिशवीत घालून दे.’’ हे ऐकून मला फार कृतज्ञता वाटली.
६. गुरुकार्याचा विचार करणे
माझा समष्टी सेवेतील वेळ अधिक जायला नको; म्हणून पू. आजोबांनी त्यांच्या मुलाला आधीच सांगितले होते, ‘‘जेव्हा आवश्यकता असेल, तेव्हाच रामला बोलवा. अन्य वेळी त्याचा वेळ जायला नको.’’
या प्रसंगातून ‘गुरूंचे कार्य व्हावे’, याकडे संतांचे पुष्कळ लक्ष असते’, हे मला शिकायला मिळाले.
परम पूज्यांनी मला संतसेवेची संधी दिल्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. रामचंद्र दगडू पांगुळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.६.२०२४)