कुख्यात गुंड विजय पलांडे याची सरकारी अधिवक्ता पालटण्याची मागणी !
भाजपकडून निवडणूक लढवलेल्या सरकारी अधिवक्ता उज्ज्वल निकम यांच्या नावाला विरोध
मुंबई – महाराष्ट्रातील कुख्यात गुंड तसेच विविध हत्याकांडांतील आरोपी विजय पलांडे याने स्वतःच्या खटल्यात ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी अधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यास विरोध केला आहे. २४ जून या दिवशी पलांडे याने न्यायालयात आवेदन करून ‘भाजपकडून निवडणूक लढवलेले अधिवक्ता उज्ज्वल निकम यांना माझ्या खटल्यातून काढा’, अशी विनंती केली आहे. ‘निकम यांची माझ्या खटल्यातील नियुक्ती दुर्भावनापूर्ण आणि चुकीच्या हेतूने करण्यात आली आहे’, असा दावाही त्याने केला आहे.
देहली येथील व्यापारी अरुण टिक्कू तथा चित्रपट निर्माते करणकुमार कक्कर यांच्या हत्येप्रकरणी अटक झाल्यानंतर एप्रिल २०१२ पासून विजय पलांडे न्यायालयीन कोठडीत आहेत. त्याच्या खटल्यात विशेष सरकारी अधिवक्ता म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.