सद्गुरु सत्यवान कदम यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
१. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पार्सलच्या सेवेसंदर्भातील अडचणींवर सद्गुरु सत्यवान कदम यांनी सांगितलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर अडचणी त्वरित सुटणे
‘माझ्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दैनिक ‘सनातन प्रभात’ची पार्सले पाठवण्याच्या (दैनिकांचे बांधलेले गठ्ठे पाठवण्याच्या) संदर्भात समन्वयाची सेवा आहे. काही मासांपूर्वी पार्सल ठेवायच्या ठिकाणी बर्याच अडचणी येत होत्या, उदा. पार्सल फाटून दैनिकांचे तुकडे झालेले असायचे, २ – ३ वेळा कुत्र्यांनी पार्सल फाडले, पार्सल गहाळ होणे, पार्सल योग्य ठिकाणी न पाठवले जाणे, पार्सल सेवेसाठी साधक न मिळणे इत्यादी. याविषयी सद्गुरु सत्यवान कदम (सद्गुरु दादा) यांना सांगितल्यावर त्यांनी पुढील उपाय सांगितले.
अ. पार्सल सेवेला जाणार्या सर्व साधकांनी ‘श्री हनुमते नमः ।’ हा नामजप करावा.
आ. पार्सल ठेवत असलेल्या ठिकाणी सूक्ष्मातून ‘श्री हनुमते नमः ।’ या नामजपाचे मंडल काढावे.
वरील दोन्ही उपाय नियमितपणे चालू केल्यावर पार्सलसेवेच्या संदर्भातील सर्व अडचणी सुटल्या, तसेच पार्सल सेवा करणार्या साधकांचा उत्साहही वाढला.
२. सद्गुरु सत्यवान कदम यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे
२ अ. तळमळ आणि प्रीती : मी सद्गुरु दादांना माझे आध्यात्मिक त्रास कळवल्यावर त्यांच्याकडून नामजपादी उपाय त्वरित कळवले जातात. त्यांनी सांगितलेले नामजपादी उपाय करण्यास आरंभ केल्यावर लगेच त्रास उणावतो. यातून साधकांचे त्रास अल्प होण्याबद्दलची सद्गुरु दादांची तळमळ आणि त्यांची साधकांप्रतीची प्रीती शिकायला मिळते.
२ आ. सद्गुरु सत्यवान कदम यांनी साधिकेचा अहं वाढल्यावर प्रतिसाद न देणे आणि साधिकेचा शरणागतभाव वाढल्यावर प्रतिसाद देणे : जेव्हा माझी बहिर्मुखता आणि अहं वाढलेला असतो, तेव्हा सद्गुरु दादा माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. एखाद्या प्रसंगात जेव्हा मला त्यांचा प्रतिसाद मिळत नाही, तेव्हा मी अंतर्मुख होण्यासाठी चिंतन करते. ज्या वेळी माझा शरणागतभाव असतो, तेव्हा सद्गुरु दादा बोलतात आणि मला प्रतिसाद देतात.
हे गुरुराया, सद्गुरु दादांच्या रूपाने आपण सतत आमच्या सोबत असता. याबद्दल आम्ही आपल्या चरणी कृतज्ञ आहोत.’
– सौ. मंजुषा मनोजकुमार खाडये, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (३१.३.२०२४)
|