अमली पदार्थ मेजवानी झालेल्या ‘एल्-३ बार’चा परवाना उत्पादन शुल्क विभागाकडून निलंबित !
पुणे – येथील एफ्.सी. रोडवरील ‘लिक्विड लिझर लाऊंज’ या ठिकाणी २३ जूनच्या मध्यरात्री अमली पदार्थ आणि मद्याची मेजवानी झाली होती. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी ९ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करून ८ जणांना अटक केली आहे, तर शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील २ बीट मार्शल, १ साहाय्यक पोलीस निरीक्षक, १ पोलीस निरीक्षक यांचे निलंबन झाले असून हलगर्जीपणामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागातील १ निरीक्षक आणि १ दुय्यम निरीक्षक यांचेही निलंबन झाले आहे. आता या प्रकरणात संबंधित ‘एल-३’ या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यसाठा जप्त केल्याची आणि हॉटेलचा परवाना निलंबित केला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सी.बी. राजपूत यांनी दिली आहे.
भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की, शिक्षणाचे माहेरघर आणि आयटी उद्योगाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणार्या शहरात पब संस्कृती वाढू देणार नाही. या प्रकरणी पोलीस अधिकारी, महापालिका काहीही करणार नसेल, तर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत.
पुणे महानगरपालिकेकडून अनधिकृत पब आणि बारवर धडक कारवाई !पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी अवैध पब्जवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच अमली पदार्थांशी निगडीत अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर पुणे महानगरपालिकेने एफ्सी रोडवरील अनधिकृत पब, बारवर कारवाई करण्यास चालू केले आहे. पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी एफ्सी रोडवर आले असून अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई चालू झाली आहे. अनधिकृत बांधकामावर अधिकार्यांनी हातोडा फिरवण्यास आरंभ केला आहे. |