आळंदी देवस्थानचे प्रमुख योगी निरंजन यांची आंदोलनाची चेतावणी
इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाकडे सरकारचे दुर्लक्ष !
आळंदी (जिल्हा पुणे) – अवघ्या काही दिवसांवर आलेल्या आषाढी वारी सोहळ्यावर इंद्रायणीच्या प्रदूषित पाण्याचे संकट कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सातत्याने रसायनमिश्रित पाणी थेट नदीत सोडले जात आहे. त्यामुळे इंद्रायणी नदी फेसाळली आहे. आषाढी वारीनिमित्त देहू आणि आळंदी येथे येणारे लाखो वारकरी याच इंद्रायणीच्या पाण्यात अंघोळ करतात. लाखो भाविक तीर्थ म्हणून हे पाणी प्राशन करतात. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाल्यास त्याला उत्तरदायी कोण ? वारंवार सांगूनही या नदी प्रदूषणाकडे लक्ष देत नसल्याने सरकारची संवेदनशीलता संपली आहे का ? असा संताप व्यक्त करत ‘आंदोलन करण्यास भाग पाडू नका’, अशा शब्दांत आळंदी देवस्थानचे प्रमुख योगी निरंजन यांनी सरकारला चेतावणी दिली आहे.
संपादकीय भूमिकाअशी चेतावणी का द्यावी लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ? न्यायालयीन यंत्रणा, पोलीस यांनी एकत्र येऊन प्रदूषण करणार्यांच्या विरोधात कारवाई करायला हवी. केवळ इंद्रायणीच नव्हे, तर देशातील सर्वच नद्यांच्या संदर्भात अशी कठोर दंडात्मक भूमिका घेतली, तर पुढे होणार्या प्रदूषणाला आळा घालता येईल ! |