प्रसिद्धीचा जीवघेणा ‘स्टंट !’
आजकाल वेगळे काहीतरी करायच्या नादात स्टंटबाजी करण्याची ‘फॅशन’च आली आहे. त्यासाठी लोक जिवाचीही पर्वा करत नाहीत, याची वेगवेगळी उदाहरणे पहायला मिळतात. सामाजिक माध्यमांवर प्रसारित होणारे ‘व्हिडिओ’ पाहून अतीउत्साही लोक नवनवीन ‘स्टंट’ करण्याचा प्रयत्न करतात. तरुणांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. असेच एक वृत्त वाचनात आले. एक वडील स्वत:ची हौस पूर्ण करण्यासाठी ‘बंजी जंपिंग’ (पुष्कळ उंच ठिकाणाहून शरिराला योग्य ती सुरक्षा घेऊन खाली उडी मारणे) करतांना दिसत आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे यामध्ये त्यांनी स्वतःच्या अंदाजे ५-६ वर्षांच्या मुलाला त्यांनी मिठीत घेतले आहे. ‘बंजी जंपिंग’ करतांना वडिलांनी सुरक्षिततेची काळजी आहे; मात्र मुलाला कोणतीही सुरक्षा घेतलेली नाही. त्यांनी त्याला ना स्वत:ला बांधले आहे, ना त्याला जॅकेट घातले आहे. अत्यंत धोकादायक पद्धतीने ते सहस्रो फूट उंचीवरून उडी मारत आहेत. अशा वडिलांना ‘पिता’ म्हणावे कि मुलाच्या जिवावर उठलेला ‘हैवान’ ? असाच प्रश्न पडतो. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी वडिलांना ‘जगातील सर्वाधिक वाईट पिता’ ठरवले आहे.
काहींनी त्याला अटक करण्याची, तसेच ‘बंजी जंपिंग’साठी वयोमर्यादा घालण्याची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वीही आरोग्याविषयी सतर्क असणार्या एका वडिलांनी स्वत:चा ६ वर्षीय मुलगा जाड असल्याने त्याला ट्रेडमिलवर पळायला लावले आणि त्यात त्या छोट्या जिवाने जीव गमावला. एका मुलाने मुलीला इमारतीवरून पूर्ण खाली एका हाताने पकडल्याचे ‘रील’ (छोटे व्हिडिओ) प्रसारित झाले; पण हे सर्व न थांबवता येण्यासारखे आहे का ? नक्कीच नाही !
आजकाल सामाजिक माध्यमांचा सर्वांवर पुष्कळ प्रभाव आहे. धाडसी कृत्य करून त्याचे ‘रील’ बनवून ते प्रसारित करणे अथवा काहीतरी ‘अतरंगी’ कृत्य करून प्रसिद्धी मिळवण्याचे प्रमाण लहान मुले आणि युवावर्गात वाढत आहे. याला आळा घालणे तर दूरच; पण मोठी माणसेही त्यात सहभागी होतात हे खेदजनक आहे. दूरदर्शवर प्रसारित होणारी काही विज्ञापने वास्तवाचे भान न ठेवता केलेली असतात. शीतपेयाचे विज्ञापन करतांना शीतपेय पिऊन अभिनेत्याने मोठ्या दरीत उडी मारली, तरी त्याला कसलीही दुखापत झाली नाही, अशा प्रकारची विज्ञापने आपण पाहिली आहेत. वास्तवाचे भान नसलेली अशी विज्ञापने पाहून तसे काहीतरी करण्याचे लहान मुलांच्या मनात येऊ शकते. त्यामुळे अशा घटनांना कारणीभूत ठरणार्या यांसारख्या प्रत्येकच घटकांवर कारवाई होणे आवश्यक आहे, तरच त्याला आळा बसेल ! काहीतरी ‘हटके’ करण्याच्या नादात नंतर ‘फटके’ बसल्यास स्वत:ला दोष देण्यात काहीच अर्थ नाही, हे लक्षात घ्यायला हवे !
– श्री. संदेश नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.