सांध्यांचे वाढते त्रास आणि त्यावर करावयाचे साधे-सोपे उपचार !

रस्त्यांवरील वाहतूक आणि खड्डे चुकवतांना मणके खिळखिळे होऊन जातात. त्यातून लांबपर्यंत दुचाकीवरून प्रवास करणे स्वतःच्या पाठीच्या कण्यावर चांगलाच ताण आणणारे आहे. सध्या येणार्‍या रुग्णांमध्ये कंबरेच्या मणक्यात दोष असण्याचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. त्यातच आपण सर्वच गोष्टी उभ्याने करतो. ओट्यापाशी उभे राहून मग जेवण ‘डायनिंग टेबल’वर आणि मग सोफा किंवा खुर्ची या सगळ्या हालचालींमध्ये कंबर अन् मान यांच्याकडे लक्ष दिले जात नाही. पायही सतत एकाच स्थितीत असल्याने पायाचे छोटे सांधे/पावले दुखणे हे लक्षण दिसते. विशेषतः कणीक मळतांना किंवा पोळ्या करतांनाही हे त्रास होतात, अशा तक्रारी येतात. त्यातून पोटात गॅसेस (वायू), मलावरोध या तक्रारी असतील, तर हे त्रास अजून जाणवतात.

संधीवात

१. संधीवात, आमवात यांसारख्या व्याधी वाढण्यामागील कारणे

आपल्याकडे घरात येणार्‍या मदतनीस मावशी असतात. त्यांचे काम थंडी असो, उन्हाळा असो, त्या पाण्यात सतत काम करत असतात. ‘आदल्या दिवशीची पोळी/भात दुसर्‍या दिवशी खाणे, म्हणजे शिळे खाणे असते’, हे त्यांना बर्‍याचदा ठाऊक नसते. प्रतिदिन घरात उरलेली पोळी नाश्त्याला खाऊन हा महिलावर्ग बाहेर पडत असतो. असे शिळे आणि तिखट खाणे, सतत उभ्याने कामे आणि पाण्यातील सलग कामे, अशा पद्धतीचे काम असणार्‍या सगळ्या व्यक्तींमध्ये छोटे सांधे दुखणे किंवा हाताची पेर, मनगटाचे सांधे दुखणे, सुजणे हे लक्षण पुष्कळ सामान्यपणे दिसते. त्यात वेदनाशामक गोळ्या घेत राहून काम करत रहाणे आणि दुखणे अंगावर काढणे यांमुळे या वेदना वाढत रहातात. अगदी प्रतिदिन वेदनाशामक गोळ्या किंवा इंजेक्शन घेत रहाणारे भरपूर लोक आहेत; कारण त्याखेरीज वेदना आटोक्यात येतात, हेच त्यांना ठाऊक असते. आमच्याकडील मदतनीस वर्ग जेव्हापासून आमच्याकडे आहे, तेव्हापासून पूर्णपणे आयुर्वेद औषधे घेत आहे, ज्याचा लाभ होतो. आपण सर्वांनीही आपल्या परीने हे त्यांना सांगत रहायला हवे; कारण संधीवात, आमवात यांसारख्या व्याधी पटकन आटोक्यात येणार्‍यातील नाहीत आणि काम बुडवून घरी बसणे, हेही परवडण्यासारखेही नसते. यासाठी पुढील काही गोष्टी करता येतील –

वैद्या(सौ.) स्वराली शेंड्ये

२. सहज करण्यायोग्य साधे-सोपे उपचार

अ. किमान २० मिनिटे पुढे-मागे वाकण्याचे व्यायाम किंवा योगासने करणे.

आ. व्यायामाला अजिबातच वेळ होत नसल्यास कामे करतांनाच मुद्दाम थोडा वेळ खाली बसणे, उठणे, घरातील पसारा आवरतांना मुद्दाम वाकून मग उठणे, स्वयंपाकघरात काम करतांना किंवा गाडीतून प्रवास करत असतांना हाता-पायाच्या छोट्या सांध्यांचे व्यायाम करणे.

इ. स्वयंपाक करतांना उभ्या उभ्या मानेचे आणि हाताच्या सांध्यांचे व्यायाम करणे.

ई. आम्लपित्त आणि मानदुखी यांचा जवळचा संबंध असल्याने त्याकडे लक्ष देणे.

उ. पोट पूर्ण साफ होण्याकडे लक्ष ठेवणे.

ऊ. जागरण, शिळे; आंबट, खारट, तिखट चवींचे आणि कोरडे खाणे अल्प ठेवणे.

ए. स्तनपान करणार्‍या महिला वर्गाने ‘पोश्चर’कडे विशेष लक्ष ठेवणे.

ऐ. मान, सांधे आणि कंबर यांना अंघोळीच्या आधी नियमित तेल लावून अभ्यंग करणे.

अशा काही प्रतिदिन करता येण्यासारख्या गोष्टी आहेत, ज्यामुळे सध्याच्या, विशेषतः सांध्याचे त्रास वाढवणार्‍या सर्व दिनचर्येच्या तोट्यांना आळा बसेल.

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.