कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा !’
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघाच्या वतीने ब्राह्मणसभा करवीर, मंगलधाम येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. या प्रसंगी गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि मान्यवर यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. दहावीच्या परीक्षेत उत्तम यश संपादन केलेल्या दिव्यांग (अपंग) प्रणव पोटे आणि गतीमंद अद्विका लोंढे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी स्मार्त चुडामणी श्री. अरुण वझे गुरुजी (पुणे) होते, तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती वैशाली काशीद या उपस्थित होत्या.
या प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रांमध्ये नि:स्वार्थी सेवा करत असलेल्या महनीय लोकांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात ‘नॉर्थस्टार हॉस्पिटल’चे डॉ. दीपक जोशी, श्री. राजू मेवेकरी, श्री. संभाजी (बंडा) साळुंखे, श्री. महेश उरसाल आणि अंध असलेल्या श्री. अजय वनकुद्रे यांना हे पुरस्कार देण्यात आले. या प्रसंगी श्री. अरुण वझे म्हणाले, ‘‘प्राचीन भारतीय विद्याशाखांचे रक्षण करणे आवश्यक आहे, तसेच आपल्या विद्येचा समाजातील शेवटच्या घटकालाही लाभ व्हायला हवा.’’
या प्रसंगी कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघाचे अध्यक्ष श्री. प्रसाद निगुडकर, उपाध्यक्ष श्री. सचिन पितांबरे, सर्वश्री मंदार जोशी, अमोघ भागवत, ओंकार कारदगेकर यांसह अन्य उपस्थित होते. श्री. निखिल शेंडूरकर यांनी आभार मानले.