संपादकीय : पुण्यनगरीतील ‘अंमल’ !
काही दशकांपूर्वी बहुभाषिकांची मायावी नगरी आणि भारताची आर्थिक राजधानी मुंबई ही गुन्हेगारी, अमली पदार्थ आदींचे माहेरघर होती; परंतु या विशेषतः गेल्या वर्षभरात सांस्कृतिक राजधानी पुण्यनगरीतील अमली पदार्थांचा व्यापार, अपघात आणि गुंडांची दहशत यांच्या घटना अन् त्यामध्ये अडकलेल्या उच्चपदस्थ अधिकार्यांची नावे आदी पहाता पुणे ही पुण्यनगरी नव्हे, तर ‘तापदायी अराजकांची नगरी’ झाल्याचे पुढे येत आहे. पंजाबमधून चालू झालेले भारतावरील अमली पदार्थांचे आक्रमण मराठमोळ्या पुण्यापर्यंत कधी येऊन पोचले, ते कळलेच नाही. ललित पाटील प्रकरणानंतर मात्र सर्वांचे डोळे खाडकन् उघडले आणि आता तर प्रतिदिन येणार्या नित्य नव्या वृत्तांनी पुण्याचे हे दुसरे भयावह रूप जगासमोर येत आहे. मुंबईमधील सर्वच वाईट गोष्टींशी पुणे आता जणू स्पर्धा करत आहे !
अमली पदार्थ आणि ‘पब’ यांचे माहेरघर ?
अफू, गांजा, हेरॉईन हे अमली पदार्थ सिद्ध करण्यासाठी पीक घ्यावे लागत असल्याने त्याला एक मर्यादा होती; पण आता ‘मॅफेड्रॉन’, म्हणजे ‘एम्.डी.’ हा अमली पदार्थ रसायना(केमिकल)पासून बनत असल्याने त्याचे उत्पादन भरमसाठ होत आहे. त्यामुळे तो मेजवानीतील अमली पदार्थ (पार्टी ड्रग) बनला आहे. बॉलिवूडचे अनेकांचे आदर्श असलेले अभिनेते, अभिनेत्री अमली पदार्थ घेत असल्याचे ३ वर्षांपूर्वी नावांसहित उघड करण्यात आले होते, तसेच एका प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा अमली पदार्थाच्या प्रकरणातून सुटला आहे. काही मासांपूर्वी गुजरातच्या किनार्यावर मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांच्या बोटी पकडल्या जात होत्या, तरीसुद्धा विरोधी पक्ष शासनावर टीका करत होते. अमली पदार्थ पकडले गेले नसते, तर काय झाले असते ?, हे लक्षात घेतले जात नाही. अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला थेट छोटा राजनच्या टोळीकडून ‘ही तस्करी कशी करायची ?’,याच्या प्रशिक्षणाचे धडे मिळाल्याचे पुढे आले. सप्टेंबर २०२३ मध्ये ससून रुग्णालयाच्या दारात २ कोटी रुपयांचे अमली पदार्थ पकडले गेले. फेब्रुवारी २०२४ मध्ये पुणे पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचे मॅफेड्रॉन जप्त केले. ललित पाटील प्रकरणात पुण्यात एका पोलिसाला ‘सोमवार पेठेत अमली पदार्थ विकायला येणार’, या मिळालेल्या साध्या माहितीवरून तेथील अन्य अनेक ठिकाणे, कारखाने, आस्थापने, नंतर सांगली, देहली, लंडनपर्यंत ही साखळी पोलिसांना मिळाली. या सर्व ठिकाणी धाडी पडत असतांना मुख्य बिहारी आरोपी आणि लंडनचे नागरिकत्व असलेला संदीप भुनिया विदेशात पळून गेला. या आरोपींची मोठी साखळी होती. त्यांनी कुरियर पाठवण्याचे जाळेही विणले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ विकले जात आहेत, याचा अर्थ पुण्यातील शेकडो तरुण-तरुणी यामध्ये फसलेले आहेत, हे उघड होते. त्याचा परिणाम आताही दिसत आहे. २ दिवसांच्या फरकाने येथील ‘पब’ आणि ‘मॉल’ येथे अमली पदार्थ सेवन करतांना तरुण-तरुणींचे व्हिडिओ प्रसारित होत आहेत. पुण्यातील अमली पदार्थांची प्रतिदिन येणारी ही नित्य नवी वृत्ते, म्हणजे ‘अमली पदार्थ’ हा विषय आता डोक्यावरून पाणी वाहून गेल्याचेच दर्शक आहे. मुंबईत गेल्या महिन्याभरात ४७० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले, ओडिशा येथून आलेला १११ कोटी रुपयांचा गांजा पकडण्यात आला. मुंबईत मागील काही दिवसांत ३५१ गुन्हे नोंद झाले आणि ३ सहस्र ६४० जणांवर कारवाई झाली. अशा प्रकारच्या कारवाईचा वेग आता पुण्यानेही पकडायला हवा.
घरभेद्यांना कसे आवरणार ?
शत्रू परकीय असतो, तेव्हा सर्व जण मिळून त्यावर तुटून पडू शकतात; पण येथे घरातील अनेक जण शत्रूला मिळालेले असल्याने या किडीने आतपर्यंत वाळवीसारखे घर पोखरले आहे. कारागृहातून ललित पाटील याला रुग्णालयात पाठवण्यासाठी ज्या अधिकार्यांनी साहाय्य केले, त्यांची पाळेमुळे खोदून काढायला हवीत. यात केवळ आंतरराष्ट्रीय गुंडांना मिळालेले ललित पाटीलसारखे तस्करच नव्हे, तर प्रशासकीय किंवा रुग्णालयातील अधिकारीही केवळ संकुचित स्वार्थापोटी या राष्ट्रद्रोही कृत्यांना पाठिंबा देत आहेत. उद्या त्यांची मुलेही यामध्ये फसू शकतात, असे त्यांना का वाटत नाही ? ज्या देशात आपण रहातो, त्या देशाची भावी पिढी, म्हणजे तो देशच एक प्रकारे उद्ध्वस्त होणार आहे, हे त्यांना कसे लक्षात येत नाही ? जिथे गुन्हे रोखले जाऊ शकतात, ते कुंपणच शेत खात असल्यावर तो देश अमली पदार्थांनी पोखरल्याखेरीज कसा राहील ? भारतीयच स्वदेशाशी फितुर झाले आहेत आणि अमली पदार्थाचा व्यवसाय इथे वाढवत आहेत. कारागृहातील अधिकारी, ससून रुग्णालयाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि अधिकारी अशी त्यांची मोठी सूची आहे. हा राजकारणाचा विषय नाही, हे तर उघडच आहे; परंतु याला अनुमती देणार्या सर्व स्तरांतील अधिकार्यांना शासनातील कुठल्या तरी घटकाकडून कुठेतरी लपवण्याचा वा पांघरूण घालण्याचा भाग होत आहे का ? असा संशय कुणालाही आला, तर तो दुर्लक्षित करून चालणार नाही. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आणि पब किंवा बार मालक यांचे संबंध असल्याचा आरोप केला आहे. हे संबंध असतात, हे तर सर्वांना ठाऊक असलेले गुपित आहे; म्हणून तर ‘डान्स बार’ आजही सर्वत्र वेगवेगळ्या नावाने चालू असलेले दिसतात. काही पैशांसाठी आपण आपल्या देशाची पुढची पिढी नेस्तनाबूत करायला निघालो आहोत, याचे भान यात गुंतलेल्या अधिकार्यांनाही असू नये, हे खचितच दुर्दैवी आहे. अशा व्यक्ती भारतासाठी कलंक आहेत.
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांपर्यंत जाणे आणि येथील स्थानिक प्रशासन अन् काही प्रमाणात शासन (?) यांचा त्यामध्ये असलेला हस्तक्षेप ही दोन्ही पोलिसांपुढील मोठी आव्हाने आहेत. ही केवळ पोलिसांपुढील नाही, तर पर्यायाने देशापुढील, म्हणजेच स्वतःपुढील आव्हाने आहेत. आज श्रीमंत कुटुंबातील मुलांसमवेत मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलेही त्यात अडकत आहेत. हडपसर येथील हॉटेल ‘कल्ट बार’ आणि पुण्यातील एफ्.सी. रोडवरील हॉटेल ‘द लिक्विड लिझर लाऊंज’ ही हिमनगावरील टोके असू शकतात. अमली पदार्थांच्या जाळ्याचा शोध घेतांना एकात एक असे अनेक संदर्भ पोलिसांना पुष्कळ मोठ्या प्रमाणात मिळतात आणि त्याची पाळेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर जातातच. त्या मुळावरच मोठा ‘सर्जिकल स्ट्राईक’ झाला आणि येथील पापाचारींना कठोरात कठोर शिक्षा झाली, तरच अमली पदार्थांचा भारतात पुरवठा करणारी अन् ते निर्माण करणारी साखळी तोडली जाईल. धर्माचरणाने निर्माण होणारी कट्टर राष्ट्रभक्तीच स्थानिक तस्कर आणि अधिकारी यांना त्यांतील सहभागापासून रोखू शकते, हे लक्षात घेऊन कठोर शिक्षेसमवेत धर्मशिक्षणाच्या सकारात्मक उपाययोजनेकडेही गांभीर्याने पाहिले गेले पाहिजे !
भारतातील सांस्कृतिक शहराची ओळख पालटवण्यास उत्तरदायी असणार्यांना कठोर शिक्षा झाल्याखेरीज पर्याय नाही ! |