माणसाला नदीशी जोडल्यास देश पूर आणि दुष्काळमुक्त होईल !- जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंग

चिपळूण येथील ‘नदी की पाठशाळा’ कार्यशाळेची सांगता

‘नदी की पाठशाळा’ कार्यशाळेची सांगता

चिपळूण – नद्या जोडून देश पूरमुक्त होणार नाही, तर माणसाला नदीशी जोडल्यास देश पूर आणि दुष्काळमुक्त होईल, असे उद्गार जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंग यांनी काढले. ‘नदी की पाठशाळा’ कार्यशाळेची सांगता झाल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी चिपळूण पूरमुक्तीसाठी सह्याद्री पर्वत रांगा नेहमीच हिरव्यागार व्हायला हव्यात, असा आशावादही व्यक्त केला.

जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंग यांनी पुढे म्हटले की,

१.चिपळूण येथे झालेली कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रात व्हावी. त्यासाठी नगर परिषद, महापालिका, ग्रामपंचायती यांनी पुढाकार घ्यावा. यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करू.

२. या कार्यशाळेत येथील पूरमुक्तीसाठी विस्तृत चर्चा झाली. या सर्वांनीच नद्या बारमाही निर्मल वाहिल्या पाहिजेत, अशी भावना व्यक्त केली.

३. महाराष्ट्राला समृद्ध राज्य व्हायचे असेल, तर धरणे बांधून समृद्ध होता येणार नाही. महाराष्ट्रात देशाच्या ४२ टक्के धरणे आहेत. तरीही महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या आहेत; कारण पाणी आणि नदी समवेत आपण जोडले गेलेलो नाही.

४. कोकण हे देशात सर्वांत पाणीदार क्षेत्र आहे. येथे साडेतीन ते चार सहस्र मिलीमीटर पाऊस पडतो; मात्र कोकणात स्वतःचे जलस्रोत नाहीत. त्यावर येथे काम झालेले नाही. पाऊस संपल्यावर कोकणातील नद्या कोरड्या पडतात. स्वतःचे जलस्रोत निर्माण झाल्यास येथील नद्याही बारमाही वाहतील

कार्यशाळेत संमत केलेले ठराव !

१. सह्याद्रीची हिरवळ आणि चिपळूण पूरमुक्त करण्यासाठी सह्याद्री पर्वत रांगेत वृक्षतोड थांबवून तेथे गर्दझाडी निर्माण करावी.

२. कोयनेचे अतिरिक्त अवजल कृष्णा खोर्‍यात सोडून महाराष्ट्रासह कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगाणा आणि आंध्र या राज्यांत पाणी वापरात आणावे.

३. चिपळूणचा ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम राज्यभरात राबवण्यात यावा.

४. नदीपात्रात कचरा आणि सांडपाणी सोडण्यात येणार नाही.