Ayodhya Ram Mandir : मंदिर उभारणीच्या दर्जात कोणतीही तडजोड नाही ! – नृपेंद्र मिश्रा यांचे स्पष्टीकरण

अयोध्येतील श्रीराममंदिराच्या गर्भगृहात पावसाचे पाणी साचल्याचे प्रकरण

मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीराममंदिराच्या गर्भगृहात, तसेच अन्य ठिकाणी पावसामुळे गळती होत असल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. यावर मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले की, मंदिराच्या गर्भगृहात पाणी साचल्याची २ कारणे होती. गर्भगृहासमोरील गूढ मंडपाचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे मंदिर परिसरात पावसाचे पाणी शिरले. दुसरे कारण म्हणजे मंदिराच्या पहिल्या मजल्यावर विजेच्या तारा टाकण्यासाठी पाईप उघडे होते. यातून मंदिरातही पाणी आले. मी स्वतः मंदिराचे निरीक्षण केले असून सर्व जागा पाहिल्या आहेत. काही लोकांनी केवळ मंदिरात पाणी गळत असल्याचा भ्रम निर्माण केला आहे. मंदिराच्या बांधकामाच्या दर्जाशी तडजोड केलेली नाही. भाविकांची सोय लक्षात घेऊन गर्भगृहासमोर तात्पुरत्या स्वरूपात गूढ मंडप बांधण्यात आला आहे. तो काढला जाईल.

नृपेंद्र मिश्रा यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की, हे मंदिर नागर शैलीत बांधले आहे. बाहेरील मंडप उघडे आहेत. मुसळधार पावसात पाणी येण्याची शक्यता असली, तरी बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मंदिरात पाणी येण्याची शक्यता नाही.

मशालीच्या उजेडात करावी लागली आरती !

२२ जूनच्या रात्री २ ते पहाटे ५ वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाला. यानंतर मंदिराच्या गाभार्‍यासमोरील मंडप ४ इंच पाण्याने भरला. मंदिरातील लोकांना विजेचा धक्का बसण्याची भीती होती. त्यामुळे वीजप्रवाह बंद करण्यात आला. पहाटे ४ वाजता होणारी आरती मशालीच्या उजेडात करावी लागली. सकाळी ६ वाजताची आरतीही याच पद्धतीने झाली.