प्रेमभाव, इतरांना साहाय्य करणारे आणि गुरुसेवेची तळमळ असणारे नंदुरबार येथील (कै.) भरत दत्तात्रय पंडित (वय ६० वर्षे) !
नंदुरबार येथील श्री. भरत दत्तात्रय पंडित यांचे ७.६.२०२३ या दिवशी निधन झाले. २५.६.२०२४ या दिवशी त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध आहे. त्या निमित्ताने त्यांच्या पत्नी आणि सहसाधिका यांना त्यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. श्रीमती भारती पंडित ((कै.) भरत पंडित यांच्या पत्नी), नंदुरबार
१ अ. इतरांना साहाय्य करणे : ‘(कै.) भरत दत्तात्रय पंडित हे नगरपालिकेत वसुली विभागात कार्यरत होते. ते निवृत्त झाले होते; पण तरीही नवीन कर्मचार्यांना येणार्या अडचणी सोडवण्यासाठी ते त्यांना भ्रमणभाषवरून जमेल तेवढे साहाय्य करत होते.
१ आ. शारीरिक त्रास होत असूनही ब्रह्मोत्सवाचा कार्यक्रम पूर्ण पहाणे : वर्ष २०२३ मध्ये त्यांची ब्रह्मोत्सवाला (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव) रामनाथी, गोवा येथे येण्याची पुष्कळ इच्छा होती; पण प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना ते शक्य नव्हते. त्यांना त्रास होत असूनही त्यांनी ब्रह्मोत्सवाचा कार्यक्रम ‘ऑनलाईन’ (संगणकाच्या माध्यमातून) पूर्णपणे बघितला.
१ इ. नामजपादी उपाय नियमित पूर्ण करणे : आजारपणाच्या काळात ते पुष्कळ अंतर्मुख झाल्याचे जाणवत होते. त्यांनी बोलणे अतिशय अल्प करून ‘ते नामजप करत आहेत’, असे मला जाणवत होते. सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी त्यांना नामजपादी उपाय करण्यास सांगितले होते. ते उपाय पूर्ण करण्याचा नियमित प्रयत्न करायचे.
१ ई. अंतिम क्षणापर्यंत गुरुसेवेचा ध्यास असणे : अंतिम क्षणीही यजमानांना गुरुसेवेचा ध्यास लागला होता. त्यांनी मला रुग्णालयात २ – ३ वेळा सांगितले, ‘‘पावती पुस्तकांच्या नोंदी आणि नोंदवही व्यवस्थित ठेव. मी नंतर ती सेवा पूर्ण करीन.’’ प्रत्यक्षात त्यांच्या निधनानंतर ही सेवा हस्तांतरित केलेल्या साधकांना सेवेत काहीही अडचणी आल्या नाहीत.
१ उ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सनातनचे साधक यांच्याप्रती विश्वास असणे : सहसाधक श्री. रवींद्र पवार हे त्यांचे बालपणीचे मित्र आहेत. त्यांच्याशी ते मनमोकळेपणाने बोलत. ‘‘माझे काही बरे-वाईट झाल्यास माझ्या कुटुंबाकडे लक्ष दे’’, असे त्यांनी पवार यांना विश्वासाने सांगितले. ‘गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आणि सनातनचे साधकच माझ्या कुटुंबाला सांभाळणार आहेत’, असा त्यांना दृढ विश्वास होता. ‘गुरुदेवांच्या कृपेने साधकच आपला आधार आहेत’, हे मलाही जाणवले. असे साधक दिल्याबद्दल माझ्याकडून गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.
१ ऊ. यजमान आणि धाकटा मुलगा (श्री. जय) यांना मृत्यूची पूर्वसूचना मिळणे
१. ३१.५.२०२३ या दिवशी यजमानांची प्रकृती पुष्कळ खालावली. आधुनिक वैद्यांच्या सांगण्यावरून त्यांना त्वरित सुरत येथे नेण्यात आले. त्या वेळी जणू काही त्यांना स्वतःच्या मृत्यूची जाणीव झाली असावी; म्हणून त्यांनी साधक रुग्णालयात आल्यावर त्यांची क्षमायाचना केली.
२. आमचा धाकटा मुलगा जय घरी नंदुरबार येथे होता. पहाटे ३ वाजता त्याला स्वप्नात ‘त्याचे बाबा दूरच्या प्रवासाला निघाले आहेत’, असे दिसले. तो लगेच सुरत येथे येण्यास निघाला. त्याला त्याच वेळी जाणवले होते, ‘आजपासून आपले बाबा आपल्या समवेत रहाणार नाहीत.’ तो जेव्हा सुरत येथे पोचला, तेव्हा यजमानांचे निधन झाले होते.
१ ए. निधनानंतर
१ ए १. यजमानांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना गुरुकृपेने आंतरिक स्थिरता अनुभवता येणे : ७.६.२०२३ या दिवशी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. त्या वेळी माझा आणि मोठा मुलगा सौरभ याचा नामजप चालू होता. माझा ‘जय गुरुदेव, जय गुरुदेव’ असा नामजप चालू होता. ‘जणूकाही गुरुदेव यजमानांना अलगदपणे घेऊन जात असून गुरुदेवांनी त्यांचा हात धरला आहे’, असे मला जाणवले. हा प्रसंग घडत असतांना मी आतून पुष्कळ स्थिर होते. मला गुरुदेवांचे अस्तित्व जाणवत होते. मी आणि माझी मुले श्री. सौरभ आणि जय या प्रसंगात स्थिर राहू शकलो, ते केवळ आणि केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळेच !
१ ए २. सद्गुरु नंदकुमार जाधवकाकांच्या माध्यमातून गुरुदेवच धीर देत असल्याचे जाणवणे : आम्ही सद्गुरु जाधवकाकांना संपर्क करून श्री. पंडित यांच्या मृत्यूची बातमी दिली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘काकू, आता पंडित या जगात नाहीत, ही परिस्थिती स्वीकारायला हवी.’’ त्यांची ही प्रीतीस्वरूप वाणी ऐकून जणूकाही ‘गुरुदेवच सद्गुरु जाधवकाकांच्या माध्यमातून समजावून धीर देत आहेत’, असे आम्हाला जाणवले.
१ ऐ. अंत्यदर्शनाच्या वेळी
अ. वातावरणात दाब जाणवत नव्हता.
आ. माझा आणि मुलांचा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ असा नामजप चालू होता.
इ. सर्व साधक आणि इतर नातेवाईक यांनाही वातावरणात हलकेपणा जाणवत होता.
ई. शेवटच्या क्षणी ‘यजमानांचा सूक्ष्म देह आर्तभावाने गुरुदेवांना आळवत असून त्यांचा नामजप चालू आहे’, असे मला जाणवले.
आजपर्यंत गुरुमाऊली आम्हा सर्व लेकरांना सांभाळत आहे. ‘आम्हाला अखंड आपल्या चरणी ठेवा’, अशी आपल्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना करते.’
२. कु. भावना कदम (सहसाधिका, नंदुरबार)
२ अ. प्रेमभाव : ‘आम्ही पंडितकाका यांच्या घरी सत्सेवा करत असतांना आवश्यकतेनुसार ते आम्हाला अल्पाहार आणि भोजन करून द्यायचे. सेवा झाल्यानंतर मला कधी घरी जायला उशीर झाला, तर ‘काळजी करू नको’, असे म्हणून व्यवस्थित घरी पोचवायचे.
२ आ. व्यवस्थितपणा : काकांचे सर्व व्यवहार आणि त्यांच्याकडील सेवेच्या नोंदी व्यवस्थित असत. सेवेसंदर्भात कुणी दोन-तीन वर्षांपूर्वीचे काहीही विचारले, तरी ते त्वरित सांगायचे.
२ इ. निधनानंतर : काकांच्या निधनानंतर त्यांचा चेहरा आनंदी दिसत असून ते नामजप करत आहेत’, असे मला जाणवले.’
३. सौ. निवेदिता जोशी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ५२ वर्षे)
अ. मी जवळजवळ २ वर्षे आश्रमात रहात असतांना माझे यजमान एकटे घरी होते. त्यांच्या जेवणाची सोय श्री. पंडित यांच्याकडे होती. तेव्हा श्री. पंडित यांनी माझ्या यजमानांची लहान भावाप्रमाणे काळजी घेतली.