कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणार्‍या बडनेरा (जिल्हा अमरावती) येथील सौ. मंगला बळवंत चावरे (वय ६० वर्षे) !

ज्येष्ठ कृष्ण चतुर्थी (२५.६.२०२४) या दिवशी बडनेरा (जिल्हा अमरावती) येथील सौ. मंगला बळवंत चावरे यांचा ६० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सौ. मंगला बळवंत चावरे

सौ. मंगला बळवंत चावरे यांना ६० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !

१. सौ. प्रार्थना प्रसाद देव (सौ. मंगला चावरे यांची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ अ. लहानपणापासून देवाची आवड असणे : ‘माझी आई सौ. मंगला चावरे हिला आरंभापासून देवाची उपासना करण्याची आवड होती. तिने आम्हा कुटुंबियांच्या मनातही देवाविषयीची आवड निर्माण केली.

१ आ. सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ आणि केलेल्या सेवा : ती सनातन संस्थेच्या सत्संगाला जाऊ लागली. तेव्हा तिला बर्‍याच अनुभूती येत असत, उदा. देवघरातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र सजीव झाल्याचे दिसणे, सत्संग घेणार्‍या साधकांभोवती प्रकाश दिसणे इत्यादी.

पूर्वी आई बर्‍याच सेवा करायची, उदा. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वितरण करणे, वर्गणीदार बनवणे इत्यादी. तिने कुठल्याही सेवेला नकार दिला नाही. आता वयोमानानुसार आईला प्रसाराची सेवा करणे जमत नाही. ती घरी राहून व्यष्टी साधनेचे प्रयत्न करते, उदा. नामजप करणे, भावजागृतीचे प्रयत्न करणे इत्यादी.

सौ. प्रार्थना प्रसाद देव

१ इ. मुलीला साधनेत साहाय्य करणे : अनुमाने ४ वर्षांपूर्वी मला अमरावती येथे काही कालावधीसाठी रहावे लागले. तेव्हा माझ्या कौटुंबिक आणि आर्थिक अडचणी वाढल्या होत्या. माझ्या मनातील काळजीचे विचार पुष्कळ वाढले होते. त्या वेळी आईने मला प्रार्थना आणि नामजप वाढवण्यास सांगितले होते. तिने मला श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची सुवचने पाठवली. त्यांमध्ये पुढील सुवचन होते, ‘साधकांनी कितीही अडचणी आल्या, कष्ट झाले किंवा संघर्ष करावा लागला, तरीही ‘मी साधना सोडणार नाही. देवाचे चरण सोडणार नाही’, हा दृढ निश्चय मनाशी करण्याची वेळ आली आहे. साधकांनी हे सत्य जाणून घ्यावे आणि स्वतःच्या मनावर कोरून घ्यावे की, साधकांचा जन्म हा ईश्वरप्राप्तीसाठी आहे. मायेत रममाण होऊन आयुष्य व्यर्थ घालवण्यासाठी नव्हे.’

हे सुवचन वाचल्यानंतर माझी काळजी न्यून झाली आणि माझ्या मनाला साधना करण्यासाठी उभारी आली.

१ ई. गुरूंवर दृढ श्रद्धा असणे : आमच्या काही नातेवाइकांना आम्हा ३ बहिणींच्या लग्नाची काळजी वाटत असे; परंतु माझ्या आईची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा आहे. त्यामुळे आई-बाबांना आमच्या लग्नाची काळजी वाटत नसे. आता आमचे नातेवाईक म्हणतात, ‘‘तुम्हाला तिन्ही जावई छान मिळाले.’’ ‘ही गुरूंची कृपा आहे’, असे आईला वाटते आणि तिचे मन कृतज्ञतेने भरून येते.

‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला साधनेत साहाय्य करणारी आई मिळाली’, याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

२. श्री. प्रसाद देव (सौ. मंगला चावरे यांचे जावई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

श्री. प्रसाद देव

२ अ. प्रेमभाव : ‘सासूबाईंनी माझ्याकडे कधी ‘जावई’ म्हणून पाहिले नाही. त्यांनी मला मुलाप्रमाणेच वागणूक दिली आणि आवश्यक त्या वेळी साहाय्य केले.

२ आ. सासूबाई पूर्वी प्रसारातील सेवा करायच्या. तेव्हा त्यांच्या सेवेतील चूक सांगितल्यावर त्या प्रांजळपणे स्वीकारायच्या आणि चूक सुधारण्यासाठी प्रयत्न करायच्या.

२ इ. त्या घरी अनावश्यक न बोलता स्वतःच्या नामजपाकडे लक्ष देतात.

२ ई. मुलगी आणि जावई यांना साधना करण्यासाठी प्रोत्साहन देणे : आम्ही दोघे (मी आणि पत्नी) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतो. त्या बर्‍याचदा आमची विचारपूस करत असतात. त्या ‘आम्हाला काही न्यून पडू नये’, याची काळजी घेतात. त्या म्हणतात, ‘‘वयोमानानुसार माझ्याकडून सेवा होत नाही; पण देवाने तुम्हाला सेवेची संधी दिली आहे, तर तिचा लाभ करून घ्या.’’

(सर्व सूत्रांचा दिनांक : १८.६.२०२४)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक